पुणे शहरात डेल्टा प्लसचा
पहिला रुग्ण आढळला
करोना संकटाचं संकट असताना डेल्टा प्लसचेही रुग्ण वाढत असल्याचं दिसत आहे. मुंबईत शुक्रवारी डेल्टा प्लसमुळे एका महिलेच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर आता पुण्यातही डेल्टा प्लसचा रुग्ण सापडला आहे. पुणे शहरात डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण आढळला असून जिल्ह्यातील एकूण संख्या सहा आहे. राज्यात ८० टक्क्यांहून अधिक नमुन्यांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळत असल्याचं दिसून येते आहे. राज्यात आतापर्यंत ६६ डेल्टा प्लस व्हेरीयंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
देशातील १,३८० पोलिसांना
उत्कृष्ट सेवेकरिता पदक जाहीर
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १,३८० पदक विजेत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ अधिकाऱी, कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस शौर्य पदक’ तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस पदक’ आणि ११ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ पटकावले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशन अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘अग्निशमन सेवा शौर्य पदक’ जाहीर झाले आहे. या सर्वांचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन, तसेच त्यांच्या धडाडीचे कौतुक केले आहे.
अफगाणिस्तानमध्ये
संघर्षाची शक्यता वाढली
तालिबानी सैन्य राजधानी काबूलजवळ दाखल झालं असून त्यांच्यात आणि सरकारी लष्करी दलांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. तसंच बंडखोरांनी मजार-ए-शरीफवर हल्ला केला आहे. यादरम्यान अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घानी यांनी देशवासियांनी संबोधित केलं असून अस्थिरतेचं मोठं संकट निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. पण याचवेळी त्यांनी २० वर्षांत मिळवलेलं सगळं इतक्या सहजतेने जाऊ देणार नाही असा निर्धारही व्यक्त केला आहे.
मिलिंद नार्वेकर यांना ईडी,
सीबीआयची चौकशीची धमकी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू – सहकारी तसेच स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअॕपवर धमकी मिळाल्याचे वृत्त आहे. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू अशी धमकी अज्ञाताने दिली आहे. मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात पोलिसांकडे रितसर तक्रार केली आहे.
आदी गोदरेज यांनी दिला कंपनीच्या
चेअरमनपदचा राजीनामा
देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि गोदरेज इंडस्ट्रिजचे चेअरमन आदी गोदरेज यांनी कंपनीच्या चेअरमनपद आणि संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. आदी यांचे लहान भाऊ नादीर गोदरेज हे येत्या एक ऑक्टोबरपासून कंपनीच्या चेअरमनपदासह व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारणार आहेत, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या नादीर गोदरेज हे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर कार्यरत आहेत.
लाच घेतल्याप्रकरणात सहभागी
शिक्षक पंकज दशपुते याचे निलंबन
८ लाखांची लाच घेतल्याप्रकरणात सहभागी असलेला जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षक पंकज रमेश दशपुते याचे निलंबन करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बनसोड यांनी काढले आहेत. दशपुते हा नाशिक तालुक्यातील राजेवाडी शाळेवर प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांच्यासह त्यांचा वाहन चालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला रंगेहाथ सापडले.
देशांतर्गत हवाई
प्रवास महागणार
सरकारने देशांतर्गत मार्गासाठी किमान आणि कमाल विमानभाडे मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ते भाडे 9.83 टक्क्यांवरून 12.82 टक्के करण्यात आले. कोरोना संकटामुळे अनेक महिन्यांपासून हवाई प्रवास बंद होता. लॉकडाऊननंतर 25 मे 2020 रोजी हवाई सेवा सुरू करण्यात आली आणि त्याच वेळी सरकारने लोअर आणि अप्पर मर्यादा निश्चित केली होती.
पेट्रोल आणि डिझेलचे
दर 27 दिवसांपासून स्थिर
महिनाभरापूर्वी दररोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या दरवाढीला अखेर लगाम बसल्याचे दिसत आहे. कारण, गेल्या 27 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत सध्या प्रतिलीटर पेट्रोलसाठी 107.83 रुपये तर डिझेलसाठी 97.45 रुपये मोजावे लागत आहेत. 17 जुलै रोजी दरात शेवटची दरवाढ नोंदवली गेली होती.
पोलीस अधिकाऱ्याची
गळफास घेऊन आत्महत्या
अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक (PSI) पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अनिल मुळे असं या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. या आत्महत्येनं गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.
आठवड्यातील तीन दिवस
नांदेडवरुन तिरुपतीसाठी विमान
आंध्रप्रदेश राज्यातील श्री तिरुपती बालाजी देवस्थानचे (Tirupati Balaji) जागतिक पातळीवर अनन्य साधारण महत्व आहे. नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो भाविक तिथे जात असतात. तिरुपतीला जाण्यासाठी नांदेडहून विमानसेवा असावी अशी मागणी भाविकांची होती. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण प्रयत्नात होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून आता नांदेड-तिरुपती व्हाया हैदराबाद ही विमानसेवा येत्या 17 ऑगस्टपासून ही सुरु होणार आहे.
माकड अंगावर बसल्याची धास्ती,
चिमुरड्याचा हृदयविकाराने मृत्यू
नांदेडमध्ये अंगावर माकड बसल्याच्या दहशतीने एका चिमुकल्याचा बळी गेलाय. मुदखेड तालुक्यातील बारड गावातील ही घटना आहे. माकड अंगावर येऊन बसल्याची चिमुरड्याने एवढी धास्ती घेतली की त्याला त्याच भीतीने हृदयविकाराने झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. वीर नागेश संगेवार हा घरासमोर खेळत होता. त्याचवेळी एक माकड त्याच्या अंगावर येऊन बसले. त्यानंतर या मुलाने भयंकर धास्ती घेतली. त्यातच त्याला ताप आल्याने त्याला नांदेडच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या, त्या सर्व नॉर्मल आल्या. 13 ऑगस्ट रोजी ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
SD social media
9850 60 3590