आज दि.५ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

अयोध्येत शाळीग्राम शिळा पोहोचल्या, पण छिन्नी, हातोडा नाही चालणार; संशोधकांचा मोठा खुलासा

अयोध्येत राम मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. प्रभू श्रीरामांच्या भव्य अशा मंदिराची उभारणी होत आहे. २०२४ च्या जानेवारी महिन्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती गर्भगृहात स्थापन होईल. मात्र ती कोणत्या स्वरुपात असेल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासूनव नेपाळहून आणण्यात आलेल्या दोन मोठ्या शिळांची चर्चा देशभरात होत आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांकडून या शिळांची पूजा केली जात आहे. पण राम भक्तांकडून जो दगड शाळीग्राम असल्याचं म्हटलं जातंय तो शाळीग्राम नसून देवशीला असल्याचा दावा दगडांवर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी केला आहे.

नेपाळच्या काली गंडकी नदीतून दोन मोठ्या शाळीग्राम शिळा अयोध्येत आणण्यात आल्या आहेत. दोन्ही शिळा अयोध्येतील रामसेवकपुरम इथं ठेवल्या आहेत. यातील एक शिळा २६ टनांची तर दुसरी शिळा १४ टनांची आहे. साधु-संत, महंत आणि राम भक्तांमध्ये याचीच चर्चा होत आहे. या शिळांमधून प्रभू रामचंद्रांसह चार भावांच्या प्रतिमा साकारल्या जाणार असल्याचं म्हटलं जातंय. यामुळेच मूर्ती तयार करण्यास सुरुवात होण्याआधीच त्याची पूजा- अर्चा केली जात आहे. पण यावर संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांनी मूर्तीच्या निर्मितीचा दावा फेटाळून लावला आहे.अयोध्येत आणलेल्या या शिळा मौल्यवान अशा आहेत. या देवशीळा असून लोखंडी अवजारांनी यातून मूर्ती निर्माण करणं अशक्य आहे. या शिळांमधून मूर्ती तयार करायची असेल तर हिरा कापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अवजारांचा वापर करावा लागेल. देवशीळा ७ हार्नेसच्या आहेत. त्यामुळे यावर लोखंडी छिन्नीने मूर्ती कोरता येणार नाहीत, कारण लोखंडात ५ हार्नेस आढळतात.

मुस्लिम समाजाबद्दल योगी आदित्यनाथ यांचे मोठे विधान

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम समाजाबद्दल मोठे विधान केले आहे. ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी यांनी योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.उत्तरप्रदेश राज्यात कायदा व सुव्यवस्थेत सुधारणा झाल्यामुळे हिंदूंचे सण शांततेत आणि कार्यक्षमतेने साजरे केले जात आहेत, त्याचप्रमाणे मुस्लिमांचे सणही चांगल्या पद्धतीने साजरे केले जात आहेत. राज्यात मुलींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या तर हिंदू मुलींबरोबरच मुस्लिम मुलींनाही त्याचा लाभ मिळत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक देणे हाच मुस्लिमांना एकत्र करण्याचा उत्तम मार्ग असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच सरकारने पिक एंड चूजचे धोरण टाळावे. कोणाचेही तुष्टीकरण हा लोकशाहीचा आत्मा नाही. लोकशाही सर्वांच्या पाठिंब्यावर, सर्वांचा विकास आणि सर्वांच्या प्रयत्नावर चालते, असे ते म्हणाले.

‘मला मार्ग सापडत नव्हता पण….’, श्री रविशंकर यांच्या हस्ते सन्मान होताच व्यक्त झाली अरुंधती

 ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका बनली आहे. या मालिकेचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेच्या माध्यमातून अरुंधती साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर  घराघरात पोहोचली आहे. मधुराणी प्रभुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्याबाबत प्रत्येक लहान-लहान अपडेट्स जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं. अशातच मधुराणीबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. अभिनेत्री आपल्या प्रत्येक अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते . सेटवरील सहकलाकारांपासून ते कुटुंबियांपर्यंत सर्वांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती शेअर करत असते. तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत असतं. आजही अभिनेत्रीने अशीच एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना खुश केलं आहे. अरुंधतीला नुकतंच अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. शिवाय भलीमोठी एकपोस्टसुद्धा लिहली आहे.

