महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (HSC Exams) उद्या म्हणजेच शुक्रवार दिनांक 4 मार्चपासून प्रारंभ होत आहे. परीक्षासाठी बोर्डाकडून (HSC Board) जय्यत तयारी करण्यात आली आहे. परीक्षेच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध भरारी पथकांचीही स्थापना करण्यात आली आहे. मराठवाडा विभागातील पाच जिल्ह्यांमधून सुमारे 1, 69, 289 विद्यार्थी बारावीची परीक्षा देतील.
औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील 408 केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणार आहे. विभागात 1 लाख 69 हजार 289 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या पार्श्वभूमीवर बोर्डाने तयारीदेखील सुरु केली आहे.
तर विद्यार्थ्यांनीही ऑनलाइनचा विषय टाळून ऑफलाइन परीक्षेसाठी तयारी केली आहे. बारावीची ही परीक्षा 07 एप्रिलपर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षआ 15 मार्च ते 04 एप्रिल पर्यंत चालणार आहे. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून परीक्षा द्यावी, असे आवाहन विभागीय मंडळाच्या अध्यक्ष व सचिवांनी केले आहे.