पोलिसांची शोध मोहीमही यशस्वी
डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेली सात वर्षांची मुलगी (क्र.१६६) तब्बल नऊ वर्षांनंतर सापडल्याची घटना ताजी असतानाच हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला. राज्यात दररोज सरासरी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता होतात, अशी धक्कादायक माहिती आहे. त्याच वेळी हरवलेली मुले सापडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे.
राज्याच्या तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर हरवलेल्या मुलांचा शोध घेणाऱ्या विभागाकडूनही जोरदार प्रयत्न सुरू असतात हे ‘ट्रॅकचाइल्ड’ या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या २४ तासांत राज्यात १६ मुले हरवली. परंतु त्याच वेळी याच काळात १०० मुले सापडली, ही दिलासादायक बाब असल्याचेही या आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या वर्षभरात ८९६ मुले हरवली आहेत. मात्र त्याच वेळी आतापर्यंत हरवलेल्या मुलांपैकी दोन हजार २०५ मुले सापडली आहेत. या अर्थ दररोज सरासरी दोन ते तीन मुले हरवतात तर, सहा मुले सापडतात.
ट्रॅकचाइल्ड हे संकेतस्थळ केंद्रीय महिला आणि बालविकास विभागाने विकसित केले आहे. प्रत्येक राज्यातील हरवलेली मुले आणि व्यक्तींची नोंद दररोज ठेवली जाते.
मुंबई पोलिसांचा हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा स्वतंत्र विभाग आहे. या विभागातील अनेक पोलीस काम करीत असतात. डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलगी हरवली तेव्हापासून राजेंद्र भोसले हे पोलीस शिपाई तिचा शोध घेत होते. भोसले हे हरवलेल्या मुलांच्या विभागाचे प्रमुख होते. ते जेव्हा निवृत्त झाले तेव्हा फक्त या मुलीचाच शोध ते घेऊ शकले नव्हते. तेव्हापासून तिचे छायाचित्र पाकिटात ठेवून ते शोध घेत होते. अखेरीस ती जेव्हा सापडल्याचे वृत्त त्यांना कळले तेव्हा जणू काही आपली मुलगीच सापडली, असे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले.
संपर्कासाठी..
राज्य पातळीवरही वेगवेगळय़ा जिल्ह्यात हरवलेल्या मुलांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असतात. त्याचमुळे अनेक मुले सापडतात. ट्रॅकचाइल्ड या संकेतस्थळाचा संपर्क तपशील पुढीलप्रमाणे : ९८३०९२०१०३ किंवा Support. trackchild@nic.in