संपूर्ण जगाला कोरोना विषाणू संसर्गाच्या खाईत लोटणाऱ्या चीनमधील कोरोनाच्या डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत. चीनचा दक्षिण पूर्व प्रांत फुजियान मधील पुतियान या शहरात यामुळे चित्रपटगृह, जिम, हायवे बंद करण्यात आले आहेत. तर, शहरातील नागरिकांना शहर सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना विषाणू संसर्गाची रुग्ण संख्या वाढल्यानं पुतियान शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुतियान शहरातील स्थानिक मीडियानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार फुजियानमधील पुतियान शहरात कोरोनाची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. कोरोना विषाणूचे नवे रुग्ण वाढत असल्यानं तिथं निर्बंध लादण्यात आले आहेत. पुतियान शहराची लोकसंख्या 32 लाख आहे. कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता चीनच्या राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेनं एक तज्ज्ञांची टीम पुतियानमध्ये पाठवली असून शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.
चीनच्या राष्टीरय आरोग्य मिशनच्या माहितीनुसा फुजियामध्ये 10 ते 12 सप्टेंबरमध्ये कोरोनाचे 43 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 35 रुग्ण पुतियानमनध्ये आढळले आहेत. याशिवाय कोरोनाची कोणतीही लक्षणं नसणारे 32 रुग्ण गेल्या 4 दिवसांमध्ये आढळून आले आहेत. मात्र, चीनमध्ये ज्या व्यक्तींच्यामध्ये कोरोनाची लक्षणं आढळत नाही त्यांची मोजणी केली जात नाही.
12 सप्टेंबरपर्यंत चीनमध्ये 95 हजार 248 कोरोना विषाणू संसर्गाचे रुग्ण आढळले होते. तर, 4636 जणांचा मृत्यू झाला होता. चीनमध्ये यापूर्वी जियांग्सूमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला होता. गेल्या दोन आठवड्यापूर्वी तिथली रुग्णसंख्या आटोक्यात आली होती. आता तिथं नवे रुग्ण आढळून येत नाहीत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चीनच्या पुतियानमध्ये आढळलेले रुग्ण हे डेल्टा वेरिएंटचे असल्याचं समोर आलं आहे.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात देशात 25 हजार 404 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 339 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. विशेष म्हणजे देशभरात काल 75 कोटी लसीकरणाचा टप्पाही पार पडला.
गेल्या 24 तासात भारतात 25 हजार 404 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 339 कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 37 हजार 127 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.