टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात गोल्ड मेडल विजेता नीरज चोप्राचं नाव आज पुण्यातील आर्मी स्टेडियमला देण्यात आलं. यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आर्मीतील ऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेच्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आलाय. यावेळी नाईक सुभेदार दीपक पुनिया यांचा विशेष मेडल देऊन सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसंच नाईक अर्जुनलाल जाट, नाईक सुभेदार विष्णू सर्वनंद, महाराष्ट्रातील नाईक सुभेदार अविनाश सावळे यांनाही यावेळी सन्मान केला गेला. त्यावेळी आर्मीतील ऑलिम्पिक खेळाडूंची शॉल देऊन नीरज चोप्राने राजनाथ सिंह यांचं स्वागत केलं.
आर्मीतील 23 खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या सर्व खेळाडूंचं राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं. आर्मी स्टेडियमनला नीरज चोप्राचं नाव देण्यात आलं, ही छोटी गोष्ट नाही. हा देशवासियांकडून करण्यात आलेला सन्मान आहे, असं सिंह यावेळी म्हणाले. ज्या भूमीवर आपण एकत्र आलो आहोत, तिचा इतिहास पाहा. हा खेळच होता ज्याने शिवा नावाच्या एका मुलाला छत्रपती शिवाजी महाराज बनवलं. गुरु रामदार, दादोजी कोंडदेव आणि जिजाऊ माँसाहेब लहानपणापासूनच त्यांना अशी शिकवण दिली होती, ज्यातून ते एक राष्ट्रनायक बनले. भारतीय सेनाही त्या परंपरेला पुढे घेऊन जात आहे. भारतीय खेळाच्या इतिहासात मेजर ध्यानचंद, कॅप्टन मिल्खा सिंग, कर्नल राजवर्धनसिंह राठोड, कॅप्टन विजयकुमार यांच्या परंपरेत आता सुभेदार नीरज चोप्रानेही आपलं नाव सुवर्ण अक्षरांमध्ये जोडलं आहे, अशा शब्दात राजनाथ सिंह यांनी नीरज चोप्राच्या कामगिरीचं कौतुक केलं.
नायब सुभेदार दीपक पुनिया आपल्या कांस्य पदकापासून काही अंतरावरुन चुकले, मात्र त्यांचं प्रदर्शन प्रशंसनीय होतं. त्यासह सुभेदार ओरोकिया राजीव यांचं 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये नवं आशियाई रेकॉर्ड बनवण्याचं प्रदर्शन कौतुकास पात्र आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले. खेळ माणसाला फक्त शारिरिक नाही तर सामाजिक, व्यावहारिक, भावनात्मक आणि मानसिक रुपानेही सुदृढ बनवतो. यामुळे माझं मत आहे की एका सैनिकात खरा खेळाडू दडलेला असतो. तर सच्च्या खेळाडूमध्ये एक सैनिक कायम असतो, असंही राजनाथ सिंह म्हणाले.
आयएएस बनण्याचे स्वप्न बाळगत असाल तर www.upscgoal.com या ब्लॉग ला भेट द्या.