काँग्रेस नेते राहुल गांधी कोरोनाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. रोज काही ना काही ट्विट करून त्यांनी मोदी सरकार विरोधात एक प्रकारचे ट्विटर वॉरच सुरू केलं आहे. आजही त्यांनी नवं ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राहुल गांधी यांनी आज मोदींवर अत्यंत खोचक ट्विट केलं आहे. ‘एक तर महामारी, त्यात पंतप्रधान अहंकारी’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. राहुल यांच्या टीकेमागे संदर्भ आहे. तो म्हणजे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांच्या विधानाचा. केंद्र सरकारने लसींचा पुरेसा स्टॉक नसल्याचं माहीत असतानाच लसीकरण मोहीम सुरू केली. शिवाय 45 आणि नंतर 18 वर्षांवरील व्यक्तिंनाही लस देण्याची घोषणा केली. केंद्राकडे कोणतंही नियोजन नव्हतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईनकडे दुर्लक्ष करण्यात आलं, असं जाधव यांनी म्हटलं होतं. जाधव यांच्या या वक्तव्याची बातमीही राहुल यांनी ट्विटमध्ये शेअर केली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेची गाईडलाईन्स लक्षात घेऊन लसीकरणाला प्राधान्य द्यायला हवे होते. सुरुवातीला 30 कोटी लोकांना व्हॅक्सिन द्यायची होती. त्यासाठी 60 कोटी डोसची गरज होती, असं जाधव यांनी सांगितलं होतं. लसीकरण सुरू झाल्यानंतर आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचतच होतो. तेव्हा सरकारने 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षांवरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडे लसीचा एवढा स्टॉक नाहीये हे सरकारला माहीत होतं. तरीही त्यांनी हा निर्णय घेतला. यातून उत्पादनाची उपलब्धता पाहिली पाहिजे आणि न्यायसंगत पद्धतीने त्याचा वापर केला पाहिजे, हे आपल्याला शिकायला मिळते, असंही ते म्हणाले होते.
दरम्यान, राहुल यांची केंद्रावर टीका सुरूच आहे. चार दिवसांपूर्वीही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. केंद्रातील मोदी सरकारने कोरोना महामारी रोखण्यासाठी रणनीती तयार केली आहे. त्यावर राहुल गांधी यांनी सातत्याने प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. या पूर्वीही त्यांनी पीएम केअर्स फंड आणि पीएम मोदी खोटारडे असून काम करण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता असेल. अशावेळी पेडियाट्रिक सर्व्हिसेस आणि व्हॅक्सिन ट्रिटमेंट प्रोटोकॉल आधीच तयार करावा लागेल. मोदी सिस्टिमला झोपेतून उठावं लागणार आहे. ही भविष्यातील गरज आहे, असं राहुल म्हणाले होते.