महाराष्ट्राला अवकाळी पावसानं झोडपलं
राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.सातारा , नाशिकनंतर पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये धुवादार पाऊस बरसत आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अचानक गारपीट आली आणि शेतकऱ्याच्या शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं या गारपिटीमुळे वाया गेली असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
सांगलीत सुरु झालेल्या दौडीने मुंबईत शहीदांना अभिवादन
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सांगलीतून शहीद अशोक कामटे स्मुर्ति फाऊंडेशनच्या वतीने ४७० किलोमीटर दौडींने रविवारी शहीदांना अभिवादन करण्यात आले.
मोहम्मद शमीने अपघातग्रस्त तरुणाला वाचवलं
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एका अपघातग्रस्त तरुणाला वाचवलं आहे. संबंधित तरुणाचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याची कार थेट डोंगराळ रस्त्यावरून खाली कोसळली. यावेळी मोहम्मद शमी आपल्या कारने पाठीमागून येत होता. हा अपघात पाहिल्यानंतर मोहम्मद शमीने तातडीने आपली कार थांबवली आणि अपघातग्रस्त तरुणाला मदत केली. याबाबतचा एक व्हिडीओही शमीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
चीनमध्ये गूढ न्यूमोनियाचा उद्रेक…
चीनच्या उत्तर भागात बालकांमध्ये श्वसनाचे विकार वाढल्यानंतर याबाबत माहिती देण्यासाठी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. उत्तर चीनमधील शैक्षणिक संस्थांमधून गूढ न्यूमोनियाचा उद्रेक झाल्याचे त्यांनी सांगितले. करोनासारखाच हा श्वसनविकार असून अनेक बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चीनमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या श्वसनविकारवाढीचा संबंध इन्फ्लूएंझा, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया, बॅक्टेरियाचा संसर्ग यांच्याशी जोडला असून हा आजार विशेषत: लहान मुलांना होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार बालकांमध्ये श्वसन आणि न्यूमोनियाशी संबंधित आजार आढळून आले आहेत, मात्र त्याची लक्षणे न्यूमोनियापेक्षा वेगळी आहेत. मुलांमध्ये तीव्र ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे दिसून येतात. काही मुलांमध्ये फुप्फुसाला सूज येणे, तीव्र ताप आणि श्वसनविकारांसबंधी अन्य लक्षणेही दिसून आली आहेत. चिनी अधिकाऱ्यांनी आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्तर चीनमध्ये गेल्या तीन वर्षांच्या याच कालावधीच तुलनेत इन्फ्लूएंझासारख्या आजारांमध्ये अधिक वाढ झाली आहे.
बचावकार्यात अडथळय़ांची मालिका; बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी अनेक आठवडे लागण्याची शक्यता
खोदकाम करणारे ऑगर यंत्र ढिगाऱ्यात निकामी झाल्यामुळे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला शनिवारी अन्य पर्यायांचा शोध घेणे भाग पडले. कोसळलेल्या बोगद्यातील ढिगारा कामगारांमार्फत उपसणे किंवा बोगद्याच्या टेकडीवरून ८६ मीटरचा उभा मार्ग तयार करणे या दोन पर्यायांवर विचार सुरू आहे. त्यामुळे कामगारांच्या सुटकेला अनेक आठवडे लागण्याची शक्यता आहे.कामगारांच्या सुटका मोहिमेबद्दलची माहिती राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (एनडीएमए) सदस्य लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सईद अता हसनैन यांनी शनिवारी पत्रकारांना दिली. ते म्हणाले,‘‘अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी आणखी काही कालावधी लागेल. आता बोगद्याच्या वरच्या बाजूने टेकडीवरखोदकाम करून पर्यायी उभा बचाव मार्ग तयार करण्यावर लक्ष केंद्रीत केले असून येत्या २४ ते ३६ तासांत थांबलेली मोहीम पुन्हा सुरू करण्यात येईल.’’ कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी बोगद्याच्या वरच्या बाजूने सुमारे ८६ मीटर खोदकाम करण्याची गरज आहे, असेही हसनैन यांनी सांगितले.
तेलंगणात काँग्रेस की चंद्रशेखर राव सत्ता राखणार ?
पाचपैकी चार राज्यांमध्ये मतदान पूर्ण झाल्याने साऱ्यांच्या नजरा आता तेलंगणामधील अखेरच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानावर आहेत. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा भारत राष्ट्र समिती पक्ष सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेचा सोपान गाठणार याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.तेलंगणात येत्या गुरुवारी (३० तारीख) मतदान होत आहे. निवडणूक आधी एकतर्फी होईल आणि चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली भारत राष्ट्र समिती सत्तेची हॅटट्रिक पूर्ण करेल, असेच एकूण चित्र होते. पण काँग्रेसने कर्नाटकच्या विजयानंतर तेलंगणात जोरदार मुसंडी मारली. काँग्रेसने अखेरच्या टप्प्यात मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या फेस आणला आहे. काँग्रेसला आधी फारसे महत्त्व न देणाऱ्या चंद्रशेखर राव यांना अखेरच्या टप्प्यात काँग्रेसवर सातत्याने टीका करावी लागत आहे. इंदिरा गांधी यांच्यापासून काँग्रेसवर टीका करीत आहेत. याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या पराभवावर चंद्रशेखर राव टिप्पणी करीत आहेत.
