ठाणे जिल्ह्यातील आदिवासी समुहाला एक कोटी सत्तावन्न हजार रुपयांचा गुळवेल पुरवठा करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या लढ्यात गुळवेलमध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांचा वापर रुग्ण बरे होण्यासाठी व्हावा म्हणून हा प्रयत्न करण्यात येत आहे. आयुर्वेदात याला गुडुची असं म्हटलं जाते. गुळवेलाचा वापर व्हायरल ताप, मलेरिया, शुगर अशा आजारांमध्ये औषध म्हणून केला जातो. कोरोना संकटाच्या काळात ठाण्यातील कातकरी समुहाच्या लोकांना गुळवेल गोळा करुन पुरवठा करण्यासाठी ऑर्डर मिळाली आहे.
गुळवेल जमा करुन पुरवठा करण्याची ऑर्डर ट्रायफेडकडून देण्यात आली आहे. भारतीय जनजातीय सहकारी विपणन विकास परिसंघ (TRIFED) यांच्याकडून गुळवेल खरेदी करण्यात येणार आहे. ट्रायफेड ही आदिवासी समुहाकडून तयार करण्यात आलेली उत्पादन विकण्यासोबत समन्वयक म्हणून देखील काम करते.
ठाण्यातील आदिवासी 27 वर्षांच्या सुनील या युवकानं सुरुवातीला 10 ते 12 मित्रांच्या सहकार्यानं गुळवेल गोळा करणे आणि कंपन्यांना पुरवठा करण्याचं काम सुरु केलं होतं. सुनील यांच्या ग्रुपसोबत आता 1800 हून अधिक लोक जोडले गेले आहेत. ट्रायफेडच्या सहकार्यानं सुनील यांनी कामाची व्याप्ती वाढवली आहे. सुनील यांना निधीची आवश्यकता होती, त्यावेळी ट्रायफेडकडून 25 लाखांची मदत देखील करण्यात आली.
सुनील त्यांच्या कामाविषयी बोलताना सांगतात की, कोरोनाच्या संकटकाळात आम्ही स्वत:च्या कमाईवर जगतोय याचा आनंद वाटतो. आमच्याकडे आता 1.5 कोटी रुपयांची ऑर्डर आहे. पुढील काळात डाबर कडून देखील ऑर्डर मिळू शकते, असं सुनील म्हणाले.
सुनील सांगतात की ते आतापर्यंत गुळवेल जमवून कंपन्यांना विकत होते. त्याला दर कमी मिळतो आता मात्र पुढील काळात गुळवेल पावडर करुन विकणार आहोत. यामुळे एक किलो पावडरला आम्हाला 500 रुपयापर्यंत दर मिळेल. गुळवेलची वाढती मागणी लक्षात घेता पुढील काळात कमतरता जाणवू नये म्हणून त्याची रोपवाटिका तयार करणार असल्याचं त्यांनी सांगितले.