चहासोबत तुम्हीही खाताय का टोस्ट? तज्ज्ञांनी दिलाय धोक्याचा इशारा

सकाळी सकाळी चहा आणि बिस्किट किंवा टोस्ट खाणं अनेकांना आवडतं. काही जण तर न्याहारी न करता चहासोबत 3-4 टोस्टच खाणं पसंत करतात. यामुळे काही काळासाठी पोट तर भरतं; पण भविष्यात काही आजार मागे लागू शकतात. ‘हेल्थ पँट्री’च्या संस्थापक आणि आहारतज्ज्ञ खुशबू जैन टिबरेवाला यांनी आहारातल्या टोस्टचं पोषणमूल्य किती आहे, त्याविषयी सांगितलं आहे.

अनेक वेगवेगळ्या आकारांचे व स्वादाचे टोस्ट्स सध्या बाजारात उपलब्ध आहेत. जाहिराती पाहून ते विकत घेण्याचा मोह झाला नाही तरच नवल; पण खरंच त्यातून शरीराला काय मिळतं, याचा विचार केला, तर एका मोठ्या चक्रातून आपली सुटका होईल. चवीला मस्त आणि तोंडात विरघळणारे हे टोस्ट मैद्यापासून तयार केलेले असतात. साखर, स्वस्तातलं तेल, जास्तीचं ग्लुटेन आणि काही इतर घटक मैद्यात मिसळून टोस्ट तयार होतात. या सगळ्या जिन्नसांमुळे रक्तातली साखरेची पातळी वाढते, तसंच दाह निर्माण होतो, असं ‘हेल्थ पँट्री’च्या संस्थापक, आहारतज्ज्ञ आणि डायबेटीसबाबच्या मार्गदर्शक खुशबू जैन टिबरेवाला यांचं मत आहे.

दररोज टोस्ट खाल्ल्यामुळे रक्तातली ग्लुकोजची पातळी सतत वरखाली होते. यामुळेच अखेर इन्सुलीन रेझिस्टन्स तयार होतो. त्याशिवाय शरीरात जळजळ होते. त्यामुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. आतड्यात वाईट जिवाणूंची वाढ होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया यांच्यावर परिणाम होतो. पोषणमूल्यं शरीरात शोषली जात नाहीत व अकारण भूक वाढते. “टोस्टमुळे लठ्ठपणा वाढतो, ताण वाढतो, आळस वाढतो, रोगप्रतिकारशक्ती कमी होते, हॉर्मोन्सवरही परिणाम होतो,” असं टिबरेवाला यांचं म्हणणं आहे.

टोस्टमध्ये काय घटक पदार्थ असतात व त्यांचं पोषणमूल्य काय असतं, याबाबत हॉर्मोनल एक्स्पर्ट, आहारतज्ज्ञ आणि हेल्थ कोच शिखा गुप्ता यांनी माहिती दिली आहे.

मैदा – टोस्टमधला प्रमुख घटक मैदा असून, तो गव्हाचं वरचं साल बाजूला काढून बनवलेला असतो. त्यामुळे त्यात कोणतीही जीवनसत्त्वं नसतात. फायबर्सही नसतात.

साखर – शरीरातल्या कॅलरीज वाढवण्याचं काम साखर करते. दिवसभरात कशातूनही साखर न खाता केवळ दोन टोस्ट खाल्ले तरी त्यापेक्षा जास्त साखर पोटात जाते.

रिफाइन्ड व्हेजिटेबल तेल – खूप जास्त तापमानावर गरम करून ते तयार केलेलं असल्यानं त्यात काहीच पोषणमूल्यं नसतात. केवळ शरीरातला दाह वाढवण्याचं काम ते करतं.

रवा – गव्हापासूनच बनवलेला असला, तरी त्यातही जीवनसत्त्वं व फायबर्स नसतात.

प्रीझर्व्हेटिव्ह, इमल्सिफायर्स, कृत्रिम स्वादासाठीचे पदार्थ – उत्पादन जास्त काळ टिकण्यासाठी असे घटक वापरले जातात; मात्र त्यांचा शरीराला काहीही फायदा नसतो.

कृत्रिम रंग – टोस्टमध्ये कॅरॅमल किंवा तपकिरी रंग वापरला जातो. “हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मैद्याचा टोस्ट गव्हाचा वाटावा, तसंच बेक केलेला दिसावा यासाठी हा रंग घातला जातो,” असं होलिस्टिक हेल्थ कोच दिग्विजय सिंग यांनी सांगितलं.

टोस्टच्या ऐवजी भाजलेले शेंगदाणे, चणे किंवा भाजलेले मखाणे खाता येऊ शकतात, असं टिबरेवाला सांगतात; मात्र तरीही टोस्ट खाण्याचा मोह टाळता येत नसेल, तर काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. 100 टक्के गव्हापासून किंवा रव्यापासून तयार केलेले टोस्ट विकत घ्यावेत. विकत घेताना त्यावरचं लेबल वाचून वापरलेले पदार्थ पाहून मगच घ्यावेत. तसंच प्रत्येक वेळी थोडेच टोस्ट खावेत, असं सिंग सांगतात.

सगळ्या प्रकारच्या टोस्टच्या पाकिटांवरची मागची बाजू वाचा. यामुळे टोस्टमधल्या घटकांची व त्यांच्या प्रमाणाची कल्पना तुम्हाला येईल, असं टिबरेवाला यांचं म्हणणं आहे.

गव्हाचे, रव्याचे किंवा थेट मैद्याचे असले तरी कोणत्याही प्रकारचे टोस्ट शरीराला फारसे चांगले नसतातच. त्याचा शरीरावर लगेचच परिणाम दिसत नाही; मात्र सातत्यानं व भरपूर सेवन केल्यास आरोग्याला धोका उत्पन्न होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.