5G नेटवर्कच्या पहिल्या फेजमध्ये मिळणार तुफान स्पीड, 6GB फाईल HD मुव्ही डाऊनलोडिंगला लागणार फक्त इतका वेळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच 5G नेटवर्क सेवेला प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात ही सेवा निवडक शहरांमध्ये उपलब्ध होणार आहे. 5G सेवेच्या अनुषंगाने मोठी चर्चा आहे. या सेवेमुळे मोबाइल ग्राहकांना 600Mbps चा डेटा स्पीड मिळेल, असं सांगितलं जात आहे. हा स्पीड केवळ मोबाइल स्टेशनच्या जवळपास मिळू शकेल, असं तज्ज्ञ म्हणतात. तसंच या विषयावर उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी आपली मतं मांडली आहेत. एकूणच 5G नेटवर्कमुळे अनेक क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल येत्या काही वर्षांत दिसून येणार आहेत. डेटा स्पीडविषयी अजूनही काही खास गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

मोबाइल ग्राहकांना 5G नेटवर्कच्या पहिल्या टप्प्यात 600Mbps (मेगाबाइट प्रतिसेकंद) एवढा डेटा स्पीड मिळेल. यामध्ये अ‍ॅप अ‍ॅक्सेस करण्यासाठी आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये जसे प्रोफेशनल कम्प्युटर काम करतात, तशाच पद्धतीचं काम हॅंडसेट अर्थात मोबाइल फोन करतील, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्ती केली असल्याचं `भाषा`ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. टेलिकॉम कंपन्यांनी अनेक मोठ्या शहरांमध्ये 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे. दोन टेलिकॉम कंपन्यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता, वाराणसी, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, नागपूर आणि सिलीगुडीतल्या 5G हॅंडसेट असलेल्या सर्व ग्राहकांसाठी 5G सेवा सुरू केली आहे. यात भारती एअरटेलचाही समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना 5G सुविधा मिळवण्यासाठी सध्या असलेलं सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. जोपर्यंत कोणत्याही शहरातलं नेटवर्क कव्हरेज पूर्ण होत नाही, तोपर्यंत ग्राहक बीटा ट्रायलच्या माध्यमातून 5G सेवेचा लाभ घेऊ शकतील. कंपनीने एक गिगाबाइट प्रतिसेकंद अर्थात 1 Gbps पर्यंतच्या वेगानं अमर्याद 5G इंटरनेट सेवा प्रदान करणार असल्याचं सांगितलं आहे.

एवढा डेटा स्पीड हा केवळ मोबाइल स्टेशन्स जवळच्या भागात उपलब्ध होईल,` असं मत टेलिकॉम क्षेत्राशी निगडित तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. एरिक्सनचे नेटवर्क सोल्युशन, स्ट्रॅटेजिक नेटवर्क विकास प्रमुख (आग्नेय आशिया, ओशिआनिया आणि भारत) थियावसेंग एन.जी. म्हणाले, `5G नेटवर्कच्या सुरुवातीच्या टप्प्यात 600Mbps पर्यंत डेटा स्पीड मिळू शकतो. कारण नेटवर्कवर कॉल आणि डेटाचा वापर कमी असेल; मात्र हे नेटवर्क पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यावर हा स्पीड 200 ते 300mbps पर्यंत मिळू शकतो.`

`जेव्हा मी भारतात 5G वाढीच्या संधी पाहतो, तेव्हा मला अनेक आणि अतिशय महत्त्वाच्या संधी दिसतात. त्यात पहिली म्हणजे प्रत्येक डिव्हाइसला 5G तंत्रज्ञान भिन्न किमतीत मिळेल. तुमच्याकडे 5G फोन किंवा कम्प्युटर असेल आणि तुम्हाला एखादं जास्त कॅल्क्युलेशन पॉवर असलेलं अ‍ॅप्लिकेशन चालवायचं असेल तर ती पॉवर 5G तुम्हाला उपलब्ध करून देईल,` असं क्वालकॉमचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टीयानो अमोन यांनी सांगितलं.

5G मुळे 6GB फाइलसह दोन तासांचा एचडी चित्रपट 1 मिनिट 25 सेकंदांत 600 Mbps च्या वेगानं डाउनलोड होऊ शकतो. त्याचप्रमाणे 4k अर्थात अल्ट्रा हाय डेफिनेशन असलेला चित्रपट डाउनलोड करण्यासाठी अवघ्या तीन मिनिटांचा वेळ लागू शकतो. 5G हॅंडसेट खरेदी केलेल्या ग्राहकांना त्यांच्या फोनमधल्या नेटवर्क सेटिंग्जमध्ये 5Gचा ऑप्शन दिसेल आणि त्यांना सेवेचा लाभ घेण्यासाठी हा पर्याय निवडता येईल. ग्राहकांना त्यांच्या परिसरात 5G नेटवर्क उपलब्ध होताच हँडसेटवर मोबाइल नेटवर्क डिस्प्लेवर 4G ऐवजी 5G दिसू लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.