आज दि.१२ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारतीय हेलिकॅप्टरचा विक्रम,
१९१० किलोमीटर अंतर केले पार

चिनूक – Chinook CH-47 हे एक वैशिष्टयपुर्ण लष्करी साहित्याची ने-आण करणारे हेलिकॉप्टर वायू दलाच्या सेवेत आहेत. सोमवारी देशामध्ये हेलिकॉप्टरच्या इतिहासात या चिनूकने एक वेगळ्या विक्रमाची नोंद केली. चिनूकने चंदीगढ ते देशाच्या पूर्व टोकवर असलेल्या आसामधील जोरहाट शहरापर्यंतचा प्रवास एका दमात केला. तब्बल साडे सात तास चाललेल्या या उड्डाणात चिनूकने तब्बल एक हजार ९१० किलोमीटर अंतर पार करत देशातील हेलिकॉप्टरच्या इतिहासात एका वेगळ्या विक्रमाची नोंद केली.

किरीट सोमय्या, नील सोमय्या यांचा
जामीन अर्ज न्यायालयाने फेटाला

आयएनएस विक्रांत प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यानंतर त्यांचा मुलगा नील सोमय्यालाही मोठा झटका बसला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांसोबत नील सोमय्यांच्याही अडचणीत वाढ झाली असून अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. नील सोमय्यांना दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त होती. मात्र कोर्टाने ही शक्यता फोल ठरवत नील सोमय्या यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. यामुळे नील सोमय्या यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे.

विक्रांत प्रकरणी भाजपची चौकशी
करावी नाना पटोले यांची मागणी

युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला असेल, तर या पक्षाची व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तसेच खजिनदारांची चौकशी करावी,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा
उल्लेख भिकारी असा केला

पाकिस्तान मध्ये संसद सदस्य फहीम खान यांनी व्हिडीओमध्ये पाकिस्तानच्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचा उल्लेख भिकारी असा केला आहे. “मी आत्ता संसदेमध्ये उभा आहे. मी तुम्हाला आंतरराष्ट्रीय भिकारी दाखवणार आहे. हे भिकारी आहेत आणि ते स्वत:च भिकारी आहे. जे समाजाला भिकारी म्हणतात, ते स्वत: भिकारी आहेत”, असं म्हणत फहीम खान यांनी व्हिडीओमध्ये शेहबाज खान यांच्या दिशेने इशारा केला.

ओमायक्रोनचे 2 नवीन स्ट्रेन
अधिक सांसर्गिक

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे की, ते ओमायक्रॉनच्या अत्यंत संसर्गजन्य प्रकारातील दोन नवीन उपप्रकारांचे परीक्षण करत आहे. हे उपप्रकार BA.4 आणि BA.5 म्हणून ओळखले जातात. BA.1.1 आणि BA.3 ची नावे देखील त्याच्या उपप्रकारांच्या यादीत जोडली गेली आहेत. जागतिक स्तरावर, आजकाल BA.1 आणि BA.2 ची अधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत. WHO सध्या BA.4 आणि BA.5 या नवीन स्ट्रेनचे निरीक्षण करत आहे. त्याला हे उपप्रकार अधिक सांसर्गिक आणि धोकादायक आहेत का? ते पहायचे आहे.

कार्यकर्त्यांच्या संतापा समोर चंद्रकांत
पाटील यांना काढता पाय घ्यावा लागला

हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून जोरदार प्रयत्न झाला. दरम्यान आज मतमोजणी सुरु असताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या संतापाला सामोरं जावं लागलं. यानंतर त्यांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. चंद्रकांत पाटील मंगळवार पेठेतील बूथवर पोहोचले असता महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज आणि जिजाऊ यांच्या नावाचा यावेळी जयघोषण करण्यात आला. दादा हिमालयात जावा अशीही घोषणा यावेळी तरुण देत होते. अखेर कार्यकर्त्यांचा संताप पाहून चंद्रकांत पाटील यांनी काढता पाय घेतला.

