२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी
कोव्हॅक्सिनचा वापर करण्यास मान्यता
आपल्या मुलांसाठी दीर्घकाळापासून करोना लसीची वाट पाहत असलेल्या पालकांना दिलासा मिळाला आहे. भारतीय औषध नियंत्रक मंडळाने मुलांसाठी देखील लसीकरणाला मान्यता दिली आहे. माहितीनुसार, भारत सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस बनली आहे जी मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे. या मंजुरीनंतर, केंद्र सरकार लवकरच २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल.
अंबरनाथ एमआयडिसीत गॕस गळती ; 30 जणांचा श्वास कोंडल्याने प्रकृती बिघडली
अंबरनाथच्या आनंद नगर एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. आरके केमिकल्स कंपनीत ही गॅस गळती झाली असून, त्यामुळे 30 जणांची श्वास गुदमरल्या प्रकृती बिघडली आहे.या सर्वांना उल्हानगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतं.अंबरनाथ येथील आनंदनगर एमआयडीसीत आर.के. केमिकल्स नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये सल्फ्युरिक ॲसिडवर डिस्टिलेशनची प्रक्रिया केली जाते. कंपनीत नेहमीप्रमाणे डिस्टिलेशनची प्रक्रिया सुरू असताना 10 वाजताच्या सुमारास अचानक प्लांटमधील एक पाईप निसटला आणि त्यातून गॅस गळती सुरू झाली.
वीजनिर्मिती केंद्रांतील ३३३० मेगावॉट
क्षमतेचे १३ संच बंद पडले
कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील एकूण ३३३० मेगावॉट क्षमतेचे १३ संच बंद पडले आहेत. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. राज्यातल्या संकटाला सर्वस्वी सरकार जबाबदार आहे अशी टीका विरोधी पक्षाकडून केली जात आहे.
दिल्लीत पंधरा वर्षापासून राहणाऱ्या
पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
राजधानी दिल्लीतून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. तो ओळख लपवून १५ वर्षांपासून दिल्लीच्या लक्ष्मी नगर भागात राहत होता. तपासादरम्यान, त्याच्याकडून एके -४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. मोहम्मद अशरफ अली असे या दहशतवाद्याचे नाव आहे. अशरफ अली मौलाना म्हणून भारतात राहत होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने सोमवारी ही कारवाई केली. दहशतवाद्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
पंतप्रधानांना पत्र लिहित
तरूणाची आत्महत्या
मध्यप्रदेशातल्या ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने आपण उत्तम डान्सर बनण्यास अपयशी ठरल्याचं सांगत आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या १६ वर्षीय तरुणाने आत्महत्येपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित आपली शेवटची इच्छा बोलून दाखवली आहे. हा मुलगा अकरावीत शिकत होता. या मुलाने रात्री रेल्वेखाली आत्महत्या केली. पोलीस स्टेशनचे अधिकारी संजीव नयन शर्मा यांनी बोलताना माहिती दिली.
जम्मू -काश्मीरमध्ये अमित शाह यांनी
नवीन युग आणले : अरुण मिश्रा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू -काश्मीरमध्ये नवीन युग आणले, असे वक्तव्य देशाच्या मानवाधिकार संस्थेचे प्रमुख अरुण मिश्रा यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांनी संबोधित केलेल्या कार्यक्रमात न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी हे विधान केलं. यावेळी ते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणाच्या तरी सांगण्यावरून भारतावर मानवाधिकार उल्लंघनाचा आरोप करणं हे आदर्शवादाचं प्रतीक झालंय, अशी टीकाही त्यांनी केली.
लखीमपूर खेरी प्रकरणी
राहुल गांधी राष्ट्रपतींना भेटणार
केंद्राच्या तीन कृषी शेती कायद्यांचा विरोध करणारे शेतकरी मंगळवारी लखीमपूर खेरी हिंसाचारात आपला जीव गमावलेल्या चार शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ‘शहीद किसान दिवस’ पाळत आहेत. इतर राज्यांतील लोक देखील उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथे ३ ऑक्टोबर रोजी झालेल्या हिंसाचारात मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या शेवटच्या प्रार्थनेसाठी येत आहेत. आरोपी आशिष मिश्राला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर, लखीमपूर खेरी प्रकरणी राहुल गांधी बुधवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
छोट्या स्वार्थासाठी हिंदूंकडून धर्मांतर,
ही मोठी चूक : मोहन भागवत
केवळ लग्नासाठी हिंदूंकडून धर्मांतर होत आहे. अत्यंत छोट्या स्वार्थासाठी हिंदू दुसऱ्या धर्मात प्रवेश करण्याची चूक करत आहे. हिंदू कुटुंबीयांकडून मुलांना धर्म आणि त्याच्या परंपरेचे संस्कार दिले जात नाहीत म्हणून अशा घटना घडत आहेत, असं सांगतानाच OTT पाहणाऱ्या मुलांवर लक्ष ठेवा, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
मोहन भागवत उत्तराखंडच्या हल्दानी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.
फोर्ड कंपनीचा कारखाना
टाटा विकत घेण्याची शक्यता
मागील आठवड्यामध्ये एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीसाठी १८ हजार कोटींची किंमत मोजण्याची तयारी दाखवत बोली जिंकणाऱ्या टाटा समुहाने आता आणखीन एका खरेदीची तयारी सुरु केल्याची चर्चा आहे. मात्र ही खरेदी एका परदेशी कंपनीकडून असणार असून संपूर्ण कंपनी नाही तर केवळ कारखाना खरेदी करण्याचा टाटांचा विचार असल्याचं समजतं. तामिळनाडू सरकार सध्या टाटा समुहाशी चर्चा करत आहे. राज्यामधील फोर्ड कंपनीचा कारखाना टाटा विकत घेतील का याबद्दल चर्चा सुरु आहे.
राज्यातील जनतेची किमान
दिवाळी तरी गोड करा
राज्यातील जनतेची किमान दिवाळी तरी गोड करा ; केसरी शिधापत्रिका धारक परिवारांना तेल, साखर सह इतर धान्य नाममात्र दराने उपलब्ध द्या.” अशी मागणी भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
लॉकडाऊन उठल्यानंतर रेल्वेच्या
उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ
देशभरातील लॉकडाऊन उठल्यानंतर रेल्वेने 2021-2022 च्या दुसऱ्या तिमाहीत प्रवासी विभागाच्या उत्पन्नात 113 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. कोरोना लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे 2020-21 दरम्यान रेल्वेची कमाई कमी झाली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान त्याच्या सर्व नियमित सेवा वर्षाच्या बहुतेक काळासाठी तात्पुरत्या निलंबित करण्यात आल्या होत्या. आता त्या हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.
कपाटात सापडले
142 कोटी रुपये
आयकर विभागाने हेटेरो फार्मास्यूटिकल ग्रुपवर छापेमारी केलीय. या छापेमारीदरम्यान आयकर विभागाचे अधिकारीही चक्रावले. कारण, हेटेरो फार्मास्टूटिकलच्या कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना एका अलमारीत तब्बल 142 कोटी रुपये सापडले आहेत. ही कंपनी आपल्या अधिकाधिक उत्पादनांची निर्यात विदेशात करते. त्यात USA, यूरोप, दुबई आणि अन्य आफ्रिकी देशांचा समावेश आहे. आयकर विभागाने 6 राज्यातील जवळपास 50 ठिकाणी तपासणी मोहीम राबवली आहे.
SD social media
9850 60 3590