राज्यात सध्या ईडीच्या कारवाईवरून जोरदार खडाखडी सुरू आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडीने कारवाईचा सपाटा लावला आहे. शिवसेनेची धडाडणारी तोफ संजय राऊत यांचीच संपत्ती ईडीने जप्त केली आहे. त्यामुळे दोन्ही बाजुने पुन्हा हल्लाबोल सुरू आहे. ही कारवाई कायदेशीर आहे, यात भाजपचा कुठलाही हस्तक्षेप नाही, असे भाजप नेते सांगत आहेत. तर ही कारवाई केवळ सूडबुद्धीने सुरू आहे. हा संजय राऊतांचा आवाज दाबण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, असे शिवसेना नेते सांगत आहेत. सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपवर या कारवाईवरून टीकेची झोड उडवली आहे. अशातच दिल्लीत शरद पवारांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला मात्र भाजप नेते नितीन गडकरी आणि संजय राऊत हे एकत्र दिसून आले. मग कारवाईनंतर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय? असा साहजिकच सवाल उपस्थित झाला.
शरद पवारांनी सर्वपक्षीय आमदारांना निमंत्रण दिलं होते. या ठिकाणी मंत्री नितीन गडकरीही पोहोचले आणि शिवसेना खासदार संजय राऊतही पोहोचले. या स्नेहभोजनावेळचा एक फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या फोटोत संजय राऊत हे शरद पवारांच्या उजव्या बाजुला बसलेले दिसत आहेत, मध्ये शरद पवार बसलेले आहेत, तर डाव्या बाजुला नितीन गडकरी बसलेले आहे. त्यामुळे यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ईडीच्या कारवाईबाबत चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित होणे साहाजिक आहे. त्यांची मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे सर्व मजकूर गुलदस्त्यात आहे.
काही दिवसांपासून राज्यात ईडीने कारवाईचा सपाटा लावला आहे. राज्यातले अनेक नेते ईडीच्या रडारावर आहेत. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत रोज आरोप प्रत्यारोप होत आहेत. राज्यातले नेते यावर फक्त व्यक्त होत नाहीयेत तर प्रकरण पार शिवीगाळ करण्यापर्यंत पोहोचले आहे. राजकीय आखाड्यात एकमेकांवर आरोपांची सरबत्ती करणारे नेते असे एकत्र दिसले की चर्चा तर होणारच, त्यामुळे पवारांच्या घरची ही भेट चर्चेत आहे. आपल्या महाराष्ट्रला मोठी राजकीय परंपरा आहे. या राजकीय परंपरेचे दर्शन अशा माध्यमातून अधूनमधून होत असते. आजही पुन्हा दिल्लीत तेच दिसून आलंय.