भाषा विभागाचे कार्यालय कोकण विभागातच, स्थलांतराचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाकडून मागे
कोकण भवनमधील भाषा संचालनालयाचे विभागीय कार्यालय पावसाळ्यात पाण्यात ‘बुडविण्याचा’ आपलाच निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मागे घेतला आहे. कोकण भवन इमारतीमधील तळमजल्यावर कार्यरत असलेल्या उप कोषागार कार्यालयाला तिसऱ्या मजल्यावरील विभागीय भाषा संचालनालय व विभागीय भाषा कार्यालयास तळमजल्यावरील उप कोषागार कार्यालयाची जागा देण्याचा ७ जानेवारी, २०२१ रोजीचा शासन निर्णय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकताच रद्द केला आहे. त्यामुळे भर पावसात कार्यालयात पाणी शिरण्याचे विभागीय भाषा संचालनालय कार्यालयावरील संकट टळले आहे.
नवी मुंबईतील बेलापूर सीबीडी येथे असलेल्या कोकण विभागीय कार्यालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर कक्ष क्रमांक-३१५ येथे विभागीय सहायक संचालक, भाषा संचालनालय यांचे कार्यालय आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावरील कक्ष क्रमांक जी-१६ येथे उप कोषागार (ट्रेझरी) कार्यालय आहे. पावसाळ्यात कोकण भवन इमारतीच्या आवारात व तळमजल्यावर अनेकवेळा पाणी साचण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे तळमजल्यावरील अनेक कार्यालयात पाणी शिरून कार्यालयातील कागदपत्रांचे व अन्य सामानांचे नुकसान होते. दरवर्षी हा प्रकार घडत असल्याने तळमजल्यावरील उप कोषागार कार्यालय अन्यत्र हलविण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा विचार सुरू होता. याचा अर्थ भाषा संचालनालयाच्या कार्यालयात पाणी शिरल्यास सरकारला कोणत्याही प्रकारची हरकत नसावी, असाच होत होता.
निवडणुका रखडलेल्या महापालिकांमध्ये आणखी भर,अहमदनगरची मुदत पुढील महिन्यात संपणार
कोविडमुळे रखडलेल्या राज्यातील महत्वाच्या महापालिकांसह इतरही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर अडल्या आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीची उद्या (२८ नोव्हेंबर) तारीख आहे. मात्र, गेल्या काही तारखांचा अनुभव लक्षात घेता, सतत पुढील तारीख मिळत आहेत. आता अहमदनगर महापालिकेची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपत असल्याने निवडणुका रखडलेल्या महापालिकांच्या यादीत नगरचीही भर पडणार आहे. गेल्या दीड वर्षांपासून नगरची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर प्रशासक आहे, आता महापालिकेतही प्रशासक राज येणार आहे.
राजस्थानात अरविंद केजरीवालांना मोठा धक्का, मतदानाआधीच दोन उमेदवारांनी साथ सोडली
जयपूरमध्ये आप पक्षातील दोन उमेदवारांनी मतदानाआधीच निवडणुकीचे मैदान सोडले. हवामहल जागेवरील उमेदवार पप्पू कुरेशी आणि आदर्शनगर जागेवरील उमर दराज यांनी काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पप्पू कुरेशी यांच्या घरी भेट दिली होती. यानंतर केवळ दहा मिनिटांतच आप उमेदवार पप्पू कुरेशी यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेत असल्याची घोषणा केली होती.
बाईपणाचा फॉर्म्युला हिट; ‘झिम्मा २’ ची तीन दिवसात बक्कळ कमाई
दोन वर्षांपूर्वी लॉकडाऊन नंतर प्रदर्शित झालेला झिम्मा हा पहिलाच मराठी सिनेमा होता. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखित ‘झिम्मा’ हा चित्रपट यशस्वी ठरला. सिनेमाची कथा, कलाकारांचा अभिनय सगळंच प्रेक्षकांना आवडलं होतं. आता २४ नोव्हेंबर रोजी ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सिनेमानं पहिल्या तीन दिवसांत चांगली कमाई केली आहे. सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळतंय.
“शिंदे समिती बरखास्त करा!”, छगन भुजबळांच्या मागणीवर जरांगे संतापले
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया ठरविण्यासाठी नेमण्यात आलेली न्या. संदीप शिंदे समिती तात्काळ बरखास्त करावी, अशी मागणी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. गेल्या दोन महिन्यांत देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याची मागणीही त्यांनी ओबीसी एल्गार परिषदेत केली.यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
मोदी केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज – मंत्री चंद्रकांत पाटील
नरेंद्र मोदी निवडून येणे ही केवळ देशाचीच नव्हे तर जगाची गरज आहे. जगात सुरू असलेल्या युद्धामध्ये मोदींच्यामुळे तीन दिवस युद्धविराम मिळाला. मात्र, काही मंडळी सूर्य झाकण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या गाडीला चालकच नाही असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सांगलीत व्यक्त केले.
