क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची आज पुण्यतिथी जाणून घ्या त्यांच्या विषयी..

महाराष्ट्राला देशभरात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाचा पाया क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी रचला. महात्मा फुले यांनी तत्कालीन समाजातील कर्मठ पुराणमतवाद्यांचा विरोध पत्कारत मुलींच्या शिक्षणासाठी शाळा सुरु केल्या आणि भारतातील स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा जोतिबा फुले यांचे हे कार्य क्रांतिकारक ठरलं. महात्मा फुले यांनी पुण्यात मुलींच्या शिक्षणासाठी 1848 शाळामध्ये सुरु केली. मुलींच्या शिक्षणासाठी प्रथम सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत समाजसुधारणेची सुरुवात स्वत:पासून केली तर समाजात मोठा घडवता येतो हे महात्मा फुले यांनी दाखवून दिलं. सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देत महात्मा फुले यांनी शाळा चालवल्या. महात्मा फुले यांचं सावित्रीबाई फुले यांच्या सक्रिय सहभागाच्या जोरावर स्त्री शिक्षणाचं आणि सामाजिक काम सुरु होतं. शुद्रातिशूद्र आणि स्त्रिया यांच्या दुःखमुक्तीचा आणि शोषणमुक्तीचा ध्यास जोतिबा फुले यांनी घेतला होता.

महात्मा फुले यांच्या काळात मुला मुलींचं लग्न वयाच्या आठव्या वर्षी करण्यात येत होती. जोतिबा फुले यांच्यासाठी वधू निवडण्याची जबाबदारी सगुणाईब यांनी घेतली होती. पुणे सातारा रस्त्यावरील शिरवळ पासून नायगाव येथे असलेल्या खंडोजी नेवसे पाटील यांची ज्येष्ठ कन्या सावित्री यांच्याशी जोतिबा फुले यांचा विवाह 1840 मध्ये झाला. महात्मा फुले यांना चौफेर वाचनाची आवड होती. त्यांच्यावर थॉमस पेन यांच्या राईटस ऑफ मॅन आणि एज ऑफ रिझन या ग्रंथाचा प्रभाव होता.

महात्मा फुले यांच्यासारख्या महापुरुषाच्या जीवनात एखादी घटना इतिहास निर्माण करणारी ठरते. 1848 मध्ये जोतिबा फुले यांच्या ब्राह्मण मित्राचं लग्न ठरलं होतं. त्याचं आमंत्रण जोतिबा यांना देखील मिळालं होतं. ते त्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते. जोतिबांना वरातीतील इतर ब्राह्मणांनी ओळखलं.’हा कोण शूद्र कुणबट!’ अशी कुजबूज त्यावेळी सुरु होती. जोतिबा फुले यांना अपमानित करुन मिरवणुकीतून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा महात्मा फुलेंवर मोठा परिणाम झाला त्यांनी उच्च नीच भेदभाव, वर्णजातीअहंकार, विषमता नष्ट करण्याचा निर्धार केला.

स्त्री शूद्रातिशूद्राना शोषणातून बाहेर काढण्याचा मार्ग शिक्षण प्रसार

विद्येविना मति गेली | मतिविना नीति गेली||
नीतिविना गति गेली | गतिविना वित्त गेले ||
वित्ताविना शूद्र खचले| इतके अनर्थ एका अविद्येने केले||

या ओळींतमधून शिक्षणाशिवाय कष्टकरी, मजूर वर्गाची काय स्थिती होते. शिक्षण ही गोष्ट नसली तर काय होतं याची मांडणी महात्मा फुले यांनी वरील ओळींतून केली आहे. महात्मा फुले यांनी 1848 मध्ये शाळा सुरु केल्यानंतर त्यांना विरोधाला सामोरं जावं लागलं. अनेक कारण देत विरोध सुरु होता. महात्मा फुले यांना गोपाळबाबा वलंगकर, राणबा महार. लहुजी साळवे यांनी अस्पृश्य समाजात शिक्षणाबद्दल जागृती करण्यास मदत केली. मुलींना शिकवण्यासाठी ख्रिस्ती शिक्षिका चालणार नव्हती. जोतिबा फुले यांच्यासमोरील ही अडचण सावित्रीबाईंना समजली. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षिका होण्याती तयारी दाखवली. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या, त्यांच्या सोबतचं फतिमा शेख या पहिल्या मुस्लीम प्रशिक्षित अध्यापिका आणि मुख्याध्यापिका ठरल्या.

स्त्री शिक्षासासोबत अस्पृश्य समाजाच्या हक्कासाठी आणि उद्धारासाठी महात्मा फुले यांनी काम केल. महात्मा फुले यांनी विविध ग्रंथांचं लेखन देखील केलं आहे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, सत्सार, सार्वजनिक सत्यधर्म, अखंडादि काव्यरचना, छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा, हंटर शिक्षण आयोगापुढं सादर केलेल निवेदन, इशारा आणि तृतीयरत्न नाटक या पुस्तकांचं लेखन महात्मा फुले यांनी केलं.

1887 नंतरचा काळ महात्मा फुले यांना आजारांना तोंड द्यावं लागलं. सावित्रीबाई फुले यांनी त्यांची खूप शुश्रषा केली. डॉ. खोले यांनी त्यांच्यावर उपचार केले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी देखील महात्मा फुलेंना मदत केली होती. मृत्यूपूर्वी ते दोन महिने आजारीचं होते. 28 नोव्हेंबर 1890 रोजी महात्मा फुले यांचं निधन झालं. क्रांतीसूर्य जोतिबा फुले आज आपल्यासोबत नसले तरी स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याच्या रुपानं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या रुपानं, विचारांच्या रुपानं ते जिवंत आहेत. त्यांचे विचार आणि कार्यक्रम हेच मार्गदर्शक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.