आज दि.२४ नोव्हेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

“ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का?”; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल!

महाराष्ट्रात मागील काही दिवसांमध्ये विविध मुद्य्यांवरून मोठा राजकीय गदारोळ पाहायला मिळाला. यामध्ये प्रामुख्याने राज्यपाला भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवलं जावं, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली. साधारणता एक प्रघात आहे की, ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांचीच माणसं किंवा त्यांच्याच विचारसरणीची माणसं देशातील विविध राज्यात किंवा सगळ्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत काय असते, या माणसांची पात्रता काय असते? जरासा एक शब्द वापरतोय कुणी गैरसमज करू नये, म्हणजे खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल मी बोलतो आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा सुद्धा एक प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे आणि राज्यपाल नियुक्तीचे निकष सुद्धा ठरवायला पाहिजेत, असं माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे. ”

रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार! 

सध्या बॉलिवूडमध्ये एका मागोमाग एक बायोपिकची निर्मिती होताना दिसत आहे. प्रसिद्ध खेळाडू, अभिनेते, राजकीय नेते यांच्यानंतर आता प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या आयुष्यावर चित्रपट निर्मिती केली जाणार आहे. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांच्या बायोपिकवरील संशोधन अंतिम टप्प्यात आलं असून राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुधा कोंगारा या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.रतन टाटा यांच्या बायोपिकचं काम २०२३ च्या अखेरीस सुरू होणार असल्याचं बोललं जात आहे. “रतन टाटा हे आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपतींपैकी एक आहेत आणि त्यांची कथा रुपेरी पडद्यावर साकारणे ही अभिमानाची बाब आहे,” असं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

रोहित विकासमध्ये जबरदस्त हाणामारी; Bigg Boss नं दाखवला थेट जेलचा रस्ता

बिग बाॕस मराठीच्या घरात  सदस्यांची एंट्री होऊन आता 50 दिवस उलटून गेले आहेत. आतापर्यंत सदस्यांनी अनेक टास्क खेळले, एकमेकांशी भांडणं केली, शाब्दिक चमकमी झाल्या. पण आता 50 दिवसांनी सदस्यांची घरात राहण्यासाठी होणारी चुरस त्यांच्या अंगाशी आल्याचं पाहायला मिळत आहे. जिंकण्याच्या उद्देशानं सदस्य कोणाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. हत्ती आणि राणी मुंगीच्या टास्कमध्ये अमृता धोंगडेनं बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचं केलेल्या नुकसानीमुळे अमृताला बिग बॉसनं कठोर शिक्षा दिली आहे. पण अमृतानं केलेल्या कृत्याचा धडा न घेता सदस्यांनी घरात पुन्हा एकदा नको ते पाऊल उचललं आहे. विकास आणि रोहित यांच्यात झालेल्या मारामारीमुळे आता बिग बॉसनं त्यांना जेलमध्ये टाकलं आहे. विकास आणि रोहित जेलमध्ये गेल्यानं घरात नवा ट्विस्ट तयार झाला आहे.

धक्कादायक… वर्ल्ड कप दरम्यान रोनाल्डोवर मोठी कारवाई, ‘या’ कारणामुळे दोन सामन्यांची बंदी

कतारमधल्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत सध्या साखळी फेरीचे सामने सुरु आहेत. पहिल्या काही सामन्यात मोठमोठे उलटफेरही पाहायला मिळाले. त्यात स्टार फुटबॉलर लायनल मेसीच्या अर्जेन्टिनाला सौदी अरेबियाकडून पराभवाचा धक्का मिळाला. तर दुसऱ्या एका सामन्यात जपाननं 4 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या जर्मनीला धूळ चारली. त्यात आता याच स्पर्धेतला आणखी एक स्टार खेळाडू पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंग्लंडमधल्या एका स्पर्धेत चाहत्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी रोनाल्डोवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा डिवचलं, आता तर थेट फडणवीसांचं नावच घेतलं!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील भूभागांवर दावा सांगण्यास सुरूवात केली. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट प्रदेश कर्नाटकचे असल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमावादावर केलेल्या विधानानंतर प्रतिक्रिया देताना बोम्मई यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये बोम्मई यांनी थेट देवेंद्र फडवणीस यांचं नाव घेतलं आहे.