सांगलीच्या हृदयाची मुंबईत धडधड, रुग्णावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबईतील रूग्णालयात गेल्या एक वर्षापासून मरणासन्न असलेल्या रूग्णाच्या शरीरात सांगलीतील रूग्णाच्या हृदयाची धडधड अवघ्या तीन तासांत सुरू करणे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या किमयेने शक्य झाले. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा दावा सांगलीतील उष:काल अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या तज्ज्ञांनी सोमवारी केला. सांगलीतील उद्योजक रामानंद सत्यनारायण मोदानी यांचा मेंदूमृत झाल्याचे निदान उष:काल अभिनव रूग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. या रूग्णांचे अवयवदान केल्यास काही रूग्णांना पुन्हा आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होऊ शकते, असे सांगत रूग्णालय प्रशासनाने कुटुंबियांना राजी केले.
राज्याला तीन महिने आरोग्य संचालकच नाहीत; आरोग्य विभाग हतबल, डॉक्टर संतप्त!
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना पदमुक्त केले त्याला आता तीन महिने उलटले असून आरोग्य संचालकांची नियुक्ती होत नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांमध्ये तीव्र नाराजी आहे. हे कमी म्हणून आरोग्य संचालक (शहर) या शहरी आरोग्यासाठीच्या तिसऱ्या संचालपदाची निर्मिती केली त्याला तीन वर्षे उलटली असून आजपर्यंत हे पद केवळ कागदावरच आहे. राज्याला गेले तीन महिने आरोग्य संचालकच नसल्यामुळे आरोग्य विभागाच्या डॉक्टरांमध्ये कमालीचा संताप तसेच नैराश्य निर्माण झाल्याचे चित्र एकीकडे आहे तर दुसरीकडे राष्ट्रीय आरोग्य अभियायानातील ३५ हजार डॉक्टर- कर्मचार्यांचा संपामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल होत असताना संपाकडे पाहाण्यास कोणीच तयार नाही.
टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, ६४ हजार उमेदवार पात्र; २० हजार जागांवर होणार शिक्षक भरती
राज्यात शिक्षक भरतीसाठी घेतलेल्या टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, दरवर्षीप्रमाणे यावेळीही निकालाचा टक्का घसरला आहे. ३ लाख १९६२ पैकी केवळ ६४ हजार ८३० परीक्षार्थी सीईटीसाठी पात्र ठरले आहेत.सध्या सुरू असलेली शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात पुन्हा २० हजार शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांत शिक्षक भरतीसाठी अधिसूचना जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शिक्षण खात्याने दरवर्षी शिक्षक भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दरवर्षी टीईटी घेऊन शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर, वीज पडून २० जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातही शेतीचं मोठं नुकसान
देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कालपासून अधून मधून रिमझिम पाऊस पडतोय. दुसऱ्या बाजूला गुजरात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी सकाळपासून चालू असलेल्या या पावसामुळे अनेक शहरं आणि जिल्ह्यांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत वीज पडून २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांची संख्या याहून अधिक असू शकते असं म्हटलं जात आहे. या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीदेखील झाली आहे. तसेच ४० हून अधिक पाळीव जनावरं (गायी-म्हशी) दगावली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरुपती बालाजीच्या चरणी लीन, १४० कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी घातलं साकडं
तेलंगणमध्ये रविवारी विविध प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी तिरुमलामध्ये व्यंकटेश्वर मंदिरात आले तिथे त्यांनी बालाजीचं दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मंदिरात बालाजीची विधीवत पूजा केली. तिरुमला व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४० कोटी भारतीयांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पारंपरीक वेश परिधान केला होता.
चीनमधील नव्या साथीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचे खबरदारीचे पाऊल
चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसनविकारांची साथ आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांच्या सज्जतेचा ताबडतोब आढावा घेण्याचे निर्देश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रविवारी दिले. चीनमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष असून, कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.करोना संकटानंतर चीनमध्ये आता लहान मुलांमध्ये श्वसनविकाराची साथ आली आहे. यामुळे अनेक देशांनी सावधगिरीची उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सावधगिरीचा उपाय म्हणून श्वसनविकारांविरुद्धच्या सज्जतेच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सुरू असलेली इन्फ्लूएन्झाची साथ आणि हिवाळ्याच्या ऋतूमुळे श्वसनविकाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यायालयात दाद मागण्यास नागरिकांनी घाबरू नये : चंद्रचूड
‘‘सर्वोच्च न्यायालयाने ‘लोक न्यायालय’ म्हणून आपली भूमिका बजावली आहे. नागरिकांनी आपल्यावरील अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास घाबरू नये किंवा अखेरचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये,’’ असे आवाहन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी केले. संविधानदिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सोहळय़ात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना, विधिमंत्री अर्जुन राम मेघवाल उपस्थित होते.
यशस्वी-इशान आणि ऋतुराजने रचला इतिहास!
