राज्य सरकारे संचारबंदी व टाळेबंदी लावत असल्यामुळे देशभरात स्थलांतरित मजुरांचे स्थलांतर पाहायला मिळत आहे. आपण मोठ्या शहरातच राहिलो तर आपला निवारा व उपजीविकेचे साधन गमावले जाईल या भीतीने हजारो कामगार ही शहरे सोडून त्यांच्या मूळ गावी परतत आहे.
मजुरांनी त्यांच्या गृहगावी परत जाऊ नये यासाठी त्यांचे मन वळवावे, असे आवाहन मंगळवारी रात्री देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारांना केले होते. या मजुरांना रोजगार गमवावा लागणार नाही, अशी हमीही त्यांनी दिली होती. तथापि, टाळेबंदी अनिवार्य असल्याबाबतची भीती काढून टाकण्याचा प्रयत्न पंतप्रधानांनी केला असला, तरी देशभरात स्थलांतरित मजूर शहरांमधून व गावांमधून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये अमर्याद वाढ होत असल्याने हजारो स्थलांतरित मजूर शहराबाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी बस स्थानके व रेल्वे स्थानकांवर धाव घेत आहेत. गेल्या वर्षीच्या टाळेबंदीदरम्यान झालेल्या सामूहिक स्थलांतरापासून धडा घेतलेल्या दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सर्व १५ जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना स्थलांतरित मजुरांचे समुपदेशन करावे, असे निर्देश दिले आहेत. टाळेबंदीच्या अफवांमुळे आंतरराज्य बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांवर गर्दी होण्याचा अंदाज आल्याने विशेष शाखेने जिल्हा पोलिसांना रात्रीची गस्त वाढवण्याचीही सूचना केली आहे.