आज दि. १८ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

sharad/sdnewsonline.com

खतांचे दर वाढवणं म्हणजे शेतकऱ्यांच्या
जखमेवर मीठ चोळल्यासारखं

राज्यातल्या खतांच्या वाढत्या किमतीबद्दल आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान शेतकऱ्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांचाही उल्लेख केला आहे. केंद्र सरकारने खतांच्या किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे करोनाच्या संकटाने शेतकरी आधीच होरपळून निघालेला असताना खतांचे दर वाढवणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं आहे, असंही पवार म्हणाले. पवार यांनी या पत्राविषयी ट्विट करत माहिती दिली आहे.

करोनातून बऱ्या झालेल्याना
नऊ महिन्यांनंतर लस

सरकारच्या एका समितीने करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना नऊ महिन्यांनंतर करोनाची लस देण्याचा सल्ला केंद्राला दिला आहे. लसीकरणासंदर्भातील ‘अ‍ॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनायझेशन’ या समितीने हा सल्ला दिला आहे. संसर्ग झाल्यानंतर आणि पहिला डोस घेण्यामध्ये अधिक अंतर असेल तर शरीरामध्ये अ‍ॅण्टीबॉडीज तयार होण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढण्यासाठी फायदा होईल.

चक्रीवादळात जहाज बुडाले,
२६० पैकी १४७ जणांना वाचवले

अरबी समुद्रात निर्माण झालेलं तौते चक्रीवादळ सोमवारी मुंबईपासून गुजरातच्या दिशेनं गेलं. रौद्रवतार धारण केलेल्या या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टी, मुंबईसह इतर शहरांना फटका बसला. चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने ‘बॉम्बे हायजवळच्या परिसरात ओएनजीसी’चं पी ३०५ (पापा-३०५) मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.

आमदार प्रताप सरनाईक
ईडीच्या रडारवर

बेहिशोबी मालमत्ता प्रकरणामुळे शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार प्रताप सरनाईक ईडीच्या रडारवर असून, त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरनाईक यांच्या लोणावळा येथील बंगल्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. ईडीचे अधिकारी सरनाईक यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत, अशी अधिकृत माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. टॉप्स ग्रुप कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारांबाबत ईडीकडून चौकशी केली जात आहे.

केरळ मंत्रिमंडळातून
शैलजा यांना डच्चू

केरळमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत डाव्यांची पुन्हा एकदा सत्ता आली आहे. सीपीआय (एम)च्या राज्य समितीने पिनरायी विजयन यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याबाबत खलबतं सुरु होती. मात्र नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. मागच्या सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या केके शैलजा यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला आहे.

व्हायरल माहिती करोनापेक्षा
धोकादायक ठरु शकते

अमेरिकेतले भारतीय वंशाचे सर्जन विवेक मूर्ती यांनी करोनासंदर्भातल्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीबद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. सध्या भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यात अडकले आहेत. अशावेळी नागरिकांनी घाबरुन न जाता आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या संकटाला सामोरं जायला हवं. आणि या संदर्भात काही गोष्टीही जाणून घ्यायला हव्यात. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होणारी माहिती किती धोकादायक ठरु शकते याबद्दलही डॉ. मूर्ती यांनी भाष्य केलं आहे.

परिस्थितीनुसार एक जूननंतर
लॉकडाउनचा निर्णय

ठाकरे सरकारने १ जूनपर्यंत राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. एकीकडे राज्य करोनाच्या संकटाला सामना देत असताना दुसरीकडे तौते चक्रीवादळाच्या निमित्ताने अजून एका संकटाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान पावसाळा तोंडावर आला असताना सरकारसमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता असून लॉकडाउन वाढणार की उठवणार हे पाहावं लागेल. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी लॉकडाउनवर भाष्य केलं आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिप
सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह

लिव्ह इन रिलेशनशिप हा भारतात नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. पारंपरिक पद्धतीने विवाहबंधनात न अडकता सोबत लिव्ह-इनमध्ये राहण्याचा ट्रेंड हल्ली दिसू लागला असून त्यावर संमिश्र भूमिका वेळोवेळी घेतल्या गेल्या आहेत. त्यामध्ये आता पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात घेतलेली भूमिका चर्चेत आली आहे. मुलीच्या कुटुंबीयांपासून संरक्षण मिळावं, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. “लिव्ह-इन रिलेशनशिप हे नैतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या अस्वीकारार्ह आहेत”, असं न्यायालयाने नमूद केलं आहे.

