पाकिस्तानातील भीषण स्फोटात 5 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या दक्षिणेकडील बलुचिस्तान प्रांताची राजधानी क्वेटा शहरात हा स्फोट झाला. यामध्ये पोलिसांच्या गाडीला लक्ष्य करण्यात आले. माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की यात 5 पोलिसांचा मृत्यू झालाय, तर एकूण 12 जण जखमी झाले आहेत. यात आठ पोलिसांचा समावेश आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
प्राथमिक अंदाजानुसार बॉम्ब एका मोटार बाईकमध्ये लावण्यात आला होता.बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते लियाकत शेहवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ पोलीस जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच दोन नागरिकही जखमी झाले आहेत. पोलीस गाडीला लक्ष्य करण्यात आले होते. गाडी क्वेटामधील सेरेना हॉटेलजवळ तंझीम स्क्वेरजवळ थांबली होती, त्यावेळी स्फोट झाला. सुरक्षा दलांनी तपास सुरु केला असून परिसराची घेराबंदी करण्यात आली आहे.
स्फोटामध्ये आजुबाजूच्या इमारतींच्या काचा फुटल्या आहेत. अद्याप या हल्ल्याची जबाबदारी कोणी घेतलेली नाही. पण, बलूच कार्यकर्ते या प्रांतात सक्रिय आहेत आणि त्यांनी अनेकदा सुरक्षा दलांवर हल्ला केला आहे. बलूच कार्यकर्त्यांचा रोष केंद्र सरकारवर आहे. केंद्र सरकार प्रांतातील नैसर्गिक साधनसंपत्तीचे शोषण करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.बलुचिस्तानचे मुख्यमंत्री जम कमल खान यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवाद्यांना प्रांताती शांतता नष्ट करायची आहे, पण ते या प्रयत्नात कधीही यशस्वी होणार नाही, असं ते म्हणाले आहेत. दहशतवाद विरोधी पथकाने सांगितलेल्या माहितीनुसार, स्फोटासाठी IED चा वापर करण्यात आला होता. देशभरातील नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊलं उचलण्याची मागणी केली आहे.