संजय राऊत यांच्यावरच ईडीची कारवाई,
अलिबागमधील ८ प्लॉट जप्त
शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावरच ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांच्या अलिबागमधील ८ प्लॉट आणि मुंबईतील एका फ्लॅटवर जप्तीची कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. त्यासंदर्भात आता विरोधीपक्ष असलेल्या भाजपाकडून संजय राऊतांना लक्ष्य केलं जात आहे. मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात केलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर, कोल्हापुरातील सभेत राजू शेट्टी यांची घोषणा
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारवर नाराज होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन त्यांनी आपली खदखद अनेकदा बोलून सुद्धा दाखवली होती. त्यानंतर आज कोल्हापूर येथील सभेत राजू शेट्टी यांनी एक मोठी घोषणा केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी जाहीर सभेत केली आहे.
तर सर्व मालमत्ता
भाजपाला दान : संजय राऊत
“हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपया जरी अशा गैरव्यवहारातला आमच्या खात्यात आला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल, तरी सर्व मालमत्ता आम्ही भाजपाला दान करायला तयार आहोत”, असं आव्हान यावेळी संजय राऊतांनी भाजपाला दिलं आहे.
उद्या उद्धव ठाकरेंवरही कारवाई
होऊ शकते : निलेश राणे
ईडीने कारवाई केल्यानंतर संजय राऊत जे तडफडतायत किंवा जे काही बोलत असतील ते मी ऐकलेलं नाही. पण झालं ते योग्य झालं. हे होणारच होतं. संजय राऊतच कशाला उद्या उद्धव ठाकरेंवरही (कारवाई) होऊ शकते. त्यांनाही काळापैसा जमा केला असेल. आज ना उद्या बाहेर पडणार ते सगळं,” असंही निलेश राणेंनी म्हटलंय.
काँग्रेसचा पराभव धक्कादायक
आणि दुखःदायक : सोनिया गांधी
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतला काँग्रेसचा पराभव धक्कादायक आणि दुखःदायक आहे, असं प्रतिपादन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केलं. पुढचा मार्ग आणखी कठीण आहे, ज्यामध्ये पक्षाची निष्ठा, इच्छाशक्ती आणि प्रतिकाराची क्षमता पणाला लागणार असल्याचंही त्या म्हणाल्या. जी २३ नेत्यांच्या टीकेला कोणतंही उत्तर न देता सोनिया गांधींनी आपण आपल्या पक्षाची एकता टिकवण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसच्या सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना सोनिया गांधी म्हणाल्या, निवडणुकांच्या निकालांनंतर तुम्ही सगळे नाराज आहात हे मी जाणतेच. आपला पक्ष आणखी मजबूत कसा करायचा याबद्दल मला अनेक सूचनाही आल्या आहे. त्यापैकी अनेक सूचना या समर्पक आहेत आणि मी त्यावर काम करत आहे.
ऐकावं ते नवलचं! जगातील पहिला कॉलर एसी, गळ्यात अडकवा अन् थंडगार वातावरणात फिरा
एप्रिल महिन्यातच ऊन इतकं आहे की, घराबाहेर पडण्याची सोय राहिलेली नाही. गरम वारे आणि सततचा घाम यामुळे काम करण्याची इच्छा होत नाही. अशावेळी तुम्हाला तुमच्यासोबत सतत असेल असा एसी मिळाला तर? ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे The Metaura Pro या कंपनीने. त्यांनी जगातील पहिला असा एसी तयार केला आहे जो तुम्ही चक्क गळ्यात घालून फिरू शकता. जगातील पहिलाच म्हणता येईल, असा हा पोर्टेबल एसी आहे. जो गळ्यात घातल्यानंतर तुम्हाला उकडणार नाही तर छान गारेगार वाटेल. हा एसी गळ्यात घालणाऱ्या व्यक्तीच्या आसपास थंड हवा राहील आणि त्याला कसं मस्त गारेगार वाटेल. या एसीला तुम्ही फॅन मोड किंवा कूलर मोडवर वापरू शकता. फॅन मोडवर सामान्य तापमान ते 7 डिग्री फॅरेनहाइट गार हवा मिळेल तर कूलिंग मोडवर 18 डिग्री फॅरेनहाइटपर्यंत गार हवा मिळू शकेल.
