शाहबाज शरीफ पाकिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहेत. दुसरीकडे इम्रान खान यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत. इस्लामाबाद, कराची, पेशावर, मुलतान, क्वेटा येथे इम्रानच्या विरोधकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी होत आहे. दरम्यान, शाहबाज शरीफ पंतप्रधान झाल्याचा भारतावर काय परिणाम होईल, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला आहे. भारत आणि काश्मीरबद्दल शाहबाज यांचे विचार काय आहेत?
अविश्वास प्रस्तावाद्वारे इम्रान खान यांचे सरकार पाडल्यानंतर शाहबाज यांनी भारताबाबत वक्तव्य केले. ते म्हणाले की, ‘आम्हाला भारतासोबत शांतता हवी आहे, पण काश्मीर प्रश्नावर तोडगा काढल्याशिवाय हे शक्य नाही. शाहबाज यांनी भारत आणि काश्मीरबाबत अनेकदा वादग्रस्त विधाने केली आहेत. एप्रिल 2018 मध्ये पाकिस्तानात निवडणुका सुरू असताना शाहबाज एका सभेत म्हणाले होते, ‘आमचे रक्त उकळत आहे. आम्ही काश्मीरला पाकिस्तानचा भाग बनवूच.
त्याच वर्षी सिंगापूरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी भारताचा उल्लेख केला होता. “जर अमेरिका आणि उत्तर कोरिया अण्वस्त्र हल्ल्याच्या उंबरठ्यावरून परत येऊ शकतात, तर भारत आणि पाकिस्तान हे करू शकत नाहीत, असे कोणतेही कारण नाही,” असे ते म्हणाले होते.
फेब्रुवारी 2014 मध्ये शरीफ म्हणाले होते, “भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार संबंधांमध्ये सर्वात मोठा अडथळा दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा आहेत.” दोन्ही देशांमध्ये आर्थिक सुरक्षा असल्याशिवाय समान सुरक्षा शक्य नाही.
2015 मध्ये शरीफ म्हणाले होते की, भारतातील काही कट्टरवाद्यांना पाकिस्तानशी चांगले संबंध नको आहेत. त्यानंतर शरीफ यांनी आरएसएसचे नाव घेतले. बलुचिस्तानमधील फुटीरतावाद्यांना भारत पाठिंबा देत असल्याचा आरोपही शरीफ यांनी केला होता. तेव्हा दोन्ही देशांनी आरोप-प्रत्यारोपाचा खेळ थांबवून संबंध सुधारण्यासाठी काम करायला हवे, असेही शरीफ म्हणाले होते.
शाहबाज शरीफ 2013 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. मनमोहन सिंग त्यावेळी भारताचे पंतप्रधान होते. त्या काळात शाहबाज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री होते. पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर शाहबाज यांनी एकत्र काम करण्याबाबत वक्तव्य केले होते.
2017 मध्येही त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी पंजाबमधील स्मॉगची समस्या मांडली. यासाठी दोन्ही देशांच्या पंजाब सरकारने एकत्रितपणे काम करावे, असे सांगण्यात आले.
इम्रान खान यांच्या आगमनानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिकच ताणले गेले होते. शाहबाज आल्यानंतर किमान चर्चेचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र, दोन्ही देशांमधील संबंधांवर कोणताही विशेष परिणाम अपेक्षित नाही.
2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत, इम्रान खानच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने सर्वाधिक 149 जागा जिंकल्या. शाहबाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लीगला (पीएमएल-एल) 82 आणि बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीला 54 जागा मिळाल्या. 342 सदस्यांच्या संसदेत बहुमताचा आकडा 172 आहे.