धावपळीच्या जीवनशैलीतून दोन क्षण सुखाचे आणि आनंदाचे मिळावेत, यासाठी बहुतांश जण पर्यटनाचा पर्याय निवडतात. यासाठी देश किंवा परदेशातल्या पर्यटनस्थळांची निवड केली जाते. देशभरात अशी असंख्य पर्यटनस्थळं आहेत, जिथे तुम्हाला मनसोक्त आनंद मिळू शकतो. नुकताच ऑगस्ट महिना सुरू झाला आहे. हा महिना सणासुदीचा आहे. त्यामुळे तुम्हाला सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या सुट्ट्यांच्या निमित्ताने तुम्ही ट्रिपचं नियोजन करू शकता. तुम्ही पर्यटनाचं नियोजन करत असाल तर मनाली, चेरापुंजी, मथुरा-वृंदावन ही ठिकाणं या महिन्यात पर्यटनासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. त्याबद्दलची माहिती घेऊ या.
सध्या ऑगस्ट महिना सुरू आहे. या महिन्यात फ्रेंडशिप डे, रक्षाबंधन, स्वातंत्र्यदिन, कृष्ण जन्माष्टमी, हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे या महिन्यात तुलनेनं जास्त सुट्ट्या मिळणार आहेत. या सुट्ट्यांच्या निमित्ताने तुम्ही एखाद्या ट्रिपचं नियोजन करू शकता. 7 ऑगस्टला फ्रेंडशिप डे आहे. त्यामुळे वीकेंडला मित्रांसोबत भटकंतीला जाण्याची संधी आहे. 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्टदरम्यान 4 दिवस सुट्ट्या आहेत. त्यानंतर 19 ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमीची सुट्टी आहे. त्यामुळे वीकेंड धरून तीन दिवसांची सुट्टी तुम्ही पर्यटनासाठी निवडू शकता. या सुट्ट्यांदरम्यान खास अशा पर्यटनस्थळी तुम्ही भेट देऊ शकता. या महिन्यात मेघालयमधल्या चेरापुंजी येथे जाऊन तुम्ही पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. चेरापुंजीत वर्षभर पाऊस पडतो. तुम्हाला मान्सून आणि पाऊस मनापासून आवडत असेल तर तुम्ही या महिन्यात चेरापुंजी येथे जाऊन आनंद घेऊ शकता. चेरापुंजीत तुम्ही मान्सून ट्रेकिंग करू शकता. तसंच दार्जिलिंगच्या प्रसिद्ध चहाचा आस्वाद घेऊ शकता.
सध्याच्या हवामानात माउंट अबू या हिलस्टेशनला तुम्ही फिरायला जाऊ शकता. राजस्थानमधल्या या हिलस्टेशनचं सौंदर्य आणि निसर्ग तुम्हाला नक्कीच मोहित करेल. धुकं आणि हिरवाईमध्ये वेळ घालवण्याव्यतिरिक्त तुम्ही जोधपूरचे किल्ले, मंदिरं आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आनंद घेऊ शकता.
या महिन्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. 19 ऑगस्टला जन्माष्टमी असून, त्याला शनिवार आणि रविवार जोडून आले आहेत. त्यामुळे तुम्हाला तीन दिवस सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. या निमित्ताने तुम्ही श्रीकृष्णाच्या मथुरा, वृंदावन नगरींमध्ये सफर करू शकता. त्याशिवाय गोकुळधाम, गोवर्धन पर्वतावर फिरायला जाऊ शकता. कमी बजेटमध्ये ही ट्रिप होऊ शकते. श्रीकृष्णाची प्राचीन आणि प्रसिद्ध मंदिरं पाहण्यासोबतच तुम्ही यमुना तीरावर सायंकाळी होणाऱ्या आरती सोहळ्यातही सहभागी होऊ शकता.
या महिन्यात हिमाचल प्रदेशातल्या कुलू-मनाली येथे तुम्ही मित्र किंवा कुटुंबीयांसोबत जाऊ शकता. तेथे तुम्हाला अनेक साहसी क्रीडाप्रकारांचा आनंद घेता येईल. मनाली मॉल रोडवर शॉपिंग करू शकता. निसर्गसौंदर्य, धबधबे आणि तलाव आदींचा आस्वाद घेत कुटुंब किंवा मित्रांसह सुट्टी संस्मरणीयपणे व्यतीत करण्यासाठी कुलू-मनाली हा चांगला पर्याय आहे.