रशियाचा युक्रेनवर भीषण ड्रोन हल्ला; राजधानी कीव्ह लक्ष्य
रशियाने युक्रेनवर २०२२ मध्ये आक्रमण केल्यानंतर आतापर्यंतचा सर्वात घातक ‘ड्रोन’ हल्ला शनिवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर केला. युक्रेनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी हा दावा केला आहे.युक्रेनच्या हवाई दलाचे कमांडर मायकोला ओलेश्चुक यांनी त्यांच्या ‘टेलिग्राम’वर नमूद केले की, रशियाच्या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने कीव्हला लक्ष्य केले गेले. युक्रेनच्या सशस्त्र दलांनी सांगितले की, रशियाने सुमारे ७५ इराणनिर्मित ‘शाहेद ड्रोन’सह युक्रेनवर हल्ला केला. त्यापैकी ७१ ‘ड्रोन’ पाडण्यात यश मिळाले आहे. कीव्ह शहर प्रशासनाचे प्रमुख सेर्ही पोप्को यांनी सांगितले की, कीव्हवर ‘ड्रोन’द्वारे करण्यात आलेला हा सर्वात प्राणघातक हवाई हल्ला होता. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार पहाटे चारच्या सुमारास सुरू झाला. तो सहा तासांपेक्षा जास्त काळ चालला. ते म्हणाले की, हल्ल्यामुळे ७७ निवासी इमारती आणि १२० कार्यालयांतील वीजपुरवठा खंडित झाला होता.
आगामी अर्धशतक भारताचा अमृतकाळ; परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांचे मत
भारताला स्वत:चे असे एक कथानक असणे आवश्यक आहे. ‘ग्लोबल साऊथ’ हे त्याचे उत्तम उदाहरण असून, आता भारत हा ‘ग्लोबल साऊथ’चा चेहरा झाला आहे. यापूर्वी कधीही वापरला न गेलेला हा शब्द आधी आता तो भारताला उद्देशून वापरला जात आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. आगामी ५० वर्षांतील जग हे आपण गेल्या ५० वर्षांत पाहिलेल्या जगापेक्षा पूर्णपणे वेगळे असेल. हे अर्धशतक भारताचा अमृतकाळ असेल, असेही त्यांनी सांगितले.
मोदींची तेजस विमानातून आकाशभरारी !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तेजस विमानातून उड्डाण केले. या अनुभवामुळे देशाच्या स्वदेशी क्षमतेवर विश्वास अधिक दृढ झाल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले. ‘तेजस’चे यशस्वी उड्डाण झाल्याचे ‘एक्स’वर मोदींनी आवर्जून नमूद केले. मोदींनी नमूद केले की, हा अनुभव अविश्वसनीय होता. यामुळे आपल्या देशाच्या स्वदेशी निर्मितीक्षमतेवरील माझा विश्वास आणखी वृद्धिंगत झाला आहे. आपल्या राष्ट्रीय क्षमतेविषयी माझ्यात आणखी नवा आशावाद आणि अभिमान निर्माण झाला आहे. त्यांनी असेही लिहिले की, आज ‘तेजस’मध्ये उड्डाण केल्यानंतर मी अभिमानाने सांगू शकतो की आमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे आम्ही स्वावलंबी झालो आहोत.
मुंबईकडून आर्चरला, कोलकाताचा शार्दुलला निरोप, धोनी पुढचं आयपीएल खेळणार?
टी-२० क्रिकेट चाहत्यांना आगामी इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले आहेत. अशातच आज आयपीएलच्या सर्व १० संघांनी आपल्याकडे कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) आणि संघातून मुक्त (रिलीज) केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. रिलीज केलेले खेळाडू आणि नवीन खेळाडूंसह जवळपास ५०० हून अधिक खेळाडूंचा लवकरच लिलाव होणार आहे. त्यानंतर सर्व संघ आयपीएल २०२४ साठी सज्ज होतील. दरम्यान, गुजरात टायटन्स या संघाने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी पाहून अनेकांना धक्का बसला आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. गुजरातचा संघ पांड्याला संघातून मुक्त करणार असून तो आता मुंबई इंडियन्सकडून खेळणार असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु, या सगळ्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण हार्दिक पांड्या आयपीएल २०२४ मध्येदेखील गुजरातकडूनच खेळताना दिसेल.
‘ऑलिम्पिक कोटा’ मिळविणाऱ्या कुस्तीगिरांनाही चाचणी अनिवार्य!
जागतिक संघटनेकडून बंदी घालण्यात आलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहणाऱ्या हंगामी समितीने आश्चर्यकारक निर्णय घेण्याची प्रथा कायम ठेवली आहे. २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवणाऱ्या कुस्तीगिरांनाही या स्पर्धेसाठी भारताच्या संघात थेट स्थान मिळणार नाही. त्यांनाही पात्रता सिद्ध करण्यासाठी निवड चाचणीत खेळणे अनिवार्य करण्याचा निर्णय हंगामी समितीकडून घेण्यात आला आहे.
SD Social Media
9850603590