उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मामाच्या जरंडेश्वर कारखान्यावर ईडीने कारवाई केली आहे. यात अजित पवार यांचं नाव आलं आहे. त्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवारांचं नाव आता आलं. आम्ही कधीपासून त्याबाबत बोलतोय. आता ईडीने लक्ष घातल्याने सर्व बाहेर पडेल, असा दावा अण्णा हजारे यांनी केला आहे.
अण्णा हजारे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. जरंडेश्वर प्रकरणात अजित पवार यांचं नाव आलं आहे. ते आम्ही कधीपासून बोलत आहे. पण मी फकीर माणूस. माझं कोण ऐकतोय. आता ईडीने लक्ष घातलं आहे. त्यातून सर्व बाहेर पडेल असा आम्हाला विश्वास आहे, असं हजारे म्हणाले.
राज्यात सहकार चळवळ वाढली. त्याचं अनुकरण देशानं केलं. मात्र, आज ही सहकार चळवळ मोडीत काढण्याचा डाव सुरू आहे. सहकार क्षेत्राचं खासगीकरण करण्याचा डाव हा सर्वात मोठा धोका आहे. त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागले आहेत, असं त्यांनी सांगितलं.
आता जरांडेश्वर काखान्यापासून चौकशीला सुरुवात झाली आहे. आता ईडीने 49 साखर कारखान्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आम्ही 4 हजार पानांचं कारखान्यांचं रेकॉर्ड हायकोर्टात दाखल केलं आहे. आता ते सत्र न्यायालयात आहे. केस सुरू आहे. योगायोगाने आता हे प्रकरण ईडीने हातात घेतलं आहे. त्यामुळे यातील सर्व गोष्टी बाहेर येतील अशी आशा आहे, असं त्यांनी सांगितलं.
साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी होणं महत्त्वाचं आहे. राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. राजकीय पक्ष आणि पार्ट्यांचं काही घेणं नाही. सहकार चळवळ टिकली पाहिजे. तिचं खासगीकरण होणं हा धोका आहे, असंही ते म्हणाले.