पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा उषा मंगेशकर यांनी केली. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे 24 एप्रिल रोजी हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित रहाणार आहेत असेही त्यांनी सांगितले.
उषा मंगेशकर यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लता दिनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
15 वर्षांपूर्वी आम्ही दीनानाथ मंगेशकर नवं हॉस्पिटल बांधलं. त्या हॉस्पिटलचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. त्यावेळी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळी भाषणात लता दीदी यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर लतादीदी आणि नरेंद्र मोदी यांच्यात बहीणभावाचे नाते निर्माण झाले होते, अशी आठवण या पुरस्काराविषयी बोलताना ह्रदयनाथ मंगेशकर यांनी सांगितली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाप्रती असलेले काम आणि सेवा पाहूनच हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींना तसेच प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येणार आहे. दीदींच्या ओळखीचा आणि त्यांच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी असायला हवा, असेही ते म्हणाले.