आज दि.४ जानेवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

दीड दिवसात मोहीम फत्ते; भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सनी ऐतिहासिक विजय

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना केपटाऊनमध्ये पार पडला आहे. या सामन्यात भारताने आफ्रिकेवर सात विकेट्सनी ऐतिहासिक विजय नोंदवला. कारण केपटाऊनमध्ये टीम इंडिया पहिली आशियाई टीम आहे, जिने आफ्रिकेला हरवले आहे. त्याचबरोबर दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहने महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने ३१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच केपटाऊनमध्ये कसोटी सामना जिंकला आहे. कारण १९९३ नंतर प्रथमच भारतीय संघाला येथे विजय मिळवता आला आहे. म्हणजेच येथील विजयाची तीन दशकांची प्रतीक्षा संपली आहे. भारतीय संघाने २ जानेवारी १९९३ रोजी येथे पहिली कसोटी खेळली आणि ती हरली होती.

राहुल गांधीच्या पदयात्रेचं नाव आणि मार्ग बदलला; १५ राज्ये, ११० जिल्हे, तब्बल ६,७१३ किमी प्रवास

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे (केरळ) खासदार राहुल गांधी यांनी गेल्या वर्षी कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा पूर्ण केली. राहुल गांधी आता दुसऱ्या टप्प्यातील यात्रा सुरू करणार आहेत. मणिपूर ते मुंबई अशी ही पदयात्रा असणार असून या यात्रेला ‘भारत न्याय यात्रा’ असं नाव देण्यात आलं होतं. ही पदयात्रा ईशान्येतील मणिपूरपासून सुरू होऊन देशाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे मुंबईत जाणार आहे. दरम्यान, या यात्रेच्या नावात थोडा बदल करण्यात आला आहे. या पदयात्रेला ‘भारत जोडो न्याय यात्रा’ असं नाव देण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या यात्रेबाबतची माहिती जाहीर केली.

मोदींचा एक उनाड दिवस! समुद्रात डुबकी, स्नॉकर्लिंग अन् बीचवर फेरफटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवस निवांत बीचवर घालवला. यामध्ये त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. लक्षद्वीप या बेटावरील सौंदर्याचं यावेळी मोदींनी कौतुक केलं आहे.मोदींनी लक्षद्वीप बेटांवर राहणाऱ्या लोकांच्या आदरातिथ्याचं कौतुक केलं आहे. तसेच इथल्या निसर्गसौंदर्याचा मनःशांतीसाठी कसा फायदा घेता येऊ शकतो हे देखील सांगितलं. निसर्गसौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतताही मनमोहक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

‘रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून रक्षबंधनची भेट’

पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिस महासंचालकपदी बढती दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. रश्मी शुक्ला यांनी माझा अनधिकृतरित्या फोन टॅप केला होता. त्यांची या पदावर नियुक्ती केल्यानंतर आता अधिकृतरित्या फोन टॅप केले जातील का? अशी शंका एकनाथ खडसे यांनी उपस्थित केली. तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रश्मी शुक्ला यांनी राखी बांधली होती, याची आठवण करून देताना ते म्हणाले की, फडणवीस यांनी आपल्या बहिणीचे रक्षण करून तिला या पदाची ओवाळणी दिली आहे.

शिंदे सरकारने घेतले १० महत्त्वाचे निर्णय, नोव्हेंबर २००५ नंतरच्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार

राज्यात शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली असून, आज १० महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनचा लाभ मिळणार असून, शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने हा मोठा दिलासा दिला आहे. तसेच अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित करण्यात आला असून, कारसाठी २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान निश्चित करण्यात आले आहे. शिवाय विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार आहेत.

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले घडवणाऱ्या हिजबुलच्या कमांडरला दिल्ली पोलिसांकडून बेड्या

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या दहशतवादविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. या विशेष पथकाने राजधानी दिल्लीत हिजबुल मुजाहिदीनच्या एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला बेड्या ठोकल्या आहेत. या दहशतवाद्यावर सरकारने १० लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. हा दहशतवादी जम्मू काश्मीरमधील अनेक अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होता. या दहशतवाद्याचं नाव जावेद अहमद मट्टू असं असून तो हिजबुलचा कमांडर होता.

जावेद मट्टू यापूर्वी अनेकदा पाकिस्तानमध्येदेखील जाऊन आला आहे. तो जम्मू काश्मीरमधल्या सोपोरमधला रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी सोपरमध्ये त्याच्या भावाने घराबाहेर तिरंगा फडकवला होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले होते.

SD Social Media

9850603590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.