बाळासाहेब ठाकरे हे एकच नाव. बस्स, हे उच्चारलं की, काहीही सांगायची गरज नाही. त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेकांच्या डोळ्यांसमोरून त्यांचा जीवनपट एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकून जातो. बाळासाहेबांचा मराठी बाणा, हिंदू धर्म आणि महाराष्ट्राविषयीचं अलोट प्रेम ही त्यांच्या जीवनाची संजीवनी. ही संजीवनी घेऊनच त्यांनी राजकारण, समाजकारण, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात मुक्त संचार केला. उरात जपले ते फक्त दोन शब्द. जयहिंद, जय महाराष्ट्र. ते कधीही गोलमालाची भाषा करत नसत. त्यांचं सारं काही एक लोहार की…त्यांची आज 23 जानेवारी रोजी जयंती. त्यानिमित्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर ही थोडक्यात टाकलेली एक नजर.
शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे. एकाच नाण्याच्या दोन बाजू. बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926. तो ही पुण्यातला. प्रबोधनकारांचे संस्कार आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ या मुशीत ते घडले. सुरुवातीला त्यांनी ‘फ्री प्रेस’ व्यंगचित्रकार म्हणून नोकरी केली. मात्र, त्यानंतर ‘मार्मिक’ सुरू केलं. शिवसेनेच्या जन्माची कहाणी तशी रोचकच.
बाळासाहेबांनी त्या काळी मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाची यादी मार्मिकमधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. हे प्रबोधनकरांनी पाहिलं. ते म्हणाले, ‘याला काही संघटनात्मक आकार देणार की नाही?’ याच प्रश्नातून माणूस आणि हिंदुत्व घेऊन शिवसेना जन्माला आली. 19 जून 1966 रोजी या नव्या संघटनेचा जन्म झाला आणि अवघ्या महाराष्ट्राचे ते ‘शिवसेनाप्रमुख’ झाले. त्यानंतर 4 महिन्यांनी ऑक्टोबरमध्ये त्यांनी शिवाजी पार्कवर पहिला मेळावा घेतला. त्यावेळीही 5 लाख जणांनी गर्दी केली. अन् बाळासाहेब नावानं मुंबईकरांनी, मराठी माणसांवर आपल्या वक्तृत्वानं एक गारूड केलं.
राजकीय क्षेत्रात उतरलेल्या बाळासाहेबांनी मायानगरी आणि उद्योनगरी असलेल्या मुंबईतल्या कामगार वर्गाकडं मोर्चा वळवला. त्या काळी या चळवळीवर डावे आणि समाजवादी संघटनांची पकड. या दोन्ही संघटनांना शिवसेनेनं खिळखिळं करून सोडलं. साम, दाम, दंड, भेद याचा वापर करत आपला पाय रोवला. हळूहळू शिवसेना म्हणजे राडा हे समीकरण रुजू झालं. पण लोक याच्याही प्रेमात पडले. मुंबई, कोकणात शिवसेनेनं जम बसवला. पाहता-पाहता मुंबईच्या महापालिकेत सत्ता काबीज केली. त्यानंतर अनेकांनी शिवसेना सोडली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे ते थेट राज ठाकरे ही नावं वाढली. मात्र, शिवसेनेची सुरू घौडदौड थांबली नाही. आज बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री आहेत. आणि नातू आदित्य ठाकरे तरुण-तडफदार मंत्री म्हणून ओळखले जातात.
बाळासाहेबाचं हिंदुत्व आणि त्यांचे टोकाचे विचार साऱ्यांनाच माहितयत. या हिंदुत्वावरून त्यांनी भाजपशी युती केली. दोन रुपयांत झुणका भाकर, राज्यभर उभारलेली मातोश्री वृद्धाश्रमे, झोपडीवासीयांना मोफत घरे, मुंबईतील उड्डाणपूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग अशी अनेक स्वप्ने त्यांनी पाहिली. ती खरीही करून दाखवली. मात्र, ते शेवटपर्यंत स्वतः कसल्याही पदापासून दूर राहिले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक नेते निर्माण केले. कधी कोण्या रिक्षाचालकाला आमदार केले, तर कधी कोण्या साध्या मजुराला तिकीट दिले. मात्र, बाळासाहेबांनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही.
माँसाहेब म्हणजेच मीनाताई ठाकरे आणि बिंदुमाधव ठाकरे. या दोघांचा लवकर जाणं हा बाळासाहेबांवर मोठा आघात होता. तो त्यांनी सहन केला. त्यांच्यावर सिनेमा आला. त्यांच्या अनेक मुलाखती गाजल्या. त्यांची भाषणं ऐकणं म्हणजे पर्वणी असायची. लाखोंचा जनसमुदाय त्यांच्या येण्याची वाट पहात बसायचा. त्यांची एक सभा झाली की, तिथली आमदारकीची सिट लागली, असं गणित असायचं. असं व्यक्तिमत्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. ते एकदा म्हणालेले, ‘विजय मर्चंट यांच्याप्रमाणं मला निवृत्त व्हायचंय. लोकांनी निवृत्त का झालात, हा प्रश्न मला विचारलेला आवडेल, पण लोकांनी निवृत्त का होत नाहीत, हे विचारण्याची वेळ माझ्यावर येऊ नये.’ बाळासाहेबांची आज जयंती.