चार आत्महत्या, मोबाईल अन् अंधश्रद्धा! पॅटर्नही सेम, कोल्हापूरच्या गावात खळबळ

सीरियल सुसाईडमुळे कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वाकरे गावात दीड महिन्यात चार युवकांनी आत्महत्या केल्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे. मोबाईल आणि अंधश्रद्धेच्या एँगलने या प्रकरणाचं गूढ वाढत चाललं आहे. गावात लागलेल्या श्रद्धांजलीच्या बॅनर्सनं गावकऱ्यांचा थरकाप उडतो आहे. गावातल्या 22 ते 27 या वयातल्या चार तरुणांनी आत्महत्या केली आहे, त्यामुळे गावात भीती पसरली आहे.भीतीमुळे गावातल्या रस्त्यांवरची वर्दळही कमी झाली आहे. दीड महिन्यात तिघांनी विष प्राशन केलं तर एकाने गळफास घेतला. 9 डिसेंबर 2022 ला युवराज पोवारने आत्महत्या केली. चारच दिवसांनी म्हणजेच 13 डिसेंबर 2022 ला शुभम पोवारने जीवन संपवलं. 17 जानेवारी 2023 ला नितीन मोरेनं जीवनप्रवास थांबवला, तर 31 जानेवारी 2023 ला विशाल कांबळेनं आत्महत्या केली.

मुख्यमंत्र्यांचा फोन, राज ठाकरेंचं पत्र, तरीही कसबा-चिंचवडच्या पोटनिवडणुका होणार!

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना फोनही केले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांनी शनिवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला. याशिवाय राज ठाकरे यांनीही पोटनिवडणुकांमध्ये महाविकासआघाडीने उमेदवार देऊ नये, असं पत्र लिहिलं आहे. भाजपकडूनही या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, पण काँग्रेस या दोन्ही निवडणुका लढण्यावर ठाम आहे.कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या महाविकासआघाडीकडून अर्ज भरण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ‘एकनाथ शिंदे यांचा फोन आला होता. मी म्हणलं चर्चा करू. काल भाजपची उमेदवारी जाहीर झाली, टिळकांना डावललं गेलं. आता मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला अर्थ नाही. पुण्यात पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहतील,’ असं नाना पटोले यांनी सांगितलं.

‘संपत्ती वाढली नाही, कागदपत्रं तपासा’, सुप्रिया सुळेंनी फेटाळला तो अहवाल

दुसऱ्यांदा खासदार होणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाली आहे, याबाबतचा एक अहवाल समोर आला आहे. भाजपचे 43, काँग्रेसचे 10, तृणमूल काँग्रेसचे 7, बीजेडी आणि शिवसेनेचे प्रत्येकी 2-2 खासदार आहेत. तर जेडीयू, एमआयएम, एनसीपी, शिरोमणी अकाली दल, एआययुडीएफ, आययूएमएल, नॅशनल कॉन्फरन्स यांच्या 1-1 खासदाराचा समावेश आहे. यातल्या महाराष्ट्राच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या संपत्तीत तब्बल 89 कोटींची वाढ झाल्याचं या अहवालाक नमूद करण्यात आलं आहे. तर रावसाहेब दानवे यांच्या संपत्तीमध्ये 20 कोटींची, प्रतापराव जाधव यांच्या संपत्तीत 10 कोटींची, भावना गवळी यांच्या संपत्तीत 6 कोटींची वाढ झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

धक्कादायक…! पीएसएल सामन्यादरम्यान स्टेडीयमजवळ मोठा बॉम्बस्फोट, तरी पाकिस्तान आशिया चषकावर ठाम  

पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील पाकिस्तान सुपर लीगचा प्रदर्शनीय सामना क्वेट्टा येथील मुसा चौक येथे स्फोट झाल्याच्या वृत्तानंतर रद्द करावा लागला. बुगाती स्टेडियममध्ये प्रदर्शनीय सामना खेळला जात असलेल्या सामन्यापासून स्फोटाचे ठिकाण केवळ १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात पाकिस्तानच्या अनेक स्टार खेळाडूंशिवाय माजी क्रिकेटपटूंचाही सहभाग होता.

मात्र, नंतर सामना पुन्हा सुरू झाला. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तेथील चाहत्यांनी स्टेडियमची तोडफोडही केली. स्टेडियमबाहेरील प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक केली. मैदानाच्या आतून शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये धूरही दिसत आहे, असे म्हटले जात आहे की, स्थळाबाहेरील लोकांनी काहीतरी पेटवले होते, ज्यामुळे आग लागली.

“शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगारांना दरमाहा १००० रुपये”, त्रिपुरा निवडणुकीसाठी TMC कडून ‘बंगाल मॉडेल’चं वचन

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कांग्रेस पक्षाने त्रिपुरा विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी (०५ फेब्रुवारी) आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये तृणमूलने २ लाख नोकऱ्या, चौथी ते आठवी इयत्तेत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बेरोजगार तरुणांना दर महिन्याला १,००० रुपये तसेच बेरोजगार तरुणांसाठी समाजकल्याण योजनांचं आश्वासन दिलं आहे.तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी उद्यापासून (६ फेब्रुवारी) त्रिपुराच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. त्याच्या आदल्या दिवशी पक्षाने त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्रिपुरामध्ये १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. तृणमूल कांग्रेस पक्ष त्रिपुरातल्या २८ जागांवर निवडणूक लढवणार आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.