खेळाडूंच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात अनेक चाहत्यांना फार रस असतो. असेच पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिकच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही ११ वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. २०१० साली जेव्हा शोएबने भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाबरोबर लग्न केले, त्यावेळी शोएबचे पहिले लग्न झाले असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.
हैदराबादच्या मुलीशी निकाह केल्याची चर्चा
शोएबचे सानियाबरोबर लग्न होण्याच्या काही दिवस आधी हैदराबादच्या आयेशा सिद्दकी नावाच्या मुलीने आरोप केला होता की त्याने तिच्याशी फोनवर निकाह केला आहे. तिने त्याच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर देखील दाखल केला होता.
शोएबने केला खुलासा
आयेशाबरोबर लग्न झाल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर एका मुलाखतीदरम्यान शोएबने अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. शोएबने टाईम्स ऑफ इंडियाला दिल्या मुलाखतीत सांगितले होते की ही गोष्ट २००१ सालची होती. त्यावेळी आयेशाने त्याला फोन करुन ती त्याची चाहती असल्याचे सांगितले होते. तसेच ती साऊदी अरेबियाची असल्याचेही तिने सांगितले होते.
त्यानंतर आयेशाने त्याला तिचे काही फोटोही पाठवले. पुढे त्या दोघांमध्ये संभाषण वाढले. ज्यामुळे शोएबला ती पसंत पडू लागली. मात्र, ते दोघे कधीही भेटले नव्हते. शोएबने तिचे फोटो आपल्या पालकांनाही दाखवले होते. तिच्याशी लग्न करण्याची इच्छा असल्याचेही सांगितले होते.
पण, जेव्हा तो तिला भेटण्यास हैदराबादला गेला, तेव्हा तीने कारणं सांगत त्याला भेटणे टाळले. २००२ साली शोएब तिला भेटण्यासाठी हैदराबादला गेला होता, पण त्यावेळी काहीतरी काम असल्याचे सांगत सौदी अरेबियाला तिला जावं लागल्याचं तिने सांगितलं. तसेच तिने त्याला तिची बहिण महा सिद्दकीशी बोलण्यास सांगितले. तिने त्याला सांगितले की आयेशाचे वजन वाढले असल्याने तिला त्याला भेटायचे नाही.
त्याचबरोबर शोएबने असेही सांगितले होते की एकदा हैदराबादमधील सामन्यावेळी पाकिस्तान संघ सिद्दकीच्या घरी जेवायलाही गेला होता, पण तेव्हाही तिने त्याला भेटण्याचे टाळले होते.
तसेच शोएबने सांगितले की तो त्यावेळी केवळ २० वर्षांचा असल्याने त्याला इतकी समज नव्हती. पण त्यावेळी आयेशाने त्याच्यावर दबाव टाकला की फोनवर निकाह करुया. त्यावेळी शोएबने फोनवर बालून निकाहनाम्यावर स्वाक्षरी केली. पण २००५ साली त्याच्यासमोर वेगळेच सत्य उघडकीस आल्याचेही त्याने सांगितले.
त्यावेळी त्याच्या नात्यातील एका व्यक्तीने त्याला सांगितले की सौदीमध्ये महा सिद्दकी म्हणून एक शिक्षिका आहे, जी स्वत:ला शोएब मलिकची पत्नी असल्याचे सांगत आहे. त्यावेळी शोएबने ते फोटो पाहिले, तेव्हा त्याच्या लक्षात आले की आयेशाची बहिण म्हणून जी मुलगी त्याला भेटली होती, ती हीच होती. त्यानंतर सत्य कळाल्याने त्याने आयेशाला फोन करुन सांगितले, तेव्हा आयेशाने त्याला सांगितले की त्याने ज्या मुलीबरोबर फोनवर निकाह केला होता, ती दुसरीच कोणीतरी होती. त्यानंतर तिने त्याची माफीही मागितली होती.
शोएबने हा खुलासा केला होता. पण आयेशाने आरोप केला होता की तिने कोणतीही फसवणूक केली नव्हती. अखेर, शोएब सानियाचे लग्न झाल्यानंतर हळूहळू या चर्चाही बंद झाल्या.
सध्या शोएब आणि सानिया आनंदाने एकत्र राहात असून त्यांना इझहान नावाचा २ वर्षांचा मुलगा देखील आहे.