पश्चिम बंगालची राजधानी कला आणि संस्कृतीचा वारसा लाभलेली नगरी कोलकत्ता. येथे दुर्गा देवी आणि कालिका माता देवीची आराधना मोठ्या प्रमाणात होते. कलकत्त्याच्या उत्तरेला दक्षिणेश्वर कालिका मंदिर आहे. हे अतिशय पुरातन मंदिर असून भारतातील एक्कावन्न देवी शक्तिपीठांपैकी अतिशय प्रसिद्ध शक्तीपीठ आहे.
मंदिराची निर्मिती
देवीने राणी रासमणीला स्वप्नात दृष्टांत दिला की, कालिका मातेच मंदिर तिने स्थापित कराव. देवीने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे 1847 मध्ये मंदिराची निर्मिती , बांधकाम सुरू झाले ते बांधकाम 1955 मध्ये पूर्ण झाले . एक भव्य प्रशस्त मंदिर आकाराला आले. मंदिरातली देवीची मुर्ती चांदीच्या एकहजार पाकळ्याच्या कमलपुष्प हातात खड्ग, शस्त्रे घेऊन शंभो शंकरा वर पाय देऊन उभी आहे. भद्रकाली, महाकाली, गुहेकाली, शमशान काली. ही भगवती कालीकेचीच रूपं आहेत. महाकाल भैरवाने महाकालीची आराधना, भक्ती केली. देवीने प्रसन्न होऊन त्याला वरदान दिले. मी तुझ्या नावाने जगविख्यात होईन. म्हणून तिला महाकाली असे म्हणतात.
महाकाली कनवाळू मायाळू
देवीचे प्रत्यक्ष रूप पाहिले की सर्वसामान्य लोकांना थोडी भीती वाटते. देवी कृष्णवर्णीय आहे तिच्या एका स्तोत्रात “नमामि कृष्ण रुपिणी” असा उल्लेख आहे. ती जगत् जननी आहे. तिच्यावर रामकृष्ण परमहंसांची नित्तांत श्रद्धा होती. नितांत श्रद्धा भक्ती तून त्यांनी अध्यात्मिक दृष्टी संपादन केली. देवीचे स्वरूप, तिला नवस करण्याबाबत, केलेला नवस फेडण्याबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. देवी कनवाळू, मायाळू एक वात्सल्य मूर्ती आहे. भक्तांच्या हाकेला धावून येणारी आहे. लवकर प्रसन्न होते. आपल्या शरीरातील सात चक्रांना जागृत करण्याचे सामर्थ्य मातेच्या साधनेत आहे. नवसाला पावणारी ही देवी रक्त किंवा बळी दिल्या शिवाय प्रसन्न होत नाही असा गैरसमज आहे.
दुष्टांचा संहार करण्यासाठी घेतले विक्राळ रूप
दुष्टांचा संहार करण्यासाठी तिला विक्राळ रूप घ्यावे लागले. त्याची कहाणी अशी की, एकदा दारुक नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. त्यांनी त्याला आशीर्वाद आणि वरदान दिले. तो देव आणि उच्चवर्णीयांना संकटात आणून दुःख देऊ लागला. धार्मिक अनुष्ठान बंद करून सर्व स्वर्गलोकात आपले राज्य त्याने प्रस्थापित केले. सर्व देवता, ब्रम्हा विष्णू कडे पोहोचले तेव्हा त्यांनी सांगितले की हा दुष्ट राक्षस फक्त एखाद्या स्त्रीच्या हातून मारला जाऊ शकतो. दरम्यान सर्व देवांनी स्त्रिचे रूप धारण करून दृष्ट राक्षसाशी द्वंद्व केले. बलाढ्य राक्षसापुढे कुणाचाच टिकाव लागला नाही. सर्वजण कैलास पर्वतावरील भगवान शंकराकडे गेले. त्याबद्दल त्यांना सांगितले त्यावेळी भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, हे कल्याणी, जगाच्या हितासाठी ,दुष्टांचा संहार करण्यासाठी तुला मी प्रार्थना करतो, विनंती करतो. भगवंतांचे शब्द ऐकून पार्वती हसली. तिच्या एका अंशाने भगवान शंकराच्या शरीरात प्रवेश केला. हा प्रवेश देवता आणि ब्रह्मांना दिसू शकला नाही. पार्वती शिवाच्या जवळ बसलेली आहे असे त्यांना वाटले. पार्वतीचा अंश शिवाच्या शरीरात प्रवेश करत त्यांच्या कंठस्थित विषाने आकार धारण केला. स्थिर झालेल्या विषाच्या प्रभावाने कंठ काळा होऊ लागला. कळ्या अंशाचे आस्तित्व जाणवताच शंकराने आपला तिसरा डोळा उघडला. आणि त्या नेत्रातून भयंकर विक्राळ रुपी कालिका उत्पन्न झाली. तिच्या कपाळावर तिसरा डोळा आणि चंद्रकोर होती. कंठावर कलार विषाचे चिन्ह होते. हातात त्रिशूळ, नाना प्रकारचे आभूषण आणि वस्त्रांनी माता सुशोभीत दिसत होती. तिचे ते विशाल रूप बघून देवता, सिद्धपुरुषही घाबरले. कालीमातेच्या केवळ नाममात्र हुंकाराने दारुक राक्षसासह सर्व असुर सेना जळून खाक झाली. तिचा क्रोधाने अनेक लोक जळाले बघून भगवान शिव स्मशानात पोहोचले आणि त्यांनी छोट्या मुलाचे रूप धारण केले ते रडू लागले. आवाज एकूण मातेचे मातृत्व जागृत झाले. तिने त्या बालकाला प्रेमाने जवळ केले, आणि छातीशी लावले. बालकाने दुधा सोबत क्रोधही प्राशन केला आणि माता शांत झाली. असे सांगण्यात येते.
सौ.अंजली हांडे ,जळगाव