पेट्रोलच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाला आहे. अशा परिस्थितीत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने इथेनॉल मिश्रित पेट्रोल (EBP) कार्यक्रमांतर्गत इथेनॉलवरील GST दर 18% वरून 5% पर्यंत कमी केला आहे. EBP प्रोग्राम अंतर्गत, इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळलं जातं. पेट्रोल आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
केंद्र सरकारने 2018 मध्ये पहिल्यांदा इथेनॉल तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालावर आधारित इथेनॉलचे दर निश्चित केले होते. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून इथेनॉल खरेदीचे प्रमाणही वाढलं आहे. इथेनॉल पुरवठा वर्ष (ISY) 2013-14 मधील 38 कोटी लिटरवरून त्यात ISY वर्ष 2020-21 मध्ये 350 कोटी लिटरपर्यंत वाढ झाली आहे.
सरकारने गेल्या महिन्यात उसापासून काढलेल्या इथेनॉलच्या किमती पेट्रोलमध्ये 1.47 रुपयांनी वाढवल्या होत्या. पेट्रोलमध्ये अधिक इथेनॉल मिसळल्याने प्रदूषणही कमी होते आणि शेतकऱ्यांना वेगळे उत्पन्न मिळवण्याचा मार्ग मिळतो, असे सरकारचे म्हणणे आहे.