‘ही’ संकल्पना 20 वर्षे माझ्या डोक्यात; ‘त्या’वरुन माझं नाव कोणीही मिटवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस
कोणीही कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव समृद्धी महामार्ग प्रकल्पावरुन मिटवता येणार नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. ते नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. तसेच ते माझं श्रेय नाही, जनतेने त्यावेळेस मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी दिली. ही संकल्पना 20 वर्ष माझ्या डोक्यात होती, की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे आणि त्यावेळी आम्ही तो करू शकलो, असेही ते म्हणाले. समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे, त्याचा मला अतिशय आनंद आहे. मात्र, मला अजून एवढंच वाटतं की, त्याची कामं अजून पूर्ण झालेली नाहीत. कामं पूर्ण करुनच त्याचं उद्घाटन केलं तर ते अधिक चांगलं होईल. घाईघाईत उद्घाटन केलं तर त्या रस्त्याचं महत्त्व कमी होईल. मात्र, त्याचं कधीही उद्घाटन झालं तरी मी त्याचं स्वागतंच करेन.
मायक्रोसॉफ्ट कंपनीला
४७ वर्षे पूर्ण
मायक्रोसॉफ्ट हे आज तंत्रज्ञान जगतात खूप प्रसिद्ध नाव आहे. या कंपनीने जगभरात संगणकाची लोकप्रियता शिखरावर नेली. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पॉल ऍलन यांनी ४ एप्रिल १९७५ रोजी केली होती. या संगणक सॉफ्टवेअर कंपनीने ४ एप्रिल रोजी ४७ वर्षे पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने बिल गेट्स यांनी एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कंपनीच्या यशाचा अभिमान वाटून त्यांनी लिहिले की, कंपनी लोकांना सक्षम करण्यासाठी सतत काम करत आहे.
पाकिस्तानचे ४ YouTube
चॅनेल बंद करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ४ पाकिस्तानी YouTube चॅनेलसह २२ YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे. हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. मंत्रालयाने ३ ट्विटर अकाउंट, १ फेसबुक पेज आणि १ वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
आपण भारत आणि अमेरिकाविरोधी
नाही : इम्रान खान
इम्रान खान यांनी आपण भारतविरोधी आणि अमेरिकाविरोधी नसल्याचं म्हटलं आहे. एकमेकांचा सन्मान करणारं नातं आपल्याला इतर देशांसोबत जोडायचं आहे असंही इम्रान यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या गोंधळानंतर देशातील नागरिकांना संबोधित करताना इम्रान यांनी विरोधी पक्षावर हल्लाबोल केला. संसद बरखास्त केल्यानंतर निवडणुकीची तयारी करण्याऐवजी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे डोळे लावून बसण्याची संयुक्त विरोधकांची रणनीती हे “जनमताची भीती असल्याचं लक्षण आहे, असा टोला इम्रान यांनी विरोधाकांना लगावला आहे.
जळत्या आगीतुन पोलिसाने
वाचवले बाळाला
राजस्थानच्या करौलीमध्ये हिंसाचार सुरु होता. काही समाजकंटकांनी दुकानं जाळली. यावेळी सगळीकडे आग लागली होती. एका दुकानात एक चिमुरडा आणि दोन महिला अडकल्या होत्या. या दोन महिला आणि त्यांच्या हातात असणारं बाळ ते दृश्य पाहून घाबरलं होतं. पोलीस नेत्रेश यांची नजर त्यांच्यावर पडली. त्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यांनी बाळाला महिलेकडचा दुपट्टा घेऊन झाकलं आणि आपल्या छातीशी धरत सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. नेत्रेश आगीचे लोट उठत असताना मुलाला घेऊन धावतानाचा फोटो नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला. लोकांनी त्यांचं कौतुक केले.
२०१९-२० मध्ये भाजपाला मिळाली
सर्वाधिक ७२० कोटींची कॉर्पोरेट देणगी
कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संघटनांनी २०१९-२० या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांना ९२१.९५ कोटी रुपयांच्या देणग्या दिल्या. भाजपाला सर्वाधिक ७२०.४०७ कोटी रुपये मिळाले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM) ने या कालावधीत कॉर्पोरेट देणग्यांमधून कोणतेही उत्पन्न दाखवलेले नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालात ही माहिती समोर आली आहे. भाजपाला प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्टकडून २१६.७५ कोटी रुपये आणि काँग्रेसला ३१ कोटी रुपये मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. बी जी शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेडने २०१९-२० मध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक दान दिले.
SD social media
98 50 60 3590