बीड नगरपालिकेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊ ठेपली आहे. त्यामुळे सगळेच इच्छुक कामाला लागले आहेत. या रणसंग्रामात विधानसभेत मागे पडलेले काका पुन्हा एकदा पुतण्यावर कुरघोडी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या गटातील पाच नेते फोडण्यात यश मिळवले आहे. मागील दीड वर्षांपासून हे नगरसेवक अलिप्त होते. मात्र आता त्यांची भेट घेऊन जयदत्त क्षिरसागर यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचा मार्ग मोकळा केला आहे. येत्या 28 मार्च रोजी बीडमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात हे पाचही जण राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम करून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत. पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जातोय.
कोणते नगरसेवक शिवसेनेत येणार?
बीडमधील राष्ट्रवादीचे पाच नेते शिवसेनेत येण्याचे निश्चित झाले आहे. त्यांची नावं पुढीलप्रमाणे-
– नगरसेवक अमर नाईकवाडे
– नगरसेवक फारूक पटेल
– जिल्हा परिषद सदस्य गंगाधर घुमरे
-उद्योजक बाबूसेठ लोढा
– नितीन लोढा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या गटातील हे नेते मागील दीड वर्षांपासून अलिप्त आहेत. कोरोना काळात त्यांनी नागरिकांना मोठी मदत केली. अत्यवस्थ नागरिकांना बेड मिळवून देण्यापासून अनेक प्रकारे लोकोपयोगी कामे केली. मात्र आमदार क्षीरसागरांकडून लहान-सहान कार्यकर्त्यांकडून कामाच्या मोबदल्यात टक्केवारी घेतली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच नगरसेवकांनी त्यांच्या वॉर्डात मंजूर करून घेतलेल्या विकासकामात आडकाठी आणणे, कार्यकर्त्याचे म्हणणे ऐकून न घेणे, नगरपालिका, जिल्हा परिषदेला लोकसंख्येच्या निकषावर येणारा विधी स्वतः मंजूर करून आणल्याचे भासवणे असे प्रकार होत असल्याचा आरोप या नाराज पाच नेत्यांनी केला आहे. तसेच पाच नेत्यांची स्वतंत्र आघाडी करण्याऐवजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना साथ देण्याचे त्यांनी ठरवले आहे. जयदत्त क्षीरसागर हे विकास करू शकतात, या विश्वासाने आम्ही शिवसेनेचा पर्याय निवडल्याचे या पाच जणांनी सांगितलं.
सोमवारी बीडमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमात हे पाचही नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात हा कार्यक्रम पार पडेल, अशी माहिती मिळाली आहे. पाच पैकी लोढा बंधूंचे संघटन मजबूत आहे. बाबूसेठ लोढा हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांचा चौसाळा, लिंबागणेशसह बालाघाटावर दांडगा संपर्क आहे. त्यांचे पुतणे नितीन लोढा यांची कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी नाळ जोडली गेली आहे.