माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण भक्तिपूर्ण वातावरणात
माउली, माउलीचा जोरदार गजराने आसमंत दुमदुमत असतानाच टाळमृदंगाचा टिपेला पोहोचलेला नाद आणि जोडीला हातातील भगवी पताका उंचावत तल्लीन नाचणार्या वारकर्यांच्या जोशात दंग झालेला वैष्णवांचा मेळा आणि अश्वांनी केलेली दौड अशा पद्धतीने पार पडलेल्या वारीतील पहिल्या उभ्या रिंगणाने उपस्थितासह वारकर्यांच्या डोळ्याचे पारणे फेडले. संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब तरडगावात पार पडले.संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याने लोणंदला दुपारी बारा वाजता पालखी तळावर ग्रामस्थांच्या वतीने नैवेद्य अर्पण करण्यात आला व माध्यान्ह आरती झाली. पुढील प्रवासाला निघण्याचे संकेत देणारा भोंगावाजताच माउलीच्या जयजयकारात मानकऱ्यांनी पालखी सजवलेल्या रथात ठेवली व लगेचच सोहळा तरडगावकडे मार्गस्थ झाला. लोणंदकर नागरिक महिला भाविकांनी सरहदच्या ओढ्यापर्यत परंपरेप्रमाणे येत माउलींचा पालखीला निरोप दिला .दुपारी अडीच वाजता सोहळ्याने फलटण तालुक्यात प्रवेश करताच वाद्यांच्या गजरात आमदार दिपक चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी सभापती वसंतराव गायकवाड, सभापती प्रतिभा धुमाळ, प्रांताधिकारी सचिन ढोलेतहसीलदार अभिजित जाधव यांनी पुष्पहार अर्पण करून पालखीचे स्वागत केले.
इच्छुकांचे देव पाण्यात, पण विठोबा पावणार का? मंत्रिमंडळ विस्ताराला वेग, नवा मुहूर्त आला?
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार असल्याची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. आषाढी एकादशीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सर्व शिवसेना मंत्री एकत्रित विठूरायाची पूजा मुख्यमंत्र्यांसोबत करणार का? याचीही चर्चा आता जोर धरु लागली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उठावाला एक वर्षे पूर्ण झालं आहे. सुरुवातीला काही दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीच काही दिवस राज्याचा कारभार चालवला आणि नंतर मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागला. यात शिवसेना आणि भाजपाच्या 9-9 आमदांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली, यानंतर आणखी आमदार मंत्री पदाची शपथ घेतील असे बोलल् जात होतं पण तो दिवस अजूनही उजाडला नाही.
शिंदे गटात गेल्याने मनिषा कांयदे यांची आमदारकी जाणार? उज्ज्वल निकम यांनी दिलं उत्तर
ठाकरे गटाच्या माजी प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. मनिषा कायंदे या विधानपरिषदेच्या विद्यमान आमदार आहेत, असं असताना त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली जाऊ शकते का? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मनिषा कायंदेंच्या अपात्रतेच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना उज्ज्वल निकम म्हणाले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता शिवसेना हा अधिकृत पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आपण शिंदे गटामध्ये प्रवेश करीत आहोत असं जाहीर केलं असलं तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, मी शिवसेना सोडलेली नाही, असा युक्तिवाद त्या करू शकतात. त्यामुळे दहाव्या परिशिष्टानुसार मनीषा कायंदे अपात्र होऊ शकतात किंवा नाही याचा निर्णय विधानपरिषदेच्या सभापतींना घ्यावा लागेल, असंही निकम यांनी सांगितले.
टायटॅनिकचा अभ्यास करायला गेलेली पाणबुडी हरवली, ६८ तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक
टायटॅनिक या जहाजाबद्दल कोणाला माहिती नाही? समुद्रात बुडालेल्या या जहाजाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. या घटनेवर आधारित टायटॅनिक हा हॉलिवूडपटही खूप लोकप्रिय आहे. टायटॅनिक हे त्या काळातलं सर्वात आधुनिक आणि मोठं जहाज होतं, जे आटलांटिंक महासागरात बुडालं. पाण्याखाली तब्बल ३८०० मीटर खोल हे जहाज आहे असं सांगितलं जातं. हे जहाज बुडालं असलं तरी त्याबद्दल संपूर्ण जगाला खूप कुतूहल आहे. पाण्याखाली असलेल्या या जहाजाचे अवशेष पर्यटकांना दाखवण्यासाठी गेलेली एक पाणबुडी उत्तर आटलांटिंक समुद्रात हरवली आहे. काही जण दावा करू लागले आहेत की, ही पाणबुडीदेखील बुडाली असावी.ही पाणबुडी पाच पर्यटकांना घेऊन जात होती. टायटॅनिकचे अवशेष दाखवण्यासाठी जात असलेली ही पाणबुडी हरवली आहे. रविवारपासून या पाणबुडीची कोणतीही माहिती मिळालेली नाही. आता ही पाणबुडी शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकन तटरक्षक दलाकडून ही पाणबुडी शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. परंतु बचाव पथकासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे लवकरात लवकर ती पाणबुडी शोधायला हवी कारण. त्या पाणबुडीत केवळ ६८ तास पुरेल इतकाच ऑक्सिजन बाकी आहे.
