बेल्जियमचा निसटता विजय!; सलामीच्या लढतीत कॅनडाचा प्रतिकार मोडला; बॅश्वाईचा निर्णायक गोल

केव्हिन डीब्रूएने, कर्णधार इडन हझार्ड आणि गोलरक्षक थिबो कोर्टबा यांसारखे तारांकित खेळाडू असणाऱ्या बेल्जियमच्या संघाला कतार येथे सुरू असलेल्या ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत कॅनडाविरुद्ध विजयासाठी झुंजावे लागले. मात्र, पूर्वार्धात आघाडीपटू मिची बॅश्वाईने मिळवून दिलेली आघाडी बेल्जियमने अखेपर्यंत राखत कॅनडाविरुद्ध १-० असा निसटता विजय संपादन केला. ३६ वर्षांनंतर विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या कॅनडाने बेल्जियमला उत्तम झुंज दिली. कॅनडाला दहाव्या मिनिटाला पेनल्टीही मिळाली होती. मात्र, कॅनडाचा तारांकित खेळाडू अल्फोन्सो डेव्हिसने मारलेला फटका बेल्जियमचा गोलरक्षक कोर्टवाने अडवला. याउलट बेल्जियमला गोलच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. मात्र, ४४व्या मिनिटाला टोबी आल्डरवायरेल्डच्या पासवर बॅश्वाईने केलेला गोल बेल्जियमसाठी निर्णायक ठरला.

या सामन्यात दोन्ही संघांच्या आक्रमणाला धार नव्हती. दोन्ही संघांना प्रत्येकी तीनच फटके गोलजाळय़ाच्या दिशेने मारता आले. बेल्जियमला प्रमुख आघाडीपटू रोमेलू लुकाकूची उणीव भासली. जायबंदी लुकाकूच्या अनुपस्थितीत बॅश्वाईला संधी मिळाली. बॅश्वाईने गोल केला, पण त्याने बऱ्याच चुकाही केल्या. परंतु लुकाकूच्या तंदुरुस्तीबाबत संभ्रम असल्याने पुढील साखळी सामन्यांतही बॅश्वाईच प्रमुख आघाडीपटूची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या बेल्जियमला यंदाही विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. २०१८च्या विश्वचषकात बेल्जियमला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदा त्यांचा दोन पावले पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. मात्र, पहिल्या सामन्यात बेल्जियमच्या खेळाडूंना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.

ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी

विश्वचषक फुटबॉल स्पर्धाच्या साखळी फेरीतील बेल्जियमचा हा सलग आठवा विजय ठरला. त्यामुळे बेल्जियमने विश्वचषकात सर्वाधिक सलग साखळी सामने जिंकण्याच्या ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी साधली. ब्राझीलने दोन वेळा (१९८६ ते १९९४ आणि २००२ ते २०१०) ही कामगिरी केली आहे. बेल्जियमने १९९४ पासून विश्वचषकातील साखळी सामना गमावलेला नाही.

कॅनडाचा ३९ वर्षीय कर्णधार अतिबा हचिन्सन विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामना सुरुवातीपासून खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.बॅश्वाईने आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील २७ वा गोल केला. बेल्जियमसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या सक्रिय खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या स्थानी आहे. केवळ लुकाकू (६८) आणि  हझार्ड (३३) यांनी बॅश्वाईपेक्षा अधिक गोल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.