भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातील वन डे मालिकेला आजपासून सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. यजमान न्यूझीलंडनं टॉस जिंकून या पहिल्या वन डेत भारताला पहिल्यांदा बॅटिंग करण्याचं आमंत्रण दिलं आहे. दरम्यान भारतीय संघात आज दोन युवा खेळाडूंना पहिल्यांदाच वन डे खेळण्याची संधी देण्यात आली आहे. हे युवा खेळाडू आहेत वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग.
अर्शदीप सिंगनं गेल्या काही महिन्यात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यानं आता वन डे संघातही आपली जागा तयार केली आहे. पण त्याचबरोबर आयपीएलमध्ये आपल्या वेगवान गोलंदाजीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेल्या उमरान मलिकलाही टी20 नंतर वन डे संघात स्थान मिळालं आहे.
नेट बॉलर ते टीम इंडिया उमरानचा प्रवास
उमरान मलिक अवघ्या 23 वर्षांचा आहे. तो मूळचा काश्मीरच्या श्रीनगरचा. पण टीम इंडियापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला बराच संघर्ष करावा लागला आहे. उमरानचे वडील रशीद मलिक एक फळविक्रेता आहेत. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. उमरानची हीच आवड जोपासण्यासाठी वडील त्याला जम्मूला घेऊन आले. आर्थिक परिस्थितीमुळे त्याला दहावीनंतर शिक्षण सोडावं लागलं. पण उमराननं क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत घेतली आणि आज तो भारतातला एक यशस्वी गोलंदाज बनला आहे.
2020 साली डोेमेस्टिक क्रिकेटमधल्या कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली. त्याआधी त्यानं नेट बॉलर म्हणूनही काम केलं होतं. या संधीचं त्यानं सोनं केलं. सनरायझर्स हैदराबादकडून त्यानं चांगला परफॉर्मन्स दिला. 150 पेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच भारतीय क्रिकेटमध्ये त्याला स्पीड गन अशी नवी ओळख मिळाली आहे.