हल्ल्याची कल्पना विश्वास
नागरे पाटील यांना होती

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कशाला सिल्वर ओक आंदोलनाच्या चौकशीचा फार्स करताय?,” असा प्रश्न महाराष्ट्र भाजपाने विचारलाय. “ज्या विश्वास नांगरे-पाटील यांना घटनेपूर्वी माहिती मिळूनही ते महा विकास आघाडीच्या सर्वोच्च नेत्याला सुरक्षा पुरवत नाहीत आणि तरीही तुम्ही त्यांनाच चौकशी प्रमुख नेमता,” असा टोला लगावला आहे. जब सैय्या भए कोतवाल, तो डर काहे का?, असंही भाजपाने इशारा देणारं पत्र पोस्ट करत म्हटलंय.

वीजेची मागणी २९ हजार
मेगावॅटपर्यंत वाढली

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देशातील कोळसा संकटाचा उल्लेख करत राज्यात आगामी काळात होणाऱ्या भारनियमनाबाबत मोठं विधान केलं. “सध्या वीजेची मागणी २९ हजार मेगावॅटपर्यंत गेलीय. त्यात कोळशाचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात वीज गळती, वीज चोरी होत असलेल्या ठिकाणी लोडशेडिंग करून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत,” अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते.

…आणि शिक्षकाने टाहो फोडला, बीडमधलं मन हेलावणारं वास्तव

बीडच्या पाटोदा तालुक्यातील वडझरी गावातील संत शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रम शाळेतील 7 शिक्षकांना संस्थाचालकांनी पैशांची मागणी केली. शिक्षकांनी पैसे न दिल्याने संस्थेने त्यांना शाळेतून काढून टाकले. सलग पाच वर्ष सेवा दिल्यानंतरही शाळेतून काढून टाकल्यामुळे या शिक्षकांनी थेट न्यायालय आणि मंत्र्यांकडे धाव घेतली. शिक्षकांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची मदत घेतली. वडेट्टीवारांनी शिक्षकांना सेवेत कायम रुजू करून घेण्याचे आदेश दिले. मात्र सेवेमध्ये रुजू करून घेण्यासाठी सामाजिक न्याय विभाग आणि संबंधित संस्थाचालक पैसे मागत आहेत. लहान मुलांना घरात खाण्यासाठी पैसे नाहीत अशी परिस्थिती असताना संस्थाचालकांना पैसे द्यायचे कुठून? आता अक्षरशः आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, असं म्हणत पीडित शिक्षक लहू दत्तात्रय कन्हेरकर यांनी टाहो फोडला.

‘फ्लॅट विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही’, जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा

‘घर मालकाला स्वतःचा घराचा हक्क आहे. ते घर कोणाला विकावे हा त्याचा निर्णय आहे. जर एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल तर त्याकरिता सोसायटीची परवानगी कशासाठी? घर मालक आणि खरेदीदार यांच्यात सौदा झाला तर परवानगीची काहीच गरज नाही, अशी महत्त्वाची घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाण्यात पत्रकारांशी बोलत असताना जितेंद्र आव्हाड यांनी वेगवेगळ्या मुद्यांवर आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. तसंच फ्लॅट विक्रीसाठी सोसायटीची परवानगी लागत होती, पण आता जितेंद्र आव्हाड यांनी ही प्रथा मोडीत काढली आहे.

आयपीएल सोडा, देशासाठी पुढे या! या देशाच्या मंत्र्याचा खेळाडूंना इशारा

भारतामध्ये सध्या आयपीएल 2022 सुरू आहे, ज्यात क्रिकेट खेळणाऱ्या जवळपास प्रत्येक देशाच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. श्रीलंकेचे खेळाडू भानुका राजपक्षे आणि वानिंदु हसरंगा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. भानुका राजपक्षे भारतात आयपीएल खेळत असला तरी त्याने श्रीलंकेमधल्या आर्थिक संकटावर भाष्य केलं आहे. राजपक्षेशिवाय श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांनीदेखील ठोस भूमिका घेतली आहे. महेला जयवर्धने मुंबई इंडियन्सचा तर कुमार संगकारा राजस्थान रॉयल्सचा कोच आहे.
श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्या मंत्री असलेले अर्जुना रणतुंगा यांनी खेळाडूंनी आयपीएल सोडून देशासाठी पुढे यावं अशी मागणी केली आहे. काही खेळाडू आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहेत, पण आपल्या देशाबाबत काहीच बोलत नाहीत, असं रणतुंगा एएनआयशी बोलताना म्हणाले.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.