नुकत्याच समोर आलेल्या आकडेवारीनुसार राजकीय देणगीच्या बाबतीत भाजपाने प्रथम क्रमांक पटकला आहे. भाजपला मिळालेली देणगी ही काँग्रेसच्या तुलनेत तब्बल 6 पटीने अधिक आहे. सत्ताधारी भाजपाला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 614.53 कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. तर विरोधीपक्ष असलेल्या काँग्रेसला केवळ 95.46 कोटी रुपये जमवण्यात यश आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी करण्यात आलेल्या यादीनुसार पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 43 लाख रुपयांची देणगी मिळाली आहे. तर माकपाकडे एकूण 10.05 कोटी रुपयांची देणगी जमा झाला आहे. सध्या केरळमध्ये माकपची सत्ता आहे. चार पक्षांनी त्यांचे देणगी बाबतचे अद्यावत विविरण निवडणूक आयोगाकडे सादर केले आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
कायदा काय सांगतो?
मार्च-एप्रिल 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली होती. या निवडणुकीमध्ये भाजपाला धोबीपछाड देत तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला. त्याचसोबत केरळमध्ये देखील 2021 मध्ये निवडणूक झाली होती. सध्या केरळमध्ये माकपा सत्तेत आहे. लोकप्रतिनिधी कायद्यानुसार कोणत्याही पक्षाला जर एखाद्या वैयक्तिक देणगीदाराकडून अथवा संस्थेकडून वीस हजारांपेक्षा जास्त देणगी प्राप्त झाल्यास त्याचा उल्लेख हा निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या अहवालात करणे बंधनकारक आहे.
आपच्या देणगीदारांमध्ये वाढ
काही महिन्यांपूर्वी पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत आपने काँग्रेसला धोबीपछाड देत सत्ता काबीज केली. पंजाबमध्ये सत्ता आल्यानंतर आपच्या देणगीदारांमध्ये वाढ झाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त माहितीनुसार आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये आपला एकूण 44.54 कोटी रुपये देणगीच्या स्वरुपात मिळाले आहेत.