अफगाणिस्तानात सत्तेवर तालिबान आल्यानंतर आता भारतात अफगाणी दहशतवादी घुसल्याची बातमी समोर आली आहे. भारताच्या गुप्तचर संस्थांनी याबाबत सरकारला अलर्ट जारी केला आहे. या संस्थांच्या माहितीनुसार, भारतात कुठल्यातरी मोठ्या हल्ल्याची शक्यता आहे. त्यातच मिलिट्री कॅम्प, मोठी सरकारी कार्यालयं यांना जास्त धोका असल्याचं सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून भारताची सीमा पार करुन दिली जाऊ शकते. सुत्रांच्या माहितीनुसार, ज्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी या अफगाणी दहशतवाद्यांना भारतात आणलं, ते पुन्हा पाकिस्तानात शिरताना भारतीय सैन्यासोबत त्यांची झडप झाली. त्यानंतर ही गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं.
दहशतवाद्यांसोबत झालेल्या या झडपेत एक भारतीय सैनिकही जखमी झाला आहे. माहितीनुसार, या अफगाणी दहशतवाद्यांकडे घातक शस्र आहेत. हेच नाही तर जम्मू काश्मीरमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांकडून यांना मदत मिळत आहे. उरी सेक्टरच्या अंनगूर पोस्टजवळील सीमेच्या तारा कापून या अफगाणी दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत प्रवेश देण्यात आला आहे.
भारतीय सैन्याकडून या अफगाणी दहशतवाद्यांचं सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. सीमेजवळ दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं कळल्यानंतर शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे. गेल्या 5 दिवसांपासून उरी सेक्टरमध्ये हा तपास सुरु आहे. असं असलं तरी या भागात मोबाईल आणि इंटरनेट सुविधा सुरु आहेत. मात्र सीमेजवळच्या भागातील दूरसंचार व्यवस्था सध्या ठप्प करण्यात आली आहे.
एका सुरक्षा प्रवक्त्यांनी हे मान्य केलं की, शोध मोहिम सुरु आहे, मात्र याबद्दल अधिक माहिती देण्यास नकार दिला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेवरच्या तारांजवळ पहिल्यांदा या दहशतवाद्यांशी सामना झाला, त्यात सैन्याचा एक जवान जखमी झाला, त्यानंतर हे दहशतवादी पळाले. याच दहशतवाद्यांना शोधण्यासाठी उरी सेक्टरमध्ये सैनिक दिवसाची रात्र करत आहेत. उरीतून बाहेर पडणारे सगळ्या रस्त्यांवर चेकिंग सुरु आहे, जेणेकरुन हे दहशतवादी बाहेर पडू नयेत. ज्या भागात ही चकमक झाली आहे, तो भाग गोहलान जवळ आहे, हा तोच भाग आहे जिथं सप्टेंबर 2016 मध्ये उरी ब्रिगेडवर दहशतवादी हल्ला झाला होता.