शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेला धनुष्यबाण कोणाला मिळावा, यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेका विरुद्ध उभे राहिले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात या संदर्भात शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीमध्ये शिंदे गटाने सादर केलेल्या पुराव्यावर निवडणूक आयोग निवडणूक चिन्हाबाबत काय निर्णय घेते? का फक्त सुनावणी करते? हे निश्चित होणार आहे. दोन्ही गटाचे वकील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये युक्तिवाद देखील करणार आहेत, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागलं आहे.
सुनावणीआधी शिंदेंचा अर्ज
निवडणूक आयोगाच्या या सुनावणीआधी एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्रासह अर्ज केला आहे. या अर्जात शिंदेंनी ठाकरे गट धनुष्यबाण या चिन्हाचा गैरवापर करत आहे, तसंच निवडणूक आयोगात कागदपत्रं सादर न करता वेळकाढू पणा करत असल्याचा आरोप केला आहे.
आम्ही 1,50,000 पेक्षा जास्त प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत, यात लोकप्रतिनधी आणि पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. हा शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा आम्हाला असलेल्या पाठिंब्याचा पुरावा आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना सदस्यांचा पाठिंबा असल्याचं एकही पत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेलं नाही. आम्ही प्रतिनिधी सभा आणि राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन प्रस्ताव मंजूर करून घेतले, पण ठाकरे गटाकडून अशा बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असंही शिंदेंनी त्यांच्या या अर्जात म्हणलं आहे. शिंदेंकडून 4 ऑक्टोबरला हा अर्ज आणि प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलं आहे.