महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं संकट घोगांवत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पूर्व विदर्भात देखील उद्या आणि परवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर देखील पावसांच सावट आहे. विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
शेतकरी पुन्हा संकटात
चालू आर्थिक वर्षात पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला अनेक भागात पाऊसच झाला नाही, त्यामुळे पेरणीला विलंब झाला. पेरणी झाल्यानंतर राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा विदर्भ आणि मराठवाड्याला बसला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं. त्यानंतर ऐन हातातोंडाशी घास आला असताना पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. आता अवकाळी पाऊस झाल्यास याचा मोठा फटका रब्बी पिकांना बसण्याची शक्यता आहे.
रब्बी पिकांना फटका
हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार जर पुन्हा राज्यात अवकाळी पाऊस झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा गहू, हरभारा या सारख्या पिकांना बसणार आहे. पावसामुळे गव्हाचे नुकसान होऊ शकते. तसेच ढगाळ वातावरण राहिल्यास हरभाऱ्यावर आळी पडण्याची शक्याता आहे.