“जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगर नाही, तर औरंगाबाद करा”; कोर्टाचे निर्देश
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिल्यानंतर सर्वत्र संभाजीनगर उल्लेख होत आहे. मात्र, हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर या याचिकांवर अंतिम निर्णय होईपर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने जिल्ह्याचा उल्लेख आधीप्रमाणे औरंगाबादच करण्याचे निर्देश दिले. यानंतर औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला तसे आदेशही दिले. मात्र, जिल्ह्याचा उल्लेख संभाजीनगरच होत असल्याने आता इनामदार सय्यद मोइनुद्दीन व सय्यद अंजारोद्दीन कादरी यांनी सामान्य प्रशासनाच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. तसेच हे न्यायालयाच्या अवमाननेचं प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.
“…तर राहुल नार्वेकरच १६ आमदारांना अपात्र ठरवतील”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल सुनावला आहे. शिंदे गटाचे १६ अपात्र आहेत किंवा नाहीत? यासंदर्भातला निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण विधानसभा अध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे असल्याने हा निर्णय शिंदे गटाच्याच बाजुने लागेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.पण सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच १६ आमदारांना अपात्र ठरवू शकतात, असं विधान सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.
क्रिकेटच्या दादाला आता ‘Y’ ऐवजी ‘Z’ श्रेणीची सुरक्षा
पश्चिम बंगाल सरकारने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ममता बॅनर्जी सरकार आता गांगुलीला झेड श्रेणीची सुरक्षा देणार आहे. नवीन सुरक्षा व्यवस्थेनुसार बीसीसीआयच्या माजी अध्यक्षांवर आठ ते दहा पोलिसांचा पहारा असेल. ‘वाय’ श्रेणी सुरक्षा कवचाखाली गांगुलीला तीन पोलिसांचे रक्षण होते. बेहाला येथील त्याच्या निवासस्थानी तितक्याच संख्येने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पहारा यापुढे देतील. मात्र, क्रिकेटच्या दादाला एवढी सुरक्षा का देण्यात आली यामागील कारण बंगाल सरकारकडून सांगण्यात आले आहे.
गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणाऱ्या ‘लेडी सिंघम’चा संशयास्पद मृत्यू
आसामध्ये ‘लेडी सिंघम’ अशी ख्याती असणाऱ्या एका महिला उपनिरीक्षकाचा अपघातात मृत्यू झाला आहे. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास त्यांची कार एका कंटेनरला धडकली. या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला. जुनमोनी राभा असं या महिला पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. त्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत होत्या. अपघाताच्या वेळी कारमध्ये त्या एकट्याच होत्या. शिवाय त्यांनी आपला पोलीस गणवेशही परिधान केला नव्हता.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा अपघात नागाव जिल्ह्याच्या जाखलाबंधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी पहाटे घडला. मृत महिला पोलीस अधिकारी जुनमोनी राभा या ‘लेडी सिंघम’ किंवा ‘दबंग कॉप’ या नावानं ओळखल्या जायच्या. जेव्हा अपघात घडला तेव्हा त्यांच्याबरोबर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नव्हती, शिवाय त्यांनी पोलिसांचा गणवेशही परिधान केला नव्हता. त्या एकट्याच कारने अप्पर आसामच्या दिशेनं जात होत्या.
“उद्धव ठाकरे दंगलींमागचे मास्टरमाईंड”, नितेश राणेंचा आरोप
महाराष्ट्रात २००४ साली झालेली दंगल घडवण्यात शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा हात होता का? याची चौकशी पोलिसांनी करावी. तसेच उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी केली आहे. नितेश राणे म्हणाले, पुन्हा एकदा महाराष्ट्रा दंगल घडवण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्लॅन आहे का याचा तपास केला पाहिजे. उद्धव ठाकरे तीन दिवसांपूर्वी अकोला आणि नगरच्या शेवगावात झालेल्या दंगलींमागचे मास्टरमाईंड असल्याचा आरोपही राणे यांनी केला आहे. दरम्यान, आता या दंगलींची आणि नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, खडसे-धनुभाऊंवर सोपवली नवी जबाबदारी
आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक पार पडली. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणत्या जागेवर लढायचे आणि कोणत्या जागेवर पाठिंबा द्यायचा याबाबत रणनिती ठरवण्यात आली आहे. दरम्यान तालुका आणि जिल्हा अध्यक्ष देखील बदलण्यात येणार असून जे सलग तीन टर्म अध्यक्ष राहिले आहेत, त्यांना बढती देण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचंही समोर आलं आहे.राष्ट्रवादीच्या या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक या महाविकास आघाडी म्हणूनच लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपसमोर एक मजबूत पर्याय यामुळे निर्माण होणार आहे. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष आहे, त्या मतदारसंघांची जबाबदारी पक्षाच्या वतीनं नेत्यांवर सोपवण्यात आली आहे.
SD Social Media
9850603590