ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली असून त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागच्या 15 दिवसापासून ते रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बुधवारी रात्री विक्रम गोखले यांचं निधन झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर आता त्यांची पत्नी वृषाली यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्या निधनाचं वृत्त फेटाळलं आहे.
वृषाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विक्रम गोखलेंच्या निधनाच्या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं. “ते काल दुपारी कोमात गेले आणि त्यानंतर त्यांनी स्पर्शाला प्रतिसाद दिला नाही. ते व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती सुधारतीये की खराब होतीये आणि ते उपचारांना कशाप्रकारे प्रतिसाद देतात यावर डॉक्टर आज सकाळी काय करायचं ते ठरवतील”, असं त्यांनी सांगितलं.
वृषाली गोखले यांनी खुलासा केला की, विक्रम गोखले 5 नोव्हेंबरपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आहेत. “त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली होती पण प्रकृती पुन्हा खालावली. त्यांना हृदय आणि मूत्रपिंडासारख्या अनेक समस्या होत्या. सध्या त्यांचे अनेक अवयव निकामी झाले आहेत.
त्यांनी पुढे सांगितलं की, त्यांचे पती 82 वर्षांचे नसून 77 वर्षांचे आहेत. “सॅन फ्रान्सिकोहून माझी मुलगी आली आहे. दुसरी इथे पुण्यात आली आहे, ती मुंबईत राहते.”
विक्रम गोखले यांच्या मुलीने त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटलं की, “ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले अजूनही गंभीर आहेत आणि लाइफ सपोर्टवर आहेत, त्यांचे अद्याप निधन झाले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करत रहा.”