आज दि.२५ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

‘…तर कर्नाटकची विधानसभाच बरखास्त केली असती, बोम्मईंची भाषा पाकिस्तानची,’ ठाकरे गटाचा पुन्हा हल्ला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. महाराष्ट्र सरकारने जत तालुक्यातील या गावांच्या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करावा असं बोम्मई यांनी म्हटलं आहे. बोम्मई यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.  माझ्या हाती असतं तर कर्नाटकची विधानसभा बरखास्त केली असती असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे.

गणेश ‘अथर्वशीर्ष’ कोर्सला पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सुरूवात, कोर्सवरून घमासान!

गणेश अथर्वशीर्षावरच्या सर्टिफिकेट कोर्सला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरूवात झाली आहे. विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे, पण या कोर्सला विरोध सुरू झाला आहे. प्राध्यापक हरी नरके यांनी या कोर्सला विरोध केला आहे.

‘पुन्हा एकदा पेशवाईची स्वप्न ही सनातनी मंडळी रंगवत आहेत. हे धोकादायक पाऊल आहे,’ असं हरी नरके म्हणाले. तर ब्राह्मण महासंघाने उर्दू प्रार्थना चालते तर अथर्वशीर्ष का नको, असा सवाल विचारला आहे. दरम्यान हा कोर्स कम्पलसरी नाही, ज्यांना नकोय त्यांनी जॉईन करू नये. आराधना धार्मिक कशी असू शकते? असं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

भुयार खोदून केली रेल्वे इंजिनची चोरी; लोखंड चोरांच्या सुळसुळाटामुळे पोलीस त्रस्त

भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी रेल्वेचं विस्तीर्ण जाळं तयार करण्यात आलेलं आहे. भारतीय रेल्वे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहचली आहे. आजही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नागरिक रेल्वेला प्राधान्य देतात. रेल्वेतून प्रवास करताना बोगीच्या आतमध्ये किंवा स्टेशनवर विविध सूचना लिहिलेल्या तुम्ही नक्कीच पाहिल्या असतील.

‘रेल्वेची संपत्ती तुमचीच संपत्ती आहे. कृपया तिची काळजी घ्या’, अशा कितीतरी सूचना बोगीच्या आतमध्ये ठिकठिकाणी लिहिलेल्या असतात. या सूचना बिहारमधील काही चोरट्यांनी जास्तच गांभीर्यानं घेतल्याचं दिसत आहे. या चोरट्यांनी रेल्वे आपली स्वत:चीच संपत्ती असल्याप्रमाणे रेल्वेच्या इंजिनासह अनेक पार्ट्स चोरण्याचा धडाका सुरू केला आहे. एका घटनेमध्ये तर रेल्वे इंजिनच्या चोरीसाठी चोरट्यांनी बरौनी ते मुझफ्फरपूरपर्यंत एक भुयार खोदल्याचं उघड झालं आहे. ‘नवभारत टाइम्स’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

सोलापुरात बिशीच्या नावाखाली फसवणूक; २७२ सभासदांना १ कोटी ८० लाखांचा गंडा

सीसीएच नावाच्या बनावट अमेरिकन ॲपसह मॕक्सो क्रिप्टो अॕपच्या माध्यमातून सोलापुरात हजारो गुंतवणूकदारांना आर्थिक गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आता बिशीच्या नावाखाली सामान्य कष्टकरी व मध्यमवर्गीयांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाच कुटुंबातील बापलेक आणि सुनेविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

५ कोटी ३० लाखांचं बक्षिस असलेल्या आरोपीला दिल्लीत अटक

दिल्ली पोलिसांनी राजविंद्र सिंग या ३८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या राजविंद्रला पकडून देणाऱ्याला पाच कोटींचं इनाम ऑस्ट्रेलियामध्ये जाहीर करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील हा वॉन्टेड आरोपी दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. क्विन्सलॅण्डच्या सुमद्रकिनाऱ्यावर २०१८ साली एका २४ वर्षीय तरुणीची हत्या केल्यानंतर राजविंद्र भारतात पळून आला होता. हत्या केल्यानंतर दोन दिवसांमध्येच राजविंद्र भारतात परतला होता. मागील चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणा त्याचा शोध घेत होते अखेर दिल्ली पोलिसांच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आलं आहे.

व्यक्तिमत्व हक्कांसाठी अमिताभ बच्चन यांची कोर्टात धाव, न्यायालयानं दिला मोठा दिलासा!

बॉलिवुडमध्ये बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन हे त्यांच्या शांत आणि संयमी स्वभावासाठी ओळखले जातात. ऑन स्क्रीन अँग्री यंग मॅनची ओळख निर्माण करणारे अमिताभ बच्चन खऱ्या आयुष्यात तितकेच मृदूभाषी असल्याचं त्यांच्या अनेक कार्यक्रमांमधून आणि सामाजिक उपस्थितीमधून ठळकपणे समोर येतं. मात्र, आपल्या नावाचा, फोटोंचा किंवा आवाजाचा गैरवापर होत असल्याचं पाहून बिग बी चांगलेच संतप्त झाले आहेत. याविरोधात त्यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली. न्यायालयानंही त्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर यासंदर्भात अंतरिम आदेश देऊन बिग बींना दिलासा दिला आहे.अमिताभ बच्चन यांच्या बाजूने हरीश साळवेंनी न्यायालयात केलेल्या युक्तीवादामध्ये यासंदर्भात सविस्तर भूमिका मांडण्यात आली. “मी फक्त थोडी माहिती देतो की नक्की चाललंय काय? कुणीतरी टीशर्ट तयार करतं आणि अमिताभ बच्चन यांचे फोटो त्यावर लावतं. कुणीतरी अमिताभ बच्चन यांचे पोस्टर विकत असतं. कुणीतरी अमिताभ बच्चन डॉट कॉम या नावाने वेबसाईट रजिस्टर करतं. यामुळेच आम्ही त्यांच्या पर्सनॅलिटी राईट्ससंदर्भात याचिका दाखल केली आहे”, असं हरीश साळवे युक्तीवादामध्ये म्हणाले.

भारताविरुद्ध शतक झळकावत टॉम लॅथमने नोंदवला मोठा विक्रम

भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना आज ऑकलंड येथे खेळला गेला. या सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाने भारताचा ७ विकेट्सने पराभव केला. ज्यामुळे आता न्यूझीलंडने मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली आहे.भारताने न्यूझीलंडला ३०७ धावांचे लक्ष्य दिले होते. जे न्यूझीलंड संघाने टॉम लॅथमच्या शतकाच्या जोरावर ४७.१ षटकांत पार केले. त्याने केन विल्यमसन सोबत चौथ्या विकेट्साठी विक्रमी २२१ धावांचा भागीदारी रचली. तसेच नाबाद शतकी खेळी करणाऱ्या टॉम लॅथमने एका मोठ्या विक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.