भारतीय नौदलात अग्निवीर भरतीमध्ये महिला उमेदवारांसाठी 20 टक्के जागा राखीव आहेत. सध्या भारतीय नौदलात विविध पदांवर 550 महिला अधिकारी कार्यरत आहेत. ज्या तरुणींना अग्निवीर योजनेअंतर्गत नौदलात सहभागी व्हायचं आहे, त्यांनी यासाठी आवश्यक पात्रता आणि वेतनाविषयी जाणून घेणं गरजेचं आहे.
शैक्षणिक पात्रता
– ज्या महिला उमेदवारांना अग्निवीर भरतीच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, त्यांचं वय साडेसतरा ते 21 वर्षांदरम्यान असावं.
– संबंधित महिला उमेदवार इयत्ता 10 वी उत्तीर्ण असावी. तसंच ती अविवाहित असावी.
– महिला उमेदवाराची उंची 152 इंच अर्थात 4 फूट 11 इंच असावी.
या भरती प्रक्रियेत, तरुणींसाठी उंचीमध्ये काहीशी सवलतदेखील देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
निवड प्रक्रिया
अग्निवीर भरती प्रक्रियेत महिला उमेदवाराची निवड लेखी परीक्षा आणि फिजिकल टेस्टच्या माध्यमातून केली जाते.
परीक्षेत `या` विषयांचे विचारले जाणार प्रश्न
या परीक्षेत ऑब्जेक्टिव्ह टाइप प्रश्न विचारले जातील. हे प्रश्न महिला उमेदवारांना 30 मिनिटांत सोडवावे लागतील. या परीक्षेत गणित, विज्ञान आणि सामान्य ज्ञानाविषयी प्रश्न विचारले जातील. याबाबतच्या अभ्यासक्रमाचा तपशील आणि नमुना प्रश्नपत्रिका भारतीय नौदलाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
अशी होईल फिजिकल टेस्ट
लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर अग्निवीर तरुणींना फिजिकल टेस्टसाठी बोलावलं जाईल. या टेस्टमध्ये त्यांना 1.6 किलोमीटर अंतर 8 मिनिटांत धावून पूर्ण करावं लागेल. तसंच 15 उठाबशा आणि 10 सीट-अप्स काढावे लागतील. या टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर महिला उमेदवारांना मेडिकल टेस्टसाठी बोलावलं जाईल. ही टेस्ट ‘आयएनएस चिल्का’मध्ये होईल. त्यानंतर त्यांची अंतिम निवड होऊन पोस्टिंग दिलं जाईल.
वेतन आणि सुविधा
भारतीय नौदलात नोकरी मिळाल्यानंतर महिला अग्निवीरांना पहिल्या वर्षी दरमहा 30 हजार रुपये वेतन दिले जाईल. त्यानंतर दुसऱ्या वर्षी दरमहा 40 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी दरमहा 36 हजार 500 रुपये आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये वेतन दरमहा मिळेल. नोकरीमध्ये त्यांना 48 लाखांचा नॉन कॉन्ट्रिब्युटरी जीवन विमा दिला जाईल. महिला अग्निवीरांना लष्कराच्या रुग्णालयात मेडिकल सुविधा, तसंच कँटीन सुविधा मिळतील. नोकरीत असताना मृत्यू झाल्यास संबंधित महिलेच्या कुटुंबीयांना एकरकमी 44 लाख रुपये मिळतील. तसंच एखाद्या अग्निवीर महिलेला अपंगत्व आलं, तर अपंगत्व किती आहे त्या आधारावर नुकसानभरपाई दिली जाईल.