युक्रेन युद्धाने सध्या जगाला धडकी भरवली आहे. कारण जगभरातील लोक सध्या या देशात अडकले आहेत. प्रत्येक देश त्यांच्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे. या युद्धाचा इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम कमी अधिक प्रमाणात होणार आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आधीच वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी भारतीयांच्या खिशाला मोठी कात्री लावली आहे. हेच पेट्रोल-डिझेलचे दर आगामी काळात आणखी वाढण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या युद्धाने भारतीयांचीही मोठी चिंता वाढवली आहे. देशात आत्ताच महागाईचा भडका उडाल्याने महागाई कशी कमी करावी? याबाबत केंद्र सरकार विचार करत आहे. अशात केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर भारतीयांच्या खिशावर आणखी भार पडणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
या युद्धाबाबत केंद्रीय मंत्री भागवत कराड यांना विचारले असता, युक्रेन-रशिया युद्धाचा देशावर परिणाम होणार, येत्या काळात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार, असे केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड म्हणाले आहेत. तसेच युक्रेन मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 1200 विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना परत आणण्याची तयारी सुरू आहे, असेही ते म्हणाले आहेत. आता यूक्रेनवर आक्रमण केल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांनी दिला. मात्र, त्यांचा इशारा धुडकावत रशियानं यूक्रेनवर हल्ला केला. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.
रशियाला रोखणारे कुणीही नाही का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. युक्रेनने कालच भारताकडे मदत मागितली आहे. मात्र केंद्रीय मंत्रालयाकडून अद्याप कोणताही अधिकृत माहिती आलेली नाही. यात भारत काय भूमिका घेणार? आणि युद्धामुळे वाढणारी महागाई कशी रोखणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
अमेरिका आणि यूरोपियन देशांनी रशियानं यूक्रेनवर आक्रमण केल्यानं अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची संपत्ती जप्त करण्याचा इशारा दिला होता. संपत्ती जप्त करण्याबाबत पाऊल उचलणाऱ्या अमेरिका आणि यूरोपियन देशांना रशियानं प्रत्युत्तर दिलं आहे.
पुतिन यांची संपत्ती जप्त केल्यास रशियात असणारी अमेरिका आणि यूरोपियन देशांची संपत्ती जप्त करु, असा इशारा रशियानं दिला आहे. रशियानं सध्या दोनचं पर्याय जगासमोर सोडले आहेत. एकतर रशियासोबत युद्ध पुकारुन तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात करावी लागेल. किंवा आंतरराष्ट्रीय कायदे मोडणाऱ्यांवर कठोर निर्बंध लावून कायमस्वरुपी धडा शिकवावा लागेल. तिसरं महायुद्ध टाळायचं असेल तर रशियावर कठोर निर्बंध लावून धडा शिकवावा लागेल, असं जो बायडन म्हणाले.