आम्ही मराठा समाजाचा प्रक्षोभ
शांत होऊ देणार नाही.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता राज्यभरात होऊ घातलेल्या आंदोलनांबाबत भाजपने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात भाजपचे (BJP) कार्यकर्ते सहभागी होतील. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ही माहिती दिली. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भाजप मराठा आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा केली. मराठा समाजाच्या नावाने आणि नेतृत्वात जी आंदोलने होतील त्यामध्ये भाजप पक्षीय ओळख बाजूला ठेवून सहभागी होईल, असे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

स्पुतनिक वी लसीचं वितरण
रेड्डीज लॅबोरेटरीज करणार

केंद्र सरकारनं भारतातील लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून रशियाच्या स्पुतनिक वी या लसीला परवानगी दिली आहे. स्पुतनिक लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात देखील झाली आहे. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुतनिक वी लसीचं वितरण करणार आहे. भारतात स्पुतनिक वी लसीकरण राबवणयासाठी आता डॉ. रेड्डीज आणि अपोलो हॉस्पिटल यांच्यातएक करार झाला आहे. या करारानुसार पहिल्या टप्प्यात हैदराबाद त्यानंतर विशाखापट्टणममधील अपोलो हॉस्पिटलमध्ये लस उपलब्ध होईल.

कोविशील्ड अवघ्या
250 रुपयांत उपलब्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला (Serum) भेट दिल्यानंतर एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोविशील्ड ही लस मोठ्याप्रमाणावर उपलब्ध करून देण्यासाठी मोदी सरकारने ‘सीरम’शी करार केला आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांना कोविशील्ड अवघ्या 250 रुपयांत उपलब्ध होणार आहे.

दीड कोटी रुपयांचा गुळवेल
पुरवठा करण्याची ऑर्डर

ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समुहाला एक कोटी सत्तावन्न हजार रुपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात गुळवेलमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा वापर रुग्ण बरे होण्यासाठी व्हावा म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. आयुर्वेदात याला गुडुची असं म्हटलं जाते. गुळवेलाचा वापर व्हायरल ताप, मलेरिया, शुगर अशा आजारांमध्ये औषध म्हणून केला जातो. कोरोना संकटाच्या काळात ठाण्यातील कातकरी समुहाच्या लोकांना गुळवेल गोळा करुन पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे.

मोदी सिस्टिमला झोपेतून
उठावं लागणार : राहुल गांधी

कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा वैज्ञानिकांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीका केली आहे. येणाऱ्या काळात लहान मुलांना कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे मुलांना सुरक्षित ठेवावं लागेल. त्यासाठी आवश्यक ती तयारी आतापासूनच केली पाहिजे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

छत्रपती संभाजी महाराजांवर
लवकरच येणार चित्रपट

छत्रपती संभाजी महाराजांवर चित्रपट बनवण्याच्या तयारी आता पूर्ण झाल्याचे कळते आहे. छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याचे राजे आणि छत्रपती शिवाजी महाराज पुत्र होते. त्यांची कहाणी आता या चित्रपटाद्वारे लोकांसमोर सदर केली जाणार आहे. या चित्रपटाचे नाव ‘शिवपुत्र संभाजी’ असे असणार आहे. अजित शिरोळे हा चित्रपट दिग्दर्शित-निर्मित करणार आहेत. या चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.