सिनेसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांचा हसता-खेळता चेहरा आजही प्रेक्षकांना जसाच्या तसा आठवतो. त्यातीलच एक चेहरा म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री मधुबाला होय. मधुबाला यांनी आपल्या अद्भुत सौंदर्याने लोकांना वेड लावलं होतं. आज व्हॅलेंटाईन डे दिवशीच या अभिनेत्रीचा वाढदिवस असतो.
पडदयावर सतत हसत असणाऱ्या मधुबालांच्या खऱ्या आयुष्यात मात्र अनेक दुःखद गोष्टी घडल्या होत्या. त्यांचं आयुष्य एखाद्या ट्रॅजेडीपेक्षा कमी नाहीय. असं म्हटलं जातं की व्हॅलेंटाईन दिवशी जन्मलेल्या मधुबालांना प्रेमासाठी आयुष्यभर झुरावं लागलं होतं.
मधुबाला यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९३३ रोजी झाला होता. त्या दिल्लीतील पश्तून मुस्लिम कुटुंबात जन्मल्या होत्या. मधुबालाने 1942 साली ‘बसंत’ चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. अभिनेत्री म्हणून त्यांनी 1947 मध्ये ‘नीलकमल’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीतील प्रवासाला सुरुवात केली होती.
पहिल्या चित्रपटानंतर मधुबाला यांनी राज कपूरसोबत ‘दिल की राणी’ आणि ‘अमर प्रेम’ सारखे चित्रपट केले. यावेळी मधुबालाच्या सुंदर हास्याने प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सुरवात केली होती. लोक त्यांना प्रत्येक रूपात पसंत करत होते. सांगायचं झालं तर, मधुबाला यांचं खरं नाव मुमताज बेगम जहान देहलवी होते.
मधुबाला यांनी ‘पराई आग’, ‘पारस’, ‘सिंगार’, ‘दुलारी’, ‘बेकसूर’, ‘आंसू’, ‘मि. अँड मिसेस ५५, ‘आणि ‘बादल’सारख्या अनेक चित्रपटांद्वारे आपली वेगळी ओळख स्थापित केली. विशेषत: दिलीप कुमार यांच्यासमवेत त्यांचा ‘मुघल-ए-आजम’ हा चित्रपट खूप खास होता. यामध्ये अनारकलीचे पात्र त्यांच्यासाठी करिअरमधील एक मैलाचा दगड सिद्ध झाला.
व्यवसायिक आयुष्यासोबतच त्यांचं खाजगी आयुष्यही चर्चेत राहील. मधुबालाच्या आयुष्यातही अनेकवेळा प्रेम पाहायला मिळालं. त्या पहिल्यांदा सहकलाकार प्रेमनाथ यांच्या प्रेमात पडल्या होत्या. यानंतर त्यांचं दिलीप कुमारसोबत नऊ वर्षे नातं चाललं. दोघांची पहिली भेट ‘तराना’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.
दिलीप कुमार आणि मधुबाला यांच एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. मात्र दोघांच्या हट्टामुळे त्यांचं नातं संपुष्टात आलं. मधुबालाचे वडील शूटिंग लोकेशनबाबत कोर्टात गेले तेव्हा दिलीप कुमार यांनी दिग्दर्शकाला पाठिंबा दिला. यामुळे मधुबाला चिडल्या. दिलीप यांनी आपल्या वडिलांची माफी मागावी अशी त्यांची इच्छा होती. त्याचवेळी मधुबालाने वडिलांना सोडून आपल्याकडे यावं अशी दिलीप यांची इच्छा होती.
दिलीप कुमार यांच्या या वागण्याचा मधुबाला यांना प्रचंड संताप आला होता. अशा स्थितीत त्यांनी दिलीप कुमार यांना मागे टाकत किशोर कुमार यांना आपल्या आयुष्यात सामील करुन घेतल्याचं सांगितलं जातं. दरम्यान मधुबाला आजारी असल्याने त्यांना उपचारासाठी लंडनला जावं लागलं. पण त्याआधी वयाच्या २७ व्या वर्षी १६ ऑक्टोबर १९६० रोजी त्यांनी किशोर कुमार यांच्याशी कोर्टात मॅरिज केलं होतं.
लग्नानंतर मधुबाला आणि किशोर उपचारासाठी लंडनला गेले पण प्रकृती बिघडल्याने ऑपरेशन होऊ शकलं नाही. दोघेही मुंबईला परत आले. मात्र काही काळाने दोघांमध्ये भांडण सुरु झालं. त्यानंतर मधुबाला किशोर यांच्या वांद्रे येथील घरी शिफ्ट झाल्या. हळूहळू किशोर यांनी मधुबालांना भेटणं बंद केल्याचंही सांगितलं जातं.
कालांतराने मधुबाला यांची प्रकृती ढासळू लागली होती. यासोबतच शेवटच्या दिवसात त्यांना कोणी भेटायलाही आलं नाही यांचं त्यांना वाईट वाटायचं. शेवटच्या दिवसांत मधुबाला यांनी तयार होणं सोडून दिलं होतं. त्या फक्त गाऊन परिधान करत होत्या. प्रेमाचा दिवस म्हटल्या जाणाऱ्या व्हॅलेंटाईन डे दिवशी जन्मलेल्या या अभिनेत्रीला आयुष्यभर प्रेमासाठी झुरावं लागलं आणि 23 फेब्रुवारी 1969 रोजी त्यांचं निधन झालं.