उत्तर प्रदेशातील कानपूर शहराचा विचार केला, तर हे शहर केवळ देशातच नाही, संपूर्ण जगात स्वतःच्या खास शैली आणि येथील खाद्यपदार्थ्यांच्या अनोख्या चवीसाठी ओळखलं जातं. सध्या कानपूरचा एक सामोसा खूप चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे हा सामोसा ‘डिग्री’ घेतलेला सामोसा म्हणून ओळखला जातोय.
विशेष म्हणजे ही डिग्रीसुद्धा साधी नाही, तर इंजिनीअरिंगची आहे. आता सामोश्याचं नाव ‘इंजिनीअरिंग सामोसा’ असे का ठेवलं असेल, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया यामागील नेमकं कारण काय आहे.
कानपूरचा रहिवासी असलेल्या अभिषेक कुमार यांनी राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीमधून 2020 मध्ये बी.टेक पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. पण त्यांचे मन नोकरीत लागलं नाही. त्यातच कोरोनाच्या काळात लॉकडाउन सुरू झालं. यावेळी त्यांनी विचार केला की, स्वतःच पुढाकार घेऊन काहीतरी मोठं करावं, काहीतरी स्टार्टअप सुरू करावं.
त्यानंतर त्यांनी व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीनं संशोधन केलं, आणि फूडलाइनमध्ये जाण्याचं निश्चित केलं. मग त्यांच्या मनात विचार आला की, व्यवसाय करताना असा खाद्यपदार्थ बनवू जो सगळीकडे सहज मिळतो. या वेळी त्यांच्यासमोर सर्वांत प्रथम जो खाद्यपदार्थ आला, तो म्हणजे सामोसा. रस्त्यापासून ते मॉलपर्यंत सामोसा हा सगळीकडे मिळतो. त्यामुळेच त्यांनी अखेर ‘इंजिनीअरिंग सामोसा’ सुरू केला.
विविध प्रकारचे मिळतात समोसे
अभिषेक कुमार सांगतात की, ‘1 वर्षापूर्वी 2021 मध्ये कानपूर येथील काकदेव परिसरात एक दुकान उघडलं होतं. ज्या पद्धतीनं इंजिनीअरिंगच्या वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक इंजिनीअरिंग शाखेच्या नावानं वेगवेगळे समोसे तयार करण्यास सुरुवात केली.’ विशेष म्हणजे, हे सर्व समोसे अभिषेक स्वत: बनवतात, सामोसा स्टफिंगपासून ते तळण्यापर्यंत सर्व काही ते स्वत: करतात.
त्यांच्या दुकानामध्ये चॉकलेट सामोसा, मोमोज सामोसा, पनीर सामोसा, पास्ता सामोसा, मंचुरियन सामोसा आणि इतर विविध प्रकारचे समोसे मिळतात.
अभिषेक यांच्या दुकानात 10 रुपयांपासून ते 60 रुपयांपर्यंत सामोसा मिळतो. हा सामोसा गोड चटणी आणि हिरव्या चटणीसोबत दिला जातो. वास्तविक अभिषेक यांचे दुकान कोचिंग मार्केटजवळ असल्यानं येथे सामोसा खाण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. जर कोणी इतर जिल्ह्यांतून कानपूरला आलं, तर तो कानपूर रेल्वे स्थानकावरून रावतपूर आणि रावतपूरहून काकादेवला पोहोचू शकतो.
सामोसा-आईस्क्रीम फ्यूजन
तुम्ही आईस्क्रीमसोबत सामोसे कधी खाल्ले आहेत का? या प्रश्नाचं अनेकांचं उत्तर ‘नाही’ असं असेल. पण एक इंजिनीअर हे करू शकतो. याचंच उदाहरण तुम्हाला इंजिनीअरिंग सामोसामध्ये पाहायला मिळेल. येथे सामोसे आईस्क्रीमसोबत दिले जातात. अभिषेक कुमार सांगतात की, ‘इंजिनीअरिंगनंतर त्यांनी इंजिनीअर सामोसा दुकान स्टार्ट अप म्हणून उघडलं आहे.’
हा सामोसा लोकांना खूप आवडतो. एखादा इंजिनीअर दुकानात आला की, त्याला हा सामोसा अधिक आवडतो. अभिषेक सांगतात की, ‘या दुकानात आलेले लोक मला फक्त इंजिनीअर म्हणत नाहीत, तर नोकरी करताना जे समाधान मिळालं नाही, ते समाधान मला इथे मिळतं आहे. आता इंजिनीअर सामोसा देशातच नव्हे, तर जगात न्यायचा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात स्वतःची आउटलेट उघडायची आहेत. स्वतःच्या दुकानाची शाखा देशाबाहेरही उघडायची आहे.’