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने २३५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे गोलंदाजांचे काम सोपे झाले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाला केवळ १९१ धावा करता आल्या. आणि ४४ धावांनी सामना गमावला. हा सामना जिंकून भारतीय संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. यासह यशस्वी जैस्वाल, इशान किशन आणि ऋतुराज गायकवाड या त्रिकुटाने एक विक्रम आपल्या नावावर केला, जो यापूर्वी कोणालाही करता आला नव्हता.यशस्वी जैस्वालने झंझावाती सुरुवात करत २५ चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ५३ धावा केल्या. यानंतर इशान किशन ३२ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. किशनने तीन चौकार आणि चार षटकार मारले. शेवटी ऋतुराज गायकवाड ४३ चेंडूत ५८ धावांची खेळी खेळून बाद झाला. त्याने दोन षटकार आणि तीन चौकार मारले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकण्याची ही पहिलीच वेळ होती. टी-२० क्रिकेटमधील मागील चार सामन्यांमध्ये असे घडले होते, जेव्हा संघाच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतके केली होती, परंतु एकाही प्रसंगी त्यात भारताचा सहभाग नव्हता.
१०, २०, ५० लाख रुपये नव्हे, तर ‘या’ व्यक्तीने लग्नात खर्च केले ५०० कोटी
लग्नाचा हंगाम सुरू झाला आहे. भारतात अनेक जण लग्नावर लाखो, तर कधी करोडो रुपये खर्च करीत आहेत, त्यामुळेच अशी लग्नकार्ये अनेकदा चर्चेचे कारण बनतात. सध्या अमेरिकेतील साऊथ फ्लोरिडा येथे राहणारी मॅडलेन ब्रॉकवे तिच्या ग्रँड वेडिंगमुळे जगभरात चर्चेत आली आहे. २६ वर्षीय मॅडलेन ब्रॉकवेने तिच्या लग्नात इतका पैसा खर्च केला आहे की, लोक तिला ‘वेडिंग ऑफ द सेंचुरी’ म्हणू लागले आहेत. मॅडलेनने तिच्या लग्नावर एकूण ५०० कोटी रुपये खर्च केले आहेत.मॅडलेन ब्रॉकवेने फ्रान्सच्या पॅरिसमधील अतिशय सुंदर शहरात तिच्या प्रियकराशी लग्न केले. या शानदार लग्नाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या ५ दिवसांच्या भव्य लग्नात थीम पार्टीसह अनेक शाही गोष्टींचा समावेश होता. या संपूर्ण लग्नात मॅडलेनने एकूण ५९ मिलियन डॉलर म्हणजेच ४९१ कोटी रुपये खर्च केले. अशा परिस्थितीत हा विवाह जगातील सर्वात महागड्या विवाहांपैकी एक ठरला आहे. मॅडलेन ब्रॉकवेचे वडील बॉब ब्रॉकवे हे Ussery ऑटोमोटिव्ह ग्रुपचे सीईओ आहेत. त्याची आई पॉला ब्रॉकवे फ्लोरिडाच्या मर्सिडीज बेंझ शाखेच्या उपाध्यक्ष आहेत.
वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही भरपूर सुट्ट्या, १८ दिवस बँका राहणार बंद
वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये संप, साप्ताहिक सुट्ट्या आणि इतर काही महत्त्वाच्या दिवसांमुळे १८ दिवस बँकांमध्ये कोणतेही काम होणार नाही. आरबीआय डिसेंबरमधील सुट्ट्यांचं कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने डिसेंबरमध्ये सहा वेगवेगळ्या दिवशी विविध बँकांमध्ये संपावर जाण्याची घोषणा केली आहे. डिसेंबरमध्ये देशभरातील बँका १८ दिवस बंद राहणार असल्या तरी वेगवेगळ्या राज्यांनुसार वेगवेगळ्या सुट्ट्या आहे. RBI ने जाहीर केलेल्या सुट्टीच्या यादीतील अनेक सुट्ट्या राष्ट्रीय स्तराच्या आहेत. त्या दिवशी देशभरात बँकिंग सेवा बंद राहतील. तसेच काही सुट्ट्या स्थानिक किंवा प्रादेशिक स्तराच्या असतात. त्या दिवशी बँकेच्या शाखा फक्त त्याच्याशी संबंधित राज्यांमध्येच बंद असतात. त्यामुळे ज्या दिवशी महाराष्ट्रात बँका बंद असतील, त्याच दिवशी उत्तर प्रदेशातही बँकांचे कामकाज होणार नाही, असे समजू नका.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘धर्मवीर २’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. या चित्रपटातून शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका अभिनेता प्रसाद ओकने साकारली होती.‘धर्मवीर’ला मिळालेल्या यशानंतर काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २’ ची घोषणा करण्यात आली होती. आता नुकताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यात ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. या मुहूर्ताला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार तसेच राजकीय नेते उपस्थित होते.
SD Social Media
9850603590