एलॉन मस्क ते फालू शाह, पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर २४ सेलिब्रेटींना भेटणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून (२० जून) अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत. २०१४ ला पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी अनेकदा अमेरिकेचा दौरा केला आहे. अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प यांची सत्ता जाऊन जो बायडेन अध्यक्ष झाले तरीही भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध सलोख्याचेच राहिले आहेत. दरम्यान, आजपासून नरेंद्र मोदी पुन्हा एकदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. हा त्यांचा एक महत्त्वाचा दौरा असणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा २० ते २४ जून असा एकूण पाच दिवसांचा असेल. या दौऱ्यात ते अमेरिकेच्या संसदेत भाषण करणार आहेत. अमेरिकेच्या संसदेत दोनदा भाषण करण्याची संधी मिळालेले मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत.
नरेंद्र मोदी अमेरिकेत ज्या २४ दिग्गजांना भेटणार आहेत त्यामध्ये टेस्ला आणि स्पेसएक्सचे सहसंस्थापक एलॉन मस्क, खगोलभौतिकशास्त्रज्ञ नील डीग्रेस टायसन, ग्रॅमी पुरस्कार विजेती इंडो-अमेरीकन गायिका फालू (फाल्गुनी शाह), पॉल रोमर, निकोलस नसीम तालेब, रे दालियो, जेफ स्मिथ, मायकेल फ्रोमन डॅनियल रसेल, एल्ब्रिज कोल्बाय, डॉ. पीटर अॕग्रे, डॉ स्टीफन क्लास्को आणि चंद्रिका टंडन.
ओडिशातील रेल्वे अपघातप्रकरणाला नवं वळण, सिग्नल इंजीनियर कुटुंबासह बेपत्ता, सीबीआयचं मोठं पाऊल
ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघातप्रकरणी सीबीआयने मोठे पाऊल उचलले आहे. या रेल्वे अपघाताला सिग्नल यंत्रणेतील दोष कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू असतानाच सीबीआयने सोमवारी (१९ जून) रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा विभागातील सोरो सेक्शन सिग्नल जुनियर इंजीनियरचं घर सील केलं आहे. बालासोरमध्ये भाड्याच्या घरात राहणारा हा इंजीनियर सीबीआय चौकशीनंतर कुटुंबासह बेपत्ता आहे.सीबीआयच्या प्राथमिक तपासात या जुनियर इंजीनियरची चौकशी करण्यात आली होती. सोमवारी सीबीआय पथक पुन्हा आल्यानंतर हा इंजीनियर त्याच्या घरी आढळला नाही. सीबीआयने इंजीनियरचं घर सील केलं आहे.
अहमदाबादमध्ये रथयात्रेदरम्यान बाल्कनी कोसळली, एक ठार, १० जखमी
अहमदाबादमधल्या दरियापूर काडियानाका परिसरात एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीचा भाग कोसळला आहे. यावेळी बाल्कनीखाली रथयात्रेचं दर्शन घेत उभ्या असलेल्या लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन लहान मुलांसह एकूण १० जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास रथयात्रा काडियानाका येथे पोहोचली होती. यावेळी रथ पाहायला आणि दर्शनासाठी हजारो लोक जमले होते. त्याचवेळी ही दुर्घटना घडली.
पंढरपूर : व्हीआयपी दर्शन बंद, ७ जुलैपर्यंत विठूरायाचे २४ तास दर्शन घेता येणार
भाविकांना दर्शन देण्यासाठी आता सावळा विठूराया २४ तास उभा राहणार आहे. आषाढी यात्रेनिमित्त विठुरायाचे नवरात्र सुरु होत असल्याने परंपरे नुसार देवाचा चांदीचा पलंग काढून त्या पाल्नागाची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच विठूराया आणि रुक्मिणीमातेला थकवा जाणू नये म्हणून पाठीला कापसाचा लोड लावण्यात आला. याकाळात म्हणजेच ७ जुलै पर्यंत देवाचे २४ दर्शन तसेच सुरु राहणार असून व्हीआयपी दर्शन बंद राहणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे.
केवळ भारतामुळे पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्यास दिला नकार?
२०२५ मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला देण्यात आले आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (ICC) ने काही वेळापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) यजमानपदाचा करार पाठवला होता. सामान्यतः अशा कागदपत्रांवर ताबडतोब स्वाक्षरी केली जाते आणि परत ICCला दिली जाते. मात्र पाकिस्तानने त्यावर अद्याप स्वाक्षरी केलेली नाही. वास्तविक, पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येणार याची खात्री हवी आहे.खरं तर, पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी पीसीबीने सावधगिरी बाळगण्याचा निर्णय घेतला आहे आणि पुढे जाण्यापूर्वी प्रख्यात वकिलांचा सल्ला घेतला आहे. यानंतर पीसीबीने आयसीसीला पत्र पाठवून करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी काही आक्षेप नोंदवले आहेत. पीसीबीला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येणार की नाही याबाबत शंका आहे त्यामुळे जोपर्यंत भारत खात्री देत नाही तोपर्यंत कोणतीही चूक करायची नाही असे ठरवले आहे.
SD Social Media
9850 60 3590