इयत्ता अकरावीच्या पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम निवडण्याच्या पर्यायाची मुदत रविवारी रात्री संपली. पुण्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठी 75 हजार 749 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. तर जवळपास 58,768 विद्यार्थ्यांची प्रवेश अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आता पहिल्या नियमित फेरीची अंतिम गुणवत्ता यादी 27 ऑगस्ट रोजी जाहीर होईल. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील 311 कनिष्ठ महाविद्यालयांनी अकरावी प्रवेशाच्या ऑनलाइन प्रक्रियेसाठी नोंदणी केली. याद्वारे शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता प्रवेशासाठी एक लाख 11 हजार 205 जागा उपलब्ध झाल्या आहेत.
अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या 67 हजार 131 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक, तर 66 हजार 247 विद्यार्थ्यांचे अर्जांची पडताळणी झाली आहे. येत्या शुक्रवारी पहिल्या फेरीतील अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करण्यासाठी मुदत देण्यात येईल.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा 22 ऑगस्ट म्हणजे आज होणार होती. मात्र, आता ही ऑनलाईन परीक्षा 5 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास वारंवार मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे परीक्षेची तारीखही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली. (फोटो गुगल)