भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या चेन्नई सुपर किंग्सचं नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीच्या आई वडिलांना करोनाचा संसर्ग झाला आहे. धोनीचे आई-वडील करोना पॉझिटिव्ह असून त्यांना रांची येथील पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
धोनीचे वडील पान सिंह आणि आई देविका देवी यांच्या करोना चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना ततडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या महेंद्रसिंह धोनी चेन्नईच्या संघासोबत आहे. झारखंडमध्येही इतर राज्यांप्रमाणे करोनाचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्याचं चित्र दिसत आहे. करोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी झारखंड सरकारने लॉकडाउन लागू करण्यासंदर्भातील निर्णय घेण्याची तयारी केल्याचं चित्र दिसत आहे.
धोनीच्या आई-वडिलांना दाखल करण्यात आलेल्या पल्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. दोघांच्या शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण सामान्य असून त्यांच्या फुफ्फुसांना करोनाचा संसर्ग झालेला नाही. उपचारांनंतर पुढील काही दिवसांमध्ये धोनीचे आई वडील ठणठणीत बरे होतील अशा विश्वासही डॉक्टरांनी व्यक्त केलाय.