नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली आहे. महाविकासआघाडीमध्ये काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली होती. यानंतर काँग्रेसने सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. सुधीर तांबे यांना काँग्रेसने एबी फॉर्मही दिला होता, पण त्यांनी उमेदवारी अर्जच भरला नाही.
सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाला नसल्यामुळे सत्यजीत तांबे आता अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.
तांबे बाप-लेकांच्या या निर्णयामुळे काँग्रेसने उघड नाराजी व्यक्त केली आहे. ही काही फार चांगली घटना नाही. पक्षपातळीवर सत्यजीत तांबे यांना भरलेल्या अर्जाबाबत विचार करू आणि त्यानंतर निर्णय घेऊ, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. तांबे यांच्यासोबत माझं बोलणं झालेलं नाही, सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज का भरला नाही? याबाबत सविस्तर माहिती घेऊ, असं नाना पटोले यांनी सांगितलं.
दुसरीकडे उमेदवारी अर्ज देऊनही फॉर्म न भरल्यामुळे तांबे यांच्यावर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मान्यतेने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर केली होती मात्र त्यांच्याकडे एबी फॉर्म असताना त्यांनी उमेदवारी दाखल न करणे हे धक्कादायक आणि काँग्रेस कार्यकर्त्याला वेदना देणारं आहे असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी म्हंटलंय.