भारत सरकारच्या अॅनिमल वेलफेयर बोर्ड ऑफ इंडियाच्या “होनररी अॅनिमल वेलफेयर ऑफीसर”पदी सांगलीचे डॉ. आदित्यराज सुभाष घोरपडे यांची नियुक्ती झाली आहे. या वर्षी केंद्र शासनाच्या या पदावर नियुक्ती होणारे घोरपडे हे महाराष्ट्रातील एकमेव व्यक्ती आहेत. प्राण्यांचा सांभाळ आणि कल्याण विषयक क्षेत्रात काम करणाऱ्या देशभरातील एकूण 50 व्यक्तीची निवड ही “मानद प्राणी कल्याण अधिकारी”पदासाठी करण्यात येते. यासाठी महाराष्ट्रातून घोरपडे यांची निवड झाली आहे.
मानद प्राणी कल्याण अधिकारी पदासाठी नुकतीच अॅनिमल वेलफेयर बोर्डाकडून हरियाणामध्ये परीक्षा आणि प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घोरपडे यांनी या परीक्षेत यश संपादन केले असून, त्यांना 40 वा रॅंक मिळाला आहे. तसेच त्यांनी आपले प्रशिक्षण देखील पूर्ण केले आहे. परीक्षा आणि प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची मानद प्राणी कल्याण अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली.
देशात प्राणी कल्याण विषयक योजना तयार करण्यासाठी तसेच त्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने 1962 साली अॅनिमल वेलफेयर बोर्डची स्थापना करण्यात आली. पशु संवर्धन मंत्रालयांतर्गत या बोर्डाचे कामकाज चालते. पूर्वी या बोर्डाचे मुख्यालय हे चेन्नईला होते. आता ते हरियाणामध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. या बोर्डातंर्गत प्राणी कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या देशातील पन्नास व्यक्तींना मानद प्राणी कल्याण अधिकारी म्हणून काम करण्याची संधी देण्यात येते.
डॉ. घोरपडे हे गेल्या 15 वर्षांपासून केंद्रीय मंत्री मनेका गांधी संचलित पिपल फॉर अॅनिमल संस्थेच्या माध्यमातून प्राण्यांसाठी कार्य करत आहेत.पक्ष्यांसाठी घरटी, भटक्या जनावराना पिण्याच्या पाण्याची सोय करणे, जखमी पशुंना खाद्य पुरवणे, गाईंसाठी चारा संकलन, भटक्या कुत्र्यांची नसबंदी आदी विविध कार्य घोरपडे यांनी केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून भारत सरकारच्या अॅनिमल वेलफेयर बोर्डवर त्यांना संधी देण्यात आली.