‘महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर चिथावणीखोर वक्तव्य केलं असून त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. देशाची जमीन, पाणी आणि सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचं सरकार कटिबद्ध आहे. कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. महाराष्ट्रातील सोलापूर, अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे. 2004 पासून महाराष्ट्र सरकारनं दोन्ही राज्यांमधील सीमाप्रश्नावर सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. आतापर्यंत यश आलं नाही आणि यापुढंही ते येणार नाही. आमचा कायदेशीर लढा मजबूत करण्यासाठी आम्ही तयार आहोत’, असं ट्वीट बोम्मई यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का, शरद पवारांच्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीने सोडली साथ!

राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे, कारण शरद पवारांच्या सगळ्यात जवळच्या सहकाऱ्यानेच त्यांची साथ सोडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजिद मेमन यांनी याबाबतच ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणासाठी आपण पक्ष सोडत असल्याचं माजिद मेमन म्हणाले आहेत.

’16 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना मला शरद पवारांकडून मार्गदर्शन आणि सन्मान मिळाला, याबद्दल मी कृतज्ञ आहे. वैयक्तिक कारणासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेसचं सदस्यत्व तत्काळ सोडत आहे. पवार साहेब आणि पक्षासोबत माझ्या शुभेच्छा आहेत,’ असं ट्वीट माजिद मेमन यांनी केलं आहे.

श्रद्धा वालकर प्रकरणावर एमआयएमचे ओवेसी म्हणतात तर हा लव्ह जिहाद…

श्रद्धा वालकर खून प्रकरणात जसजसे दिवस पुढे जातील तसतसे मोठे खुलासे बाहेर येत आहेत. सहा महिन्यांच्या जुन्या खून प्रकरणाची उकल करताना, दिल्ली पोलिसांनी आफताबला श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकड्यांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी अटक केली. दरम्यान या प्रकरणावर देशभरात राजकीय प्रतिक्रीया उमटत आहेत. दरम्यान यावरून भाजपने हे लव्ह जिहादचे प्रकरण असल्याचे सांगितले. यावर आता एमआयएमचे नेते ओवेसींनी प्रतिक्रीया देत भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

ओवेसी म्हणाले की, आफताब आणि श्रद्धा खून प्रकरणावर भाजपचे राजकारण पूर्णपणे चुकीचे आहे. हा लव्ह जिहादचा नाही तर शोषणाचा, महिलेवरील अत्याचाराचा मुद्दा आहे. ही घटना अतिशय निंदनीय आहे याचा सगळ्यांनी निषेध केला पाहिजे.

नोटबंदी केल्यावर देशात किती रुपये शिल्लक होते? पी चिदंबरम यांची सर्वोच्च न्यायालयात महत्वाची माहिती

२०१६ साली निश्चलनीकरण अर्थात नोटाबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला, त्याला ८ नोव्हेंबर रोजी सात वर्षे पूर्ण झाली. काळ्या पशाला आळा घालणे, अतिरेकी कारवाया थांबवणे, खोट्या नोटा हद्दपार करणे व ‘कॅशलेस’ व्यवहाराला उत्तेजन देणे- या उद्दिष्टांसाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले गेले. मात्र, नोटबंदी झाल्यावर देशात फक्त २ लाख कोटी रुपये शिल्लक असल्याचं समोर आलं आहे.यावर युक्तीवाद करताना माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ वकील पी चिदंबरम यांनी नोटबंदीपूर्वीची देशाची परिस्थिती आणि नंतरची स्थिती सादर केली. “२०१६ मध्ये नोटबंदी करण्यापूर्वी भारतीय चलनात १७.९७ लाख कोटी रुपये होते. तर, १५.४४ लाख कोटी रुपयांच्या ५०० आणि १००० च्या नोटा चलनात होत्या. नोटबंदी केल्यावर देशात फक्त २ लाख कोटी शिल्लक होते. हे पैसे अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी पुरेसे नव्हते,” असे चिदंबरम यांनी न्या्यालयात सांगितलं.

शिखर धवनच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघ न्यूझीलंडशी भिडणार

टीम इंडिया शुक्रवारी २५ नोव्हेंबर रोजी ऑकलंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७ वाजता सुरू होईल. न्यूझीलंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन टीम इंडियाचा कर्णधार असेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत एक वेगळी टीम इंडिया पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये एकापेक्षा एक तगडे खेळाडू उपस्थित असतील. कर्णधार शिखर धवन अनेक सर्वोत्तम आणि धोकादायक खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देईल.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.