‘बोले रे पपीहरा’, ‘हमको मन की शक्ती देना’..‘टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले’, ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी..’ अशा हिंदी मराठीसह १९ भाषांतील दहा हजारांहून अधिक गाण्यांना आपल्या स्वरांनी सजवणाऱ्या प्रख्यात गायिका वाणी जयराम यांचे शनिवारी निधन झाले. त्या ७७ वर्षांच्या होत्या.
घरी एकटय़ाच असताना त्यांचे निधन झाले. त्यांना नुकताच पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. त्यांना तीनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. विविध राज्यांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हिंदूी-दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली.पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या घरी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांचीही वर्दळ वाढली होती. त्यांना अनेकांचे अभिनंदनाचे दूरध्वनी येत होते. त्यांनी सर्वाना उत्तरे देत आभार मानले होते. तमिळनाडूतील वेल्लोरमधील कलैवानी येथे ३० नोव्हेंबर १९४५ रोजी जन्मलेल्या वाणी जयराम विविध भाषांमधील अष्टपैलू गायिका होत्या. त्यांनी हिंदूी तमिळ, मल्याळम, तेलुगू, कन्नड, उडिया, तुलू व मराठीसह १९ भाषांत १० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून तीनदा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
आपल्या ५० वर्षांहून अधिक प्रदीर्घ व गौरवशाली कारकिर्दीत त्यांनी हिंदूी चित्रपट ‘गुड्डी’मधील (१९७१) ‘बोले रे पपीहरा’, ‘हमको मन की शक्ती देना’, ‘हरी बिन कैसे जियू री’, १९७९ मध्ये आलेल्या गुलजार यांच्या संत मीरा चित्रपटातील ‘ए री मै तो प्रेमदिवानी’, ‘मेरे तो गिरीधर गोपाल’ आदी गाणी आपल्या समर्थ स्वरांनी लोकप्रिय केली. तमिळ चित्रपट ‘अपूर्व रागांगल’मधील (१९७५) मधील ‘येझू स्वरंगलुकुल’ व तमिळ चित्रपट दीरगा सुमंगलीमधील (१९७४) ‘मल्लीगाई एन मन्नान मायांगम’सह अनेक संस्मरणीय गाणी त्यांच्या नावावर आहेत. एम. एस. विश्वनाथन, इलिया राजा यांसारख्या प्रख्यात संगीतकारांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. तमिळनाडूच्या एके काळच्या विख्यात चित्रपटतारका आणि दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यासाठी अनेक गीतांना वाणी जयराम यांचं पार्श्वगायन लाभले आहे.
वाणी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन म्हणाले की, पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड झाली तेव्हा आपण त्यांचे अभिनंदन केले होते. हा पुरस्कार प्रदान होण्यापूर्वीच त्यांचे निधन होणे दु:खदायक आहे.तेलंगणाच्या राज्यपाल तमिलिसाई सौंदर्यराजन यांनीही शोक व्यक्त केला. संगीतकार व गायिका महाथी यांनी सांगितले, की त्या पाय जमिनीवर असलेल्या नम्र गायिका होत्या.
एकाकी अवस्थेत मृत्यू
वाणी जयराम यांच्या पतीचे पूर्वीच निधन झाले आहे. त्या एकटय़ा रहात होत्या. त्यांच्याकडे दहा वर्षे घरकाम करणारी महिला वालीं मलारकोडमी ही नेहमीप्रमाणे शनिवारी त्यांच्या घरी आली. दरवाजाची घंटा बऱ्याचदा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्याने तिने वाणी जयराम यांच्या नातलगांना तातडीने ही माहिती दिली. या नातलगांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी दुपारी दीडच्या सुमारास वाणी जयराम यांच्या नातलगांच्या उपस्थितीत पर्यायी किल्लीने घराचा दरवाजा उघडला. आत वाणी जयराम या मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या कपाळावर जखम आढळली. परंतु त्या घरातच पडल्याने ही जखम झाली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. त्यांना आरोग्याच्या समस्या होत्या का, असे विचारल्यानंतर मालारकोडीने त्यांची तब्येत चांगली होती असे सांगितले.
मराठीतील लोकप्रिय गीते
मराठीमध्ये वसंत देसाई, दत्ता डावजेकर, राम कदम, दशरथ पुजारी आदी दिग्गज संगीतकारांकडेही वाणी जयराम यांनी अनेक लोकप्रिय गीते गायली आहेत. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले, माळते मी माळते केसात पावसाची फुले मी माळते, उठा उठा हो सूर्यनारायणा, बलसागर भारत होवो, सुखाचे हे सुख श्रीहरी मुख.. अशी त्यांनी गायलेली अनेक मराठी गाणी लोकप्